esakal | सदोष कोंबडी खाद्यामुळे नव्वद हजाराहून अधिक कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद

बोलून बातमी शोधा

crime
सदोष खाद्यामुळं कोंबड्यांनी अंडी देणं केलं बंद; व्यावसायिकांना कोट्यवधीचा फटका
sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

लोणी काळभोर (पुणे) : आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोरसह पुर्व हवेलीमधील पन्नासहून अधिक पोल्ट्रीमधील नव्वद हजाराहून अधिक कोंबड्यांनी मागील आठ दिवसांपासून अचानकपणे अंडी देण्यास बंद केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. नगर जिल्ह्यातील झापा या कोंबड्याच्या खाद्य उत्पादक कंपनीने सदोष खाद्य दिल्यानेच, कोंबड्यांनी अंडी देण्याचे बंद केल्याचा आरोप आंळदी म्हातोबाची येथील तीस पोल्टीमालकांनी केला आहे. याबाबतची लेखी तक्रारही तीस पोल्टीमालकांनी लोणी काळभोर पोलिसांत मंगळवारी (ता. २०) दिली आहे. दरम्यान, नव्वद हजाराहून अधिक कोंबड्यांनी अचानक मागील दहा दिवसांपासून अंडी देणे बंद केल्याने पुर्व हवेलीमधील पन्नासहून अधिक पोल्ट्रीधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सदोष खाद्य प्रकरणाची सखोल चौकशी करुन, संबधित कंपनीवर कायदेशिर कारवाई करण्याबरोबरच नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारकांना संबधिक कंपनीकडून मदत मिळवून द्यावी अशी मागणी पोल्ट्रीधारकांनी लोणी काळभोर पोलिसांच्याकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री व्यावसायिक म्हणाले, ''आळंदी म्हातोबाची व परीसरातील पन्नासहून अधिक पोल्ट्रीधारकांनी नगर जिल्हातील झापा या कोंबड्याच्या खाद्य उत्पादक कंपनीकडून कोंबड्याचे खाद्य मागवले होते. यापुर्वी पुण्यातून खाद्य मागवले जात होते. मात्र बारा दिवसांपुर्वी खाद्याचे बाजारभाव अचानक वाढल्याने, आमच्या भागातील सर्वच पोल्ट्री व्यावसायिकांनी झापा कंपनीतून एकत्रीत खाद्य मागवले होते. झापा कंपनीने पाठवलेले खाद्य सुरु केल्यापासून नव्वद ते पंच्च्यानव टक्केहून अधिक कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले. याबाबत कंपनीशी अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, कंपनीच्या लोकांनी पाहतो, काही तरी मार्ग काढू असे म्हणून आम्हाला मागील दहा दिवसांपासून गाफील ठेवले होते. मात्र दहा दिवसानंतरही कंपनीने काहीही हालचाल न केल्याने आम्हाला पोलिसांत तक्रार द्यावी लागली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन, आम्हाला न्याय द्यावा.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याने होणाऱ्या नुकसान भरपाईबद्दल बोलताना शंकर जवळकर हे पोल्ट्री मालक म्हणाले, ''पोल्ट्रीत असणाऱ्या एकून कोंबड्यापैकी रोज सरासरी नव्वद टक्के कोंबड्या अंडी देतात. पुर्व हवेलीमधील एकुन नव्वद हजाराहून अधिक कोंबड्यानी मागील दहा दिवसांपासून अंडी देणे बंद केलेले आहे. एका अंड्याची किंमत सरासरी पाच रुपये धरली तरी, आमचे प्रतीदिन साडेचार लाख रुपयांचे नुकसान होत आहे. दहा दिवसांचा विचार केल्यास, वरील नुकसान चाळीस ते पंचेळीस लाखांच्या घरात पोचले आहे. याबाबत बोलताना शंकर जवळकर म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही अफवांच्यामुळे आमच्या सारख्या हजारो पोल्ट्रीधारकांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले होते. यातुन कसेतरी सावरत असतांना, माझ्या सारख्या पन्नासहुन अधिक पोल्ट्रीधारकांना कंपनीच्या चुकीमुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. माझ्या सारख्या अनेकांनी घरातील महिलांचे दागिने गहान ठेऊन, पैसा उभारला होता. मात्र कंपनीच्या चुकीमुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. पोलिसांनी याप्रकरणीची सखोल चोकशी ककुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच नम्र विनंती आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत नगर येथील झापा या कोंबडी खाद्य उत्पादक कंपनीचे अधिकारी पुरषोत्तम टेंभेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आमचे वरीष्ठ याबाबत योग्य वेळी उत्तर देतील असे म्हणून मोबाईल फोन कट केला.

याबाबत बोलताना लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, आळंदी म्हातोबाची परीसरातील नव्वद हजाराहून अधिक कोंबड्यांनी सदोष कोंबडी खाद्यामुळे अंडी देणे बंद केल्याबाबतची तक्रार पोलिसांना मिळाली आहे. याबाबत तातडीने लक्ष घालण्यात आले असून, या क्षेत्रातील तज्ञ, पशुवैधकिय अधिकारी व झापा कंपनीच्या आधिकाऱ्यांच्याकडे स्पष्ठीकरण मागितले आहे. या प्रकरणात कंपणी दोषी आढळून आल्यास, कंपनींच्या मालकावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच नुकसानग्रस्त पोल्टी चालकांना कोणत्याही परीस्थितीत न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मोकाशी यांनी यावेळी स्पष्ठ केले. दरम्यान झापा कंपनीच्या विरोधात लक्ष्मण भोंडवे, गिरीष चंद, अनिल जवळकर, गोरख विचारे, विनोद भोंडवे, धनंजय डांगे, वाल्मिक गावडे, निलेष कुंजीर यांच्यासह तीस शेतकऱ्यांनी लोणी काळभोर पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाची प्रयोगशाळा अजूनही ‘निगेटिव्ह’