
पिस्तूल, तलवार बाळगणारे थेरगाव, चिंचवडमध्ये अटकेत
पिंपरी , ता. १६ : थेरगाव व चिंचवड येथे केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी पिस्तूल व तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. थेरगाव येथील बारणे कॉर्नर येथे बुधवारी (ता. १५) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास वाकड पोलिसांनी समीर रफिक अन्सारी (वय २६, रा. बोरडे नगर, थेरगाव ) याला अटक केली . त्याच्याकडून २२ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. तर दुसरी कारवाई चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे मंगळवारी (ता. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये गौरव अरुण यशवंत (वय १९, रा. राजयोग कॉलनी, वाल्हेकरवाडी , चिंचवड) याला गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक तलवार जप्त केली. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
किरकोळ कारणावरून वाद
उसने पैसे घेतल्याचे घरी सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात ज्येष्ठाला दगड मारला. यामध्ये वृद्धा जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार तळवडे येथे घडला. संकेत भरत गोगावले (वय २८, रा. मोरेश्वर कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंदा निवृत्ती नखाते (वय ६७, रा. सहयोगनगर, तळवडे ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा प्रशांत यांनी गेल्या महिन्यात एक लाख रुपये टप्प्याटप्प्याने आरोपीला उसने दिले होते. ते पैसे प्रशांत आरोपीला मागत होता. मात्र, नंतर आरोपीने त्यांचा फोन घेण्यास टाळाटाळ केली. त्यामळे प्रशांत यांनी आरोपीच्या आई वडिलांना माहिती दिली. त्यामुळे आरोपी हा फिर्यादी यांच्या घरी गेला. तेथे शिवीगाळ केल्याने फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय बाहेर आले. त्यावेळी आरोपीने प्रशांत यांना ''तू पैसे घेतल्याचे माझ्या घरी का सांगितले, मी आता तुला पैसे देत नाही तुला काय करायचे ते कर'' असे म्हणत आरोपीने दगड मारण्यास सुरुवाट केली. यातील एक दगड फिर्यादी यांना लागल्याने त्या जखमी झाल्या.
एटीएम सेंटरमधून बॅटऱ्या चोरीला
एटीएम सेंटरमधून बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी योगेश मधुकर काटकर (रा. साईनाथनगर, निगडी, मूळ- सातारा) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकुर्डीतील गणेश व्हिजन येथे एटीएम सेंटर असून येथून चोरट्याने २४ हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या चोरल्या.
सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास
लग्न समारंभासाठी आलेल्या महिलेचा सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला. हा प्रकार बावधन येथे घडला. या प्रकरणी सीमा हंबीरराव आडनाईक (रा. सहकारनगर, पुणे ) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचे नातेवाईक बावधन येथे लग्न समारंभासाठी आले होते. येथे फिर्यादी यांची पर्स चोरीला गेली. त्यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण दोन लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज होता.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना मोशी येथे घडली. संजय सोपानराव शिंदे (वय ४५, रा. आल्हाटवाडी, मोशी- आळंदी रोड, मोशी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांची मामे बहीण रिक्षातून शाळेत जात असताना आरोपीने त्यांचा वारंवार पाठलाग केला. फिर्यादीशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केला.
दुचाकीस्वार महिलेची सोनसाखळी हिसकावली
पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या चोरट्याने हिसकावल्या. ही घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता. १५) फिर्यादी या त्यांच्या पतीसह मोशी -चिखली रस्त्याने जात होत्या. फिर्यादी दुचाकी चालवत होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून दोघेजण आले. त्यापैकी मागे बसलेल्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील तीस व पंधरा हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या हिसकावल्या. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..