दोन वर्षापासून यात्रा-जत्रांचा हंगाम थांबला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yatra
दोन वर्षापासून यात्रा-जत्रांचा हंगाम थांबला

दोन वर्षापासून यात्रा-जत्रांचा हंगाम थांबला

कामशेत - दत्त जयंतीपासून मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावोगावी यात्रा-जत्रांचा (Yatra Jatra) हंगाम (Season) सुरू होतो. हा हंगाम पौष महिन्यात अधिकच बहरून येतो. मात्र, दोन वर्षांपासून कोरोनाच्या (Corona) सावटाने गावोगावच्या यात्रा-जत्रा थांबल्या. त्यामुळे अर्थचक्र मंदावले आहे. गावच्या यात्रेतील भारुडाचा (Bharud) आणि आखाड्यांचा (Kusti) फड काही दोन वर्षांपासून गाजला नाही. त्यामुळे पैलवान आणि कलाकारांना आपली कला काही दाखवता आली नाही.

यंदा सुरुवातीला नवलाखउंब्रेतील भैरवनाथ महाराजांच्या यात्रेतील हे दोन्ही फड चांगले रंगले. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत कोरोनाने डोके वर काढल्याने पुन्हा निर्बंध सुरू झाले आणि यात्रा-जत्रेतील आनंदावर विरजण पडले. मावळा तालुक्यातील ग्रामीण भागात दत्त जयंती झाली की, गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू होतात. या यात्रांना जोडून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढले आणि सरकारने तातडीने निर्बंध लावले. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या गाव पातळीवरील अर्थचक्र मंदावले. गावच्या यात्रते माहेरवाशीण आणि सासुरवाशीण यांचे लाड पुरवायचे हे दिवस. पै पाहुणे आणि सोयरेधायरे यांचा पाहुणचार करायची संधी, यात्रेच्या निमित्ताने होते.

हेही वाचा: पिंपरी : लसीकरणाला आधी नकार; आणि आता गर्दी

त्याला जोडून भारुडाचा आणि लालमातीतील फडही रंगवायचे हे दिवस. मात्र, दोन वर्षांपासून गावोगावी यात्रा-जत्रेला मर्यादा आल्याने भजनी भारुडाची बिदागी बुडाली. हलगी तुतारी, ढोल लेझीम आणि बँजो पथकाची मागणी घटली. गावोगावी शेव रेवडी, भेळ, जिलेबी, आइस्क्रीम, कुल्फी विकणारे विक्रेते, बांगड्याची दुकाने यांचाही धंदा काहीसा मंदावला. भारूड पथकातील कलाकारांनी या व्यवसायांवर अवलंबून न राहता, पर्यायी मार्ग शोधले आहे.

उत्सव साधेपणाने

पैलवान मंडळींचा खुराक होणारा खर्च, तालमीतील राहणे, तिथे होणारा सराव पाहता, दोन वर्षात कुस्तीचा आखाडा गाजवला नसल्याचे शल्य आहे. सध्या गावोगावी ग्रामदैवतांचे उत्सव साधेपणाने साजरे होत आहे. हारतुरे, छबिना, पालखी मिरवणूक, दंडवते या पारंपरिक रीतीप्रमाणे यात्रा-जत्रा होत असून अखंड हरिनाम सप्ताह, दिंडी सोहळ्याला मर्यादा आल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top