esakal | पिंपरी : राष्ट्रवादीचा बहिष्कार; भाजपचा षटकार
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Landage

पिंपरी : राष्ट्रवादीचा बहिष्कार; भाजपचा षटकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ठेकेदाराकडून लाच घेतल्याचा आरोप असल्याने महापालिका (Municipal) स्थायी समिती अध्यक्ष बुधवारच्या (ता. १) साप्ताहिक सभेसाठी (Weekly Meeting) येणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. मात्र, ते उपस्थित राहिले आणि अधिकाऱ्यांना कामांबाबत सूचनाही केल्या. तब्बल ५२ कोटी रुपये खर्चाचे ५८ विषय मंजूर झाले. मात्र, राष्ट्रवादीच्या (NCP) चार सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला.

स्थायी समितीची १८ ऑगस्टची सभा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला होता. लांडगे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. सध्या ते जामिनावर आहेत. त्यामुळे बुधवारची (ता. १) सभा होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, लांडगे यांनी पंधरा दिवसांनंतर महापालिकेत प्रवेश करत २५ ऑगस्टची तहकूब व एक सप्टेंबरची नियमित सभा ऑनलाइन पद्धतीने घेतली. भाजपचे दहापैकी नऊ सदस्य उपस्थित होते. रवी लांडगे यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे चार व शिवसेनेचे एक असे पाच सदस्य अनुपस्थित राहिले.

हेही वाचा: महापालिका प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची रायगडला बदली

टपाल कार्यालयाला जागा

पिंपरीतील सुखवानी कॉलनीतील दोन हजार चौरस फूट गाळ्यांसह मंडईतील गाळ्यांना मागणी आहे. ही सर्व गाळे भाडेतत्वावर दिल्यास पालिकेला उत्पन्न मिळेल. टपाल कार्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. त्या अहवालानुसार इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे टपाल कार्यालयाला गाळा देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असा आदेश लांडगे यांनी दिला.

‘अतिक्रमण’ बंदोबस्त वाढवा

ठाणे येथील फेरीवाल्याने महिला अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करताना अधिकाऱ्यांनी अधिकचे पोलिस संरक्षण घ्यावे. जोखीम उचलून कारवाई करू नये. स्वतःच्या सुरक्षेचा विचार करावा, असे आवाहन लांडगे यांनी केले. आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या.

विसर्जनासाठी फिरते जलकुंभ

गणेशोत्सव आठ दिवसांवर आला आहे. सरकारने घातलेल्या निर्बंधाचे पालन करून उत्सव साजरा करावयाचा आहे. मात्र, गणरायांना निरोप देताना विसर्जन घाटांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभागनिहाय फिरते विसर्जन जलकुंभ रथाची व्यवस्था करावी. लोकवस्तीनुसार आवश्यकता भासल्यास त्यांची संख्या वाढवावी. नागरिकांची गैरसोय होता कामा नये, अशी सूचनाही अध्यक्षांनी केली.

हेही वाचा: शिक्षकदिन तीन दिवसावर ! यंदा महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला?

मंजूर विषय

- आर्थिक दुर्बल घटकांसाठी निवासी गाळे बांधण्यासाठी एक कोटी ४५ लाख

- दापोडीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बोपोडी पूल रस्त्यासाठी पाच कोटी ८३ लाख

- वाल्हेकरवाडीत शाळा बांधण्यासाठी नऊ कोटी ६१ लाख

- क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रात साफसफाईसाठी सात कोटी १० लाख

- ग प्रभाग श्रेतात साफसफाईसाठी एक कोटी १६ लाख

- फुगेवाडीतील टिळक शाळेसाठी दोन कोटी ५८ लाख

- महात्मा फुलेनगर व लांडेवाडीसाठी एक कोटी १४ लाख

- शाहू महाराज पुतळ्यासाठी पाच कोटी ५५ लाख

- दापोडी- कासारवाडी रस्त्यांसाठी एक कोटी १९ लाख

- कोरोनाविषयक कामासाठी खासगी संस्थेमार्फत मनुष्यबळासाठी ५० लाख

- आठ हजार अॅन्टिजेन टेस्ट किट्स खरेदीसाठी ५० लाख

- प्राधिकरणातील संत ज्ञानेश्‍वर उद्यानासाठी ४४ लाख ७३ हजार

- इंटरनेट कनेक्टीव्हिटीसाठी ६८ लाख

- महापालिका रुग्णालयांसाठी ८१ लाख

- प्रभाग सहासाठी २७ लाख

loading image
go to top