पिंपरी-चिंचवड : तळेगावची लालपरी अडकली सिल्वासा सीमेवर

गणेश बोरुडे 
Tuesday, 12 May 2020

कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राजस्थानी मजुरांना त्यांच्या गावी मोफत सोडण्यासाठी राज्य शासनातर्फे पाठवलेल्या तळेगाव दाभाडे आगाराच्या तीन बसेसला दादरा नगर हवेली जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे सोमवारी (ता.११) रात्रीपासून नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगणा तालुक्यातील सिल्वासा सीमेवर ताटकळत थांबावे लागले आहे.

तळेगाव स्टेशन - कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राजस्थानी मजुरांना त्यांच्या गावी मोफत सोडण्यासाठी राज्य शासनातर्फे पाठवलेल्या तळेगाव दाभाडे आगाराच्या तीन बसेसला दादरा नगर हवेली जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे सोमवारी (ता.११) रात्रीपासून नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगणा तालुक्यातील सिल्वासा सीमेवर ताटकळत थांबावे लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तळेगाव आगाराचे व्यवस्थापक तुषार माने यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांचे पालन करत राजस्थानमधील ५२ कामगारांना घेऊन सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी गेलेल्या तळेगाव आगाराच्या तीन एसटी बसेस सिल्वासा सीमेवरील चेक पोस्टवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. सदर मजुरांची पुढील व्यवस्था आणि प्रवासाची जबाबदारी दादरा नगर हवेली जिल्ह्याचे प्रशासन घेत नसल्यामुळे सोमवारी रात्री पासून सर्व प्रवासी आणि चालक ताटकळत उभे आहेत. वडगाव मावळ तहसील कार्यालयातील आपत्कालीन विभागाशी याबाबत संपर्क साधला असता, मावळच्या तहसीलदारांचे दादरा नगर हवेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत बोलणे चालू असून लवकरच मार्ग निघेल असे सांगितले.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी आजचा दिवस दिलासादायक; तर पुण्यातील एकाचा मृत्यू 

पेठ तालुक्यातील तहसील कार्यालयाशी बोलून संबंधित कामगारांना तिथेच सोडून बस परत बोलवण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे आगार व्यवस्थापक माने म्हणाले. तळेगाव दाभाडे आगारातून पाच बसेस सोमवारी सायंकाळी निघाल्या होत्या. पैकी तीन बसेस ओडीशा राज्यातील ४१ कामगारांना घेऊन गोंदीया जिल्ह्यालगतच्या छत्तीसगड राज्याच्या रायपुर जिल्हा सीमेपर्यत पोहचवणार आहेत. तर तीन बस राजस्थानमधील ५२ कामगारांना गुजरातच्या सीमेपर्यत पोहोचवणार होत्या.मात्र हा अनुभव लक्षात घेता समोरच्या राज्याकडून परवानगी मिळाल्यानंतरच अडकलेल्या मजुरांचे स्थलांतर करण्यासाठी यापुढील बस सोडण्यात येतील असे मत माने यांनी व्यक्त केले.

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत मोफत पोहोचवण्यासाठी प्रवासाचा खर्च करण्याचे उदार धोरण महाराष्ट्र सरकारने स्वीकारुनही इतर राज्यांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.आणखी या मजुरांना दादरा नगर हवेली आणि गुजरात राज्याच्या सीमा पार करावयाच्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talegav St bus stuck on silvassa border