ST Employee Strike | आम्ही अनेकदा शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही अनेकदा शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो!
आम्ही अनेकदा शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो!

आम्ही अनेकदा शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो!

पिंपरी - आम्ही अनेकदा शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो. दहा हजार पगार वडिलांच्या हातात येतो. त्यात घरखर्चही भागत नाही. नोकरीच्या वेळांमुळे वडील घरातून जातात कधी आणि घरी येतात कधी, हे देखील समजत नाही. कुटुंबात चार सदस्य आहेत. दर महिन्याला हात उसने पैसे घेऊन घर चालवावं लागतं. वडिलांच्या पगारात घरखर्च भागत नाही, म्हणून माझी आई घरकाम करते. शाळेचे शुल्क थकले आहे. आमच्या कुटुंबीयांचा विचार करून एसटी महामंडळाचे विलीनीकरण शासनामध्ये करावं. अन्यथा आमचं जगणंच अवघड होईल, अशी भावना वल्लभनगर आगारात बस चालक असलेल्या बाळासाहेब नागरगोजे यांचा मुलगा संदीप नागरगोजे याने कथन केली.

वल्लभनगर आगारात सुरु असलेल्या एसटीच्या संपामध्ये बालदिनानिमित्त चिमुकली सहभागी झाली होती. त्यांच्याबरोबर ते ही आंदोलनात घोषणा देत होते. सुरु असलेला संप आणि घरातील हलाखीची परिस्थिती ते डोळ्याने पाहत आहेत. संप केला ते योग्य मागण्यांसाठीच केला आहे, अशी धारणा कुटुंबातील प्रत्येकाची आहे. तुटपुंज्या पगारावर एसटी चालक - वाहक घर चालवीत आहेत. परंतु, आता कुटुंबीयही संपात सहभागी होऊन मनस्ताप व्यक्त करत आहेत. घरातील कुटुंबीयांचे आजारपण, शिक्षण, पेट्रोलपासून किराण्यापर्यंत वाढलेला खर्चही कुटुंबीयांना पेलवत नाही. त्यामुळे, निलंबित झालो तरीही मागे हटणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनीही व्यक्त केली आहे.

हेही वाचा: लवकरच सीए अभ्यासक्रमात बदल : सीए जंबूसरिया

माझे पती प्रशांत गुंड ३४ वर्षांपासून ३४ हजार पगारावर काम करत आहेत. घरात हातभार लागावा म्हणून नाइलाजास्तव मला ब्युटी पार्लरचे काम करावे लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला तरी नीट द्यावा. मुलांचे शिक्षण एवढ्या कमी पगारात कसे करायचे. कर्ज काढूनच प्रत्येक खर्च करावा लागतो. वैद्यकीय सुविधा मिळत नाही. सणासुदीला पतीला सुट्ट्या मिळत नाहीत.
- प्रेमाली गुंड, माळवाडी देहूगाव

माझे वडील बाळू गायकवाड वल्लभनगर आगारात चालक म्हणून काम करतात. पगारात घरखर्च चालत नाही. माझ्या शाळेची फी भरली नाही. आई आता कंपनीत कामाला जाते. आम्हाला शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड आहे. पण, आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नाही. आम्हाला प्रत्येक गोष्ट करताना बारकाईने विचार करावा लागतो. कोणत्याच गरजा आमच्या नीट पूर्ण होत नाहीत.
- सचिन गायकवाड, मुलगा, नगर

सात वर्ष वल्लभनगर आगारात काम करत आहे. आधी पत्नी आजारी पडली ती बरी झाल्यानंतर आई आजारी पडली. दोघींचे मिळून ५० हजार खर्च करण्याचीही माझी ऐपत नाही. मित्रांकडून उसने पैसे घेऊन मी दवाखान्याचा खर्च केला.
- नरेंद्र गव्हाणे, मेकॅनिकल, मोशी

माझी पत्नी अश्विनी गायकवाड १२ वर्षांपासून वाहक पदावर कामाला आहे. मी कंत्राटी कामगार आहे. जसे काम मिळेल तसे पैसे हातात मिळतात. मुलांच्या शिक्षणासाठी व दवाखान्यासाठी कर्ज काढले होते. सध्या सहा हजार पगार पत्नीच्या हातात येत आहे. एवढ्या तुटपुंज्या पगारात घरखर्च कसा करायचा. राज्य शासनात विलीनीकरण व्हायलाच हवे.
- धनंजय गायकवाड, पती, मोहननगर, चिंचवड

माझे पती एसटी चालक आहेत. सात वर्षांपासून १३ हजार हातात येत आहेत. पैसा असेल तरच सर्व काही नीट करू शकतो. मुलांना आम्हाला शिकवायचे आहे. परंतु, शिक्षणासाठीदेखील पैसा नाही. घरकाम करून मी इतर खर्च भागवते. गावाकडचं ही पहावं लागतं.
- भारती गायकवाड, पत्नी, पिंपळे सौदागर

loading image
go to top