पिंपरी चिंचवड : वाकड रस्त्याचा आज निर्णय; आयुक्त देणार खुलासा

PCMC
PCMC

पिंपरी - स्थायी समितीत मागील बुधवारी वाकडमधील रस्ते विकासाच्या मुद्द्यांवरून जोरदार राडा झाला होता. यात उपस्थित झालेल्या अनेक प्रश्‍नांवर आयुक्त खुलासा करणार आहेत. तो गोंधळ नगरसेवकांना मान्य होणार का? नसेल तर काय भूमिका राहणार? प्रदेश पातळीवरून संबंधित नगरसेवकांना काही समज दिली आहे का? दोन आमदारांमधील विकोपाला गेलेला वाद यानिमित्ताने तरी शमणार का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे बुधवारी होणाऱ्या सभेत मिळणार आहेत. तसेच, मूळ रस्तेविकासाचा प्रश्‍न लटकणार की सुटणार, या गुंत्याचीही उकल होणार आहे.

गेल्या सभेत चार विषयपत्रिकेवरील दोनशेहून अधिक प्रस्ताव निर्णयासाठी प्रतीक्षेत होते. सभा कामकाजाला सुरुवात होताच आमदार लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवक शशिकांत कदम यांनी वाकड रस्तेविकासाच्या मुद्दा उपस्थित करून आयुक्तांनी रस्ते विकासाबाबत राज्य सरकारकडे सकारात्मक भूमिका का मांडली? सत्ताधारी भाजपच्या ठरावाला महत्त्व नाही का? आम्ही मूर्ख आहोत काय? याचा खुलासा करा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर पुढील आठवड्यात खुलासा करतो, असे उत्तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. त्यास आमदार महेश लांडगे समर्थक सभापती संतोष लोंढे यांनी मान्यता दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुक्त-सभापतींच्या या उत्तरामुळे जगताप समर्थक नगरसेवकांचे पित्त खवळले होते. सभा कामकाज तहकूब करा, अशा धोशा लावला. तर, शहर विकासाचे असंख्य प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याचा निपटारा करू, अशी भूमिका सभापतींनी घेतली होती. यानंतर लांडगे समर्थक नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनीही सभापतींची बाजू उचलून धरीत सभा कामकाज चालू ठेवा, ज्यांना जायचे असेल त्यांनी बाहेर जावे अशी शेरेबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले. यानंतर जगताप समर्थक नगरसेवकांनी आयुक्त-नगरसचिवांना अरेरावी करीत त्यांच्यापुढील कागदपत्रे फाडत ती हवेत भिरकावली. अधिकारी-नगरसेवकांसमोरील ध्वनिक्षेपक उपसून काढत त्यांची मोडतोड केली. काचेचे ग्लास जमिनीवर फोडत संताप व्यक्त केला. प्रतिबंध करणाऱ्या सुरक्षारक्षकांनाही धक्काबुक्की केली होती.

सभेबाबत कमालीची उत्सुकता
वाकडच्या रस्तेविकासाच्या मुद्द्यांवर खुलासा करण्यासाठी आयुक्तांनी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. उद्याच्या बैठकीत ते खुलासा करणार आहेत. त्यावर जगताप समर्थकांचे किती समाधान होते यावर सभेचे पुढील वातावरण अवलंबून असेल. कारण नगरसेवकांनी केलेल्या वर्णनावरून सत्ताधारी भाजपची प्रतिमा मलिन झाली अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटली. शिवाय, दोन्ही आमदारांमधील वाद किती टोकाचा आहे, याचे दर्शनही लोकांना झाले. याबाबत पक्ष नेतृत्वाकडे अनेक तक्रारी झाल्या आहेत. यावर वरिष्ठ पातळीवर आमदार आणि पदाधिकाऱ्यांना काही समज मिळाली आहे का, याबाबत महापालिका राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com