Alandi: कार्तिकीच्या तोंडावर इंद्रायणी फेसाळली, भाविकांमध्ये संताप; मैलायुक्त फेसाळ पाण्यातच करावे लागतेय स्नान

Alandi: कार्तिकीच्या तोंडावर इंद्रायणी फेसाळली, भाविकांमध्ये संताप; मैलायुक्त फेसाळ पाण्यातच करावे लागतेय स्नान

आळंदीत कार्तिकीच्या तोंडावर ‘इंद्रायणी’ला फेस
भाविकांमध्ये संताप ः मैलायुक्त फेसाळ पाण्यातच करावे लागतेय स्नान

विलास काटे ः सकाळ वृत्तसेवा
आळंदी, ता. ११ : कार्तिकी वारी अवघ्या महिन्यावर आली असताना इंद्रायणी नदीपात्रात बिनदिक्कतपणे प्रदूषित मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचे पाप पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून सर्रास होत असून, औद्योगिक कंपन्यांतूनही रासायनिक आणि सांडपाणी सोडले जात आहे. महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र ठोस कारवाई करत नसल्याने बारमाही नदीप्रदूषण होत आहे. त्यामुळे काकडा आरती आणि कार्तिक स्नान आता भाविकांना या मैलायुक्त फेसाळ पाण्यातच करावे लागत असल्याचे चित्र आहे.
मध्यरात्रीपासून आळंदीतील इंद्रायणीच्या पाण्यावर पांढऱ्या रंगाचा साबणाच्या फेसाप्रमाणे थर तरंगताना दिसू लागले. पहाटेपासून प्रमाण वाढले. नदीवर बर्फाच्या थराप्रमाणे फेसाळ पाण्याचा थर दाट झाला होता. संपूर्ण पात्रात फेसाळयुक्त सांडपाणी वाहत होते. थराची उंची दोन फुटांपेक्षा जास्त होती.
बघणारा प्रत्येक नागरिक, वारकरी हे पाप महापालिकेचे व लहान मोठ्या कंपन्यांचे असल्याचे बोलत होते. ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या नावाने वारकरी देत होते. खरे तर; पिंपरी चिंचवड महापालिकेचा भौगोलिक आणि नागरी विस्तार वाढला. तसा आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाची समस्या वाढली. महापालिका हद्दीत गेल्या वीस वर्षापासून प्रदूषित पाणी सोडले जात आहे. चिखली-कुदळवाडीतून प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे. वारकऱ्यांनी, पर्यावरणप्रेमींनी, स्थानिक आळंदीकर पदाधिकाऱ्यांनी वारंवार याबाबत आवाज उठविला. मात्र; सरकार कोणाचेही असो, शासनस्तरावर गांभिर्याने दखल कोणी घेत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनच ढिम्म असल्याने महापालिका हद्दीतील लघुउद्योजकांकडून रात्री तर कधी पहाटेच्यावेळी प्रदूषित सांडपाणी सोडले जाते. परिणामी आळंदीसह चऱ्होली, धानोरे, मरकळ, गोलेगाव, तुळापूर भागात बेसुमार जलपर्णी वाढली आहे. बारमाही प्रदूषित सांडपाणी जलपर्णीमुळे जलचरांच्या जिवाला धोका आहेच. तर; शेतमालाची प्रतवारी घटत आहे. आरोग्याची समस्या वाढत आहे. प्रदूषित पाण्यामुळे इंधन विहिरीचेही पाणी खराब झाले.

‘‘अनेक वर्षे घाण पाण्यामुळे माझे कार्तिक स्नान बुडाले आहे. आज तर; प्रदूषणाने कहरच केला. सांगा अशा पाण्यात काय तीर्थस्नान होणार. या प्रदूषित पाण्यात अंघोळ केल्यास आजारी पडण्याची किंवा त्वचा रोग होण्याची दाट शक्यता आहे. सुधारण्यासाठी सरकारला माऊली सुबुद्धी दे.’’
- नाना क्षीरसागर, वारकरी, आळंदी.

‘‘शासनस्तरावर तक्रारी निवेदन गेल्या वीस वर्षात दिले. मात्र कुणीही ठोस कारवाई केली नाही. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच आता जबाबदार धरुन कारवाई अपेक्षित आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर जेथून पाणी सोडले जाते, तेथून ताबडतोब बंद करावे.’’
- डी. डी. भोसले, माजी नगरसेवक, आळंदी.

‘‘महापालिका आणि अन्य संस्थांच्याविरोधात वारकरी, ग्रामस्थ आवाज उठवतात. मात्र शासन स्तरावर काहीच गांभीर्य नाही. उपोषणाचा मार्ग अवलंबला तर जिल्हाधिकारी केवळ आश्वासन देतात. प्रदूषण करणारांवर कडक कारवाई अपेक्षित आहे. नमामी इंद्रायणी आणि मंजूर निधीची केवळ आकडेमोड करून सांगितले जाते. सरकार तीर्थस्थळांच्या नद्यांबाबत गंभीर नाही.’’
- विठ्ठल शिंदे, अध्यक्ष, इंद्रायणी सोशल फाउंडेशन

‘‘आळंदी नगरपालिका अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे. मात्र, छोटी नगरपालिका असल्याने कुणीच लक्ष देत नाही. वारीच्या पार्श्वभूमीवर आणि वारकऱ्यांचे आरोग्य पाहता महापालिकेकडून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून प्रदूषित पाणी थांबविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी नगरपालिका

फोटो ः 03850, 03851, 03852

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com