रमजान महिना -लेख

रमजान महिना -लेख

रमजान मुबारक
-------------------
रमजानचा महिना म्हणजे
आत्मशुद्धीचा हंगामच


इस्लाम धर्मामध्ये सर्वात पवित्र महिना म्हणजे रमजान. मुस्लीम बांधव या महिन्याची वर्षभर वाट पहात असतात. या वर्षी ईश्वरीय योगायोग जुळून आला आहे. हिंदू बांधवांच्या नव वर्षाची सुरवात गुढी पाडव्याने होते आणि त्याच दिवशी रमजान महिन्याच्या पवित्र चंद्राचे दर्शन व्हावे व दुसऱ्या दिवशी रमजान महिन्याचा पहिला उपवास असावा हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
परमेश्वराचे जे गुणधर्म आहेत, त्यांच्याशी तादात्म्य होण्याची शिकवण देणारा धर्म अशी इस्लामची व्याख्या केली जाते. इस्लाम धर्माचा ''कुराण'' हा पवित्र धर्मग्रंथ याच रमजान महिन्यात अवतरला. त्यामुळे मुस्लीम बांधव या महिन्याला विशेष महत्त्व देतात. इस्लाम धर्मात वर्णिलेला परमेश्वर हा कोणत्याही एका राष्ट्राचा किंवा धर्माचा नसून, तो सर्व जगाचा परमेश्वर (रब्बुल आलमीन) आहे, असा पवित्र कुराणमध्ये उल्लेख आलेला आहे. त्यामुळे पवित्र कुराणच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरवातीला अर् रहमान (उपकर्ता) व अर् रहिम ( दयेचा सागर) अशा सुंदर नावाने परमेश्वरास संबोधिले आहे.
वर्षातून एक महिना म्हणजे रमजान महिन्यातील उपवास प्रत्येक मुस्लीमाने करावयाचे असतात. हे इस्लामचे एक महत्त्वाचे तत्त्व मानले जाते. उपवासाचा मुख्य हेतू म्हणजे आत्मशुद्धी, म्हणजेच चित्तशुद्धी होय. कोणाचेही मन दुखवू नये, कोणाचेही नुकसान करू नये, मनात वाईट विचार येवू देऊ नये, वगैरे अटी उपवास करताना पाळाव्या लागतात. आजारी माणसे, प्रवासी आणि लहान मुले यांनी उपवास केला पाहिजे, अशी अट नाही.
दिवसभर अन्न पाण्याशिवाय उपवास, दिवसभरातील ५ वेळीची प्रार्थना (नमाज), रात्रीची विशेष प्रार्थना (तराबी), पवित्र कुराणाचे वाचन हे सर्व पाहिल्यानंतर मला तर रमजान महिना म्हणजे मुस्लीम बांधवांसाठी आत्मशुद्धीचा हंगामच वाटतो.

आत्मशुद्धीचे प्रात्यक्षिक पहावयाचे असेल तर मुस्लीम बांधवांची रमजान महिन्यातील प्रार्थना (इबादत) एक उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल.


प्रा. डॉ. एस. एन. पठाण.

(लेखक माजी कुलगुरू व

विश्वशांती केंद्र (आळंदी) पुणे चे सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com