घरेलू कामगार नोंदणी नूतनीकरणाकडे पाठ

घरेलू कामगार नोंदणी नूतनीकरणाकडे पाठ

घरेलू कामगारांची फरफट सुरूच

कोरोनाचा परिणाम; अधिकार व लाभापासून राहिले वंचित, उपासमारीची वेळ

पिंपरी, ता. १९ : कोरोना काळात सर्वाधिक फरफट घरेलू कामगारांची झाली. रोजीरोटी गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली. अनेक घरेलू कामगारांनी अधिकृत नोंदणी व नूतनीकरण न केल्याने बहुसंख्य कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना असलेले अधिकार व लाभापासून ते वंचित राहिले. त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. जानेवारी २०१५ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत या पाच वर्षाच्या कालावधीत नोंदणीकृत अवघ्या आठ हजार १७५ कामगारांपैकी पात्र सहा हजार १६३ घरेलू कामगारांना ९२ लाख ४४ हजार इतके अर्थसहाय्य मिळाले. आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात केवळ ३०४ घरेलू कामगारांनी नूतनीकरण केल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यात २०११ पासून घरेलू कामगारांची नोंदणी सुरू झाली आहे. या कामगारांच्या नोंदणीसाठी नोंदणी शुल्क ३० व पाच रुपये प्रतिमहा अंशदान घेतले जाते. नोंदणी जीवित राहण्यासाठी कामगाराने विहीत अंशदान व मालकाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१४ पर्यंत ७२ हजार ७८७ कामगारांची नोंद झाली आहे. जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत १०५५६ घरेलू कामगारांची नोंद झाली आहे. मार्च २०२१ अखेर केवळ ३०४ इतक्या कामागरांची नोंदणी जीवित आहे. एक एप्रिल २०२१ नंतर नोंदणी केलेले कामगारांना याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अनेक संघटनांनी एप्रिल २०२१ पासूनचा लाभ घरेलू कामगारांना मिळावा, अशी मागणी केली आहे.
उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या सरकार निर्णयानुसार ३० एप्रिल २०२१ पासून राज्य घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत
पुणे जिल्ह्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना पंधराशे रुपये अर्थसहाय्य असंघटित क्षेत्रासाठी सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार कामगार उपायुक्तालयाने उपलब्ध माहिती व आकड्यांनुसार एक जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील घरेलू कामगारांना मोबदला मिळवून दिला. त्यामुळे नव्याने मार्च २०२१ नंतर नोंदणी करणारे बहुसंख्यजण या लाभापासून वंचितच राहिले. कारण, त्यांनी नोंदणी किंवा नुतनीकरण केले नाही.

राज्यातील एक लाख पाच हजार पाचशे घरेलू कामगारांना आत्तापर्यंत पंधराशे रुपये प्रमाणे १५८२५००० इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. एक जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०२१ मधील १०५५६ इतके नोंदीत घरेलू कामगारांमधून वयाच्या अटीनुसार ८७१५ घरेलू कामगार पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४,४४५ कामगारांनी बॅंक अकाउंटची माहिती नोंदणी कार्यालयास दिली आहे. त्यानंतर १,७३० घरेलू कामागारांना अनुदानासाठी मदत केली आहे. एक महिन्याच्या आत हा लाभ कामागरांना खात्यावर जमा केला जातो. २०११ ते २०१४ मधील व जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०२१ मधील नोंदीत उर्वरीत घरेलू कामगारांना https://public.mlwb.in/public या संकेतस्थळावर माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घरेलू कामगारांच्या नोंदणीतून चमकोगिरी
अनेक घेरलू कामगार अशिक्षित आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक संख्या घरेलू कामगारांची संख्या आहे. लाखोच्या घरात या कामगारांची संख्या आहे. परंतु, नोंदणी हजाराच्या घरात आहे. अद्यापपर्यंत वंचित कामगार घटकांपैकी घरेलू कामगार सोयी-सुविधांपासूव वंचित राहिले आहेत. सध्या निवडणुका तोंडावर आल्याने घरेलू कामगारच सर्वाधिक महत्त्वाचा झाला आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी घरेलू कामगारांची माहिती भरण्यासाठी स्वत:ची यंत्रणा उभारली आहे. काही कामगार संघटनांना, व सरकारला कोरोना काळात जाग आल्यानंतर या घटकाची माहिती अद्ययावत करण्यास सुरुवात झाली. सध्या घरेलू कामगारांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी अनेकांची धावपळ उडाली आहे.

घरेलू कामगारांच्या नोंदणीला प्रतिसाद आहे. कोविडमुळे गर्दी न करता अनेकजण ऑनलाइन नोंदणी करत आहेत. हा घटक अशिक्षित असल्याने नोंदणी करण्यास अडचणी येतात. त्यामुळे अनेक संघटना घरेलू कामगारांच्या नोंदणीसाठी पुढे सरसावले आहेत.
- सुधीर गायवाड, सहायक आयुक्त, कामगार उपायुक्तालय, पुणे

ही लागतात कागदपत्रे
आधारकार्ड, बॅंक पासबुक, घरकमालक संमतीपत्र, ओळखपत्र, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र

घरेलू कामगार नेमके कोण
कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे, मुलांचा सांभाळ, घर सांभाळ, साफसफाइ, किराणा व साहित्य पोच करणारे तसेच घरात इतर दैनंदिन कामे करणारे कामगार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com