esakal | प्रत्यक्ष मूर्ती पाहून खरेदी करण्याकडे कल
sakal

बोलून बातमी शोधा

PIMPRI

प्रत्यक्ष मूर्ती पाहून खरेदी करण्याकडे कल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आकुर्डी : गणेशोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल लागले आहेत. कोरोनामुळे यंदा ऑनलाइन मूर्ती खरेदी करण्याबरोबरच प्रत्यक्ष स्टॉलवर जाऊन खरेदी करण्याकडे भाविकांचा अधिक कल आहे. शिवाय, अनेक स्टॉलवर ९० टक्के मूर्ती या शाडू मातीच्या आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा खरेदीसाठी भाविकांचा प्रतिसाद जास्त आहे. त्याचप्रमाणे ‘पीओपी’पेक्षा शाडू मातीच्या मूर्तींना जास्त मागणी आहे.

ढोलताशा वादक म्हणतात...

प्रतीक जाधव (स्वराज्य ढोल पथक) : गतवर्षीप्रमाणे यंदाही ढोल वाजवता येणार नाही याची खंत आहे. गणेशोत्सवाच्या दोन महिने आधी वादनाचा सराव चालू असतो.

साहिल शेख (शिवाय ढोलताशा पथक) : दरवर्षी आम्ही गणेशोत्सवातील तीन महिन्यांची वाट पाहत असतो. मात्र, ‘ढोल वाजवायला परवानगी मिळाली का?’ असे पथकातील मुले दररोज फोन करून विचारत आहेत. त्यांनी ‘नाही’ असे उत्तर देताना खूप वाईट वाटते.

नागेश गवळी : गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वादन करतोय. त्यात वेगळ्याच प्रकारचा आनंद आम्हाला अनुभवायला मिळतो.

स्टॉलमालक म्हणतात...

सिद्धार्थ वाघेरे (पिंपरी गाव) : यंदा शाडू मातीच्या मूर्ती जास्त विकायला आणल्या आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा थोडा जास्त प्रतिसाद आहे. मात्र, कोरोनापूर्वी मिळणारा प्रतिसाद अजूनही नाही.

गौरव बोरगे (पुनावळे) : यावर्षी मी एकही पीओपीची मूर्ती विक्रीसाठी ठेवली नाही. सगळ्या शाडू मातीच्या मूर्ती आहेत. शिवाय, ‘पीओपी’पेक्षा शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा प्रतिसाद आहे. ऑनलाइन बुकिंगपेक्षा प्रत्यक्ष येऊन विकत घेत आहेत.

शैलेश शिंदे : मी ऑनलाइनसह प्रत्यक्ष स्टॉलवर मूर्ती विकतो. गतवर्षीपेक्षा यंदा थोडा चांगला प्रतिसाद आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये १९३ नवीन रुग्ण

ढोलताशांचा आवाज यंदाही घुमणार नाही

राज्य सरकारने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे यंदाही ढोलताशा धूळखातच पडणार आहेत. मिरवणुकांवर बंदी असल्याने यंदाही आवाज घुमणार नाही. ‘ढोलताशा’वर अनेकांचे व्यवसाय अवलंबून आहेत, त्यांचाही यावर्षी हिरमोड झाला आहे. गणेशोत्सवाआधी दोन ते तीन महिने ढोलताशा वादनाचा सराव सुरू असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तोही बंद आहे. त्यामुळे याही वर्षी ढोलवादकांना वादन करता येणार नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

मूर्तीसोबत कुंडी, रोपटे, सेंद्रिय खत मोफत!

अविरत श्रमदानाच्या माध्यमातून यावर्षी गणेशोत्सव नैसर्गिकरित्या साजरा करण्यात यावा. यासाठी लालमातीपासून बनविलेल्या गणपतीच्या मूर्तीसोबत मातीची कुंडी, झाडाचे रोपटे, त्याचप्रमाणे सेंद्रिय खत मोफत देण्याचा संकल्प गणेश पानसरे व त्यांच्या अविरत श्रमदानाचा संस्थेने केला आहे.

लालमातीपासून बनवलेल्या मूर्तींना रंगरंगोटी देखील नैसर्गिकरित्या केलेले आहे. त्याचप्रमाणे मूर्तीसोबत कुंडी आणि झाडाचे रोपटे मोफत दिल्याने मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर माती विरघळून त्याचसोबत दिलेले रोपटे लावल्याने लाडका बाप्पा त्यामाध्यमातून अनेक वर्ष आपल्या सोबत राहील.

हेही वाचा: पिंपरी : नामांकित कॉलेजचा व्यवस्थापन कोटा ‘सरेंडर’

नागरिक म्हणतात...

गणेश पानसरे (समन्वयक, अविरत श्रमदान) : ‘‘प्रत्येकाला वाटत असते. आपला बाप्पा आपल्या सोबत नेहमी असावा. गणेश मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर ती माती पाण्यात वाहून जाते. परंतु, त्याच मातीचा योग्य वापर केल्याने निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही व रोपट्याच्या माध्यमातून गणेशा नेहमी आपल्या सोबत राहतो.’’

दीपक कुंभार (मूर्तिकार) : ‘‘लाल मातीपासून नैसर्गिकरित्या गणेशाची मूर्ती बनवण्याचा व्यवसाय मी अनेक वर्षांपासून करत आहे. परंतु, मूर्तीसोबत कुंडी, झाडाचे रोपटे, सेंद्रिय खत दिल्याने मूर्ती विकत घेण्यासाठी अनेक ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.’’

अनिल कुलकर्णी : ‘‘नदीत विसर्जनाच्या वेळी गणपती मूर्तीची खूप विटंबना होते, आणि खूप नदी प्रदूषण होत आहे. म्हणून आम्ही इको फ्रेंडली (नैसर्गिक लाल मातीचा गणपती) स्थापना करणार आहोत.’’

सुनील पगडे (उद्योगपती, भोसरी) : ‘‘अविरत श्रमदान संस्थेने खूप कौतुकास्पद उपक्रम चालू केला आहे. त्यातून प्रदूषण वाचून पर्यावरण संरक्षण तर होणारच आहे, सोबत एका झाडाची सुद्धा वाढ होणार आहे.’’

loading image
go to top