दिघी, वाकड व हिंजवडीतील वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जुलै 2020

दिघी, वाकड व हिंजवडी येथे अपघाताच्या घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका वृद्ध महिलेचाही समावेश आहे

पिंपरी : दिघी, वाकड व हिंजवडी येथे अपघाताच्या घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका वृद्ध महिलेचाही समावेश आहे. 

पुण्यातील 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

सोमवारी (ता.26) वाकड येथे झालेल्या अपघातात वेणुगोपाल प्रसाद इदनुर (वय 29, रा. बलवार आळी, गुरूवार पेठ, पुणे) यांचा मृत्यू झाला. ते दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथील जगताप डेअरी चौकाजवळील रस्त्याने जात असताना (एम.एच. 15, बी.एन. 7299) या क्रमांकाची भरधाव मोटार इंडिकेटर सुरू न करता अचानक उड्डाणपुलाजवळ आली. त्यानंतर चालकाने ही मोटार उड्डाणपुलावर न घेता खाली रस्त्यावर घेतली व जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे इदनुर हे दुचाकीसह मोटारीवर जोरदार धडकले. या घटनेत त्यांच्या डोक्‍यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात अज्ञात मोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिघी येथे गुरूवारी (ता.23) रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात सरिता रमेश चोखले (वय 65, रा. शांतीनगर, येरवडा) यांचा मृत्यू झाला. दिघी येथील विश्रांतवाडी ते दिघी या रस्त्यावरून दुचाकीवरून सुधीर चोखले व सरिता चोखले हे जात होते. त्यावेळी भरधाव दुचाकी गतीरोधकावर जोरदार आदळल्याने सरिता या दुचाकीवरून उडून खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मंगळवारी (ता.28) सुधीर रमेश चोखले (वय 45) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तर हिंजवडीतील भूमकर चौक येथे घडलेल्या तिसऱ्या घटनेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. रविवारी (ता. 26) दुपारी एकच्या सुमारास भूमकर चौक येथील रस्त्याने गणेश मारूती खोल्लम (वय 37, रा. सिमासागर सोसायटी, सुखसागरनगर, कात्रज) हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या टेम्पाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये गणेश खोल्लम गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी राहुल दत्तू पोटकुले (वय 33, रा. महादेवनगर, शेलारमळा, कात्रज) या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three persons died in different accidents at Dighi, Wakad and Hinjawadi