जुलाब, उलट्यांच्या साथीमुळे तळेगावकर बेजार पाणी शुद्ध असल्याबाबत नगरपरिषदेचा निर्वाळा, नागरिकांकडून आरोपांचा भडिमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुलाब, उलट्यांच्या साथीमुळे तळेगावकर बेजार
पाणी शुद्ध असल्याबाबत नगरपरिषदेचा निर्वाळा, नागरिकांकडून आरोपांचा भडिमार
जुलाब, उलट्यांच्या साथीमुळे तळेगावकर बेजार पाणी शुद्ध असल्याबाबत नगरपरिषदेचा निर्वाळा, नागरिकांकडून आरोपांचा भडिमार

जुलाब, उलट्यांच्या साथीमुळे तळेगावकर बेजार पाणी शुद्ध असल्याबाबत नगरपरिषदेचा निर्वाळा, नागरिकांकडून आरोपांचा भडिमार

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ३ : गेल्या आठवडाभरापासून जुलाब, उलट्या आणि सर्दीमुळे बहुसंख्य तळेगावकर बेजार झाले आहेत. दवाखाने रुग्णांनी ओसंडून वाहत असले तरी पाणी शुद्ध असल्याबाबतचा निर्वाळा खास प्रसिद्धीपत्रकाद्वारे तळेगाव नगरपरिषदेने दिला आहे.
गत वर्षाच्या सरतीपासून हवामानातील बदल आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे तळेगाव गावठाण आणि स्टेशन विभागात जुलाब, उलट्या तसेच ताप, सर्दी  खोकल्यासह गॅस्ट्रोची साथ आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंताग्रस्त नागरिकांकडून नगरपरिषद आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा विभागावर आरोपांचा भडिमार केला जात आहे. जलवाहिन्यांची काही ठिकाणी झालेली चाळणी आणि असुरक्षित पाणी साठवण टाक्यांमुळे पाणी दूषित झाल्याचा कयास नागरिक लावत आहेत. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी दवाखान्यांमध्ये संबंधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मागील काही दिवसांत तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील गाव भागात अचानक गॅस्ट्रोच्या आजाराचे पेशंट वाढल्याने त्याबाबत कारणमीमांसा करणे गरजेचे झाले. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेद्वारे तातडीने सर्व गाव विभागाला पाणी पुरवठा होत असलेल्या चौराई शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी नमुने पिंपरी चिंचवड प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर फिल्टर प्लॅन्टपासून पाणी पुढे सोडल्यानंतर नेमके पुढे कुठे जाऊन पाणी खराब होत आहे काय? याबाबत तपासणी करण्यासाठी गाव भागातील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नळ तोटीच्या पाण्याचे नमुने घेण्यात येऊन तेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले. त्यातील ९० टक्के अहवालानुसार पाणी पिण्यायोग्य असल्याचे निष्कर्ष आले; काही भागातील पाणी पुरवठा खराब झाल्याचा निष्कर्ष आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच भागातील पाणी नमुने पिण्यायोग्य असल्याचा अहवाल आला. ही समस्या नेमक्या कोणत्या कारणामुळे उद्भभवत आहे, याबाबत नगरपरिषदेद्वारे युद्धपातळीवर शोध मोहीम सुरु आहे. ज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागातील पाणी नमुने तपासणी करणे, एखाद्या ठिकाणी पाइपलाइन लिकेज होऊन, त्यातून अशुद्ध पाणी पाइपलाइनमध्ये जात आहे काय याचा शोध घेणे, पाइपलाइन वॉशआउट करणे या बाबी केल्या जात आहेत. अन्य काही कारणामुळे ही समस्या उद्भवली आहे काय? याचाही शोध घेतला जात आहे. सद्यःस्थितीत नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. अन्य काही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये, असे आवाहन तळेगाव नगरपरिषद आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, मयूर मिसाळ तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता श्रुती ठाकरे यांनी केले आहे.

कोट

जुलाबामुळे त्रस्त जवळपास २० रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून, उलट्या, खोकला आणि सर्दीच्या रुग्णांनाही औषधोपचार देण्यात येत आहेत. हे आजार दूषित पाण्यामुळेच पसरल्याची शक्यता लक्षात घेऊन आशा वर्कर्स आणि आरोग्य सेवकांमार्फत तळेगावात सर्वेक्षण चालू आहे.-
- डॉ. दिनेश महालिंगे, वैद्यकीय अधिकारी, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र

जेव्हापासून नवीन जलवाहिनीचे काम चालू आहे. तेव्हापासून अख्खे तळेगाव उलट्या आणि जुलाबामुळे बेजार झालं आहे. धन्य आहे ते पाणी खाते सांभाळणा-या सभापतींची. त्यांना कोपरापासून दंडवत !
-गिरीश करंडे, नागरिक, तळेगाव दाभाडे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top