
२६ वर्षानंतरही विकासनगर
रस्ता रुंदीकरणास हरकत
किवळेतील परिस्थिती ः वाहतूक कोंडीची समस्या
किवळे, ता. १६ : किवळे गावाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९७ मध्ये समावेश करण्यात आला. गेल्या २६ वर्षात या रस्त्याचे रुंदीकरण रखडलेलेच आहे. महापालिकेने डीपीनुसार या रस्त्याचे रुंदीकरण करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळेच अन्यायाच्या भावनेतून रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या बाधितांनी महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण कामास हरकत घेतली आहे.
किवळे गाव प्रथम ग्रामपंचायत होती. तेव्हा लोकसंख्या तुलनेने कमी होती. त्यासोबतच घरे आणि वाहनांची संख्याही कमी होती. महापालिकेत समावेश झाल्यानंतर गेल्या २६ वर्षात लोकसंख्या, घरे आणि वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे जुन्या पुणे- मुंबई महामार्गास आणि कात्रज बाह्यवळण महामार्गास जोडणाऱ्या विकासनगर रस्त्यावर सध्या वाहतुकीचा ताण आला आहे. त्यामुळे या रस्त्याचे डीपी प्लॅननुसार ५० फूट रुंदीकरण लवकर करून, स्थानिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
‘‘विकासनगर येथील सुमारे १२ ते १५ मीटर असलेल्या डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पालिका अर्थसंकल्पात समाविष्ट केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर हे काम केले जाईल. परंतु तत्पूर्वी अतिक्रमणसुद्धा काढावे लागणार आहे.
अनिल शिंदे, स्थापत्य अभियंता, ब क्षेत्रीय कार्यालय.
‘‘विकासनगर येथील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण डीपी प्लॅन नुसारच ५० फूट रुंद होण्याची गरज आहे. मात्र किवळे गावाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर सध्या अस्तित्वातील रस्ता तयार करण्यात आला. तो बनवताना काही बाधितांना झुकते माप तर काहींवर अन्याय, असा महापालिकेच्या स्थापत्यतील संबंधित अधिकाऱ्यांकडून अनुभव आला. त्यामुळे येथून पुढच्या काळात रुंदीकरण करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी महापालिकेने घ्यावी.
अविनाश पाटील, बाधित
---------
‘‘विकासनगरच्या या रस्त्यापैकी बहुतेक भाग हा रेड झोनमध्ये असल्याने महापालिकेला भूसंपादन करता येत नाही. त्यामुळे मोबदल्याचा प्रश्न आहे. महापालिका म्हणते अर्धा रस्ता करू, अर्धे पैसे घ्या पण हे कायद्यात बसत नाही, तसेच बाधितांना टीडीआर, एफएसआय पण मिळणार नाही. त्यामुळे कोणी बाधित रुंदीकरणासाठी जागा देण्यास पुढे येत नाही.
- रवींद्र नाना चव्हाण, बाधित व संचालक किवळे रावेत सोसायटी
किवळे गावचा गेल्या २५ वर्षात झपाट्याने विस्तार झाला आहे. विकासनगर एक मोठे उपनगर होण्याबरोबरच मोठी बाजारपेठ म्हणूनही उदयास आली आहे. त्यामुळे साहजिकच वाढलेल्या लोकसंख्येमुळे वाहतूक प्रचंड वाढली असून, त्याचा ताण सध्या अस्तित्वातील अरुंद रस्त्यावर आला आहे. पीएमपीएलच्या बसही बऱ्याचदा कोंडीत अडकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने रुंदीकरणासाठी प्राधान्याने पुढाकार घ्यावा.
- किसनराव नेटके, माजी ब प्रभाग अध्यक्ष व माजी नगरसेवक
‘‘विकासनगर येथे सध्या अस्तित्वातील रस्ता डीपीप्रमाणे केलेला नाही. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रस्ता झालेला आहे. प्रस्तावित डीपी हा सर्व्हे नंबर ४० आणि ४३ मध्ये जास्तीत जास्त येत आहे. पश्चिम बाजूला मात्र रहिवाशांनी रस्त्यासाठी जागा सोडलेली नाही. यावर आता महापालिकेला मार्ग काढावा लागेल.
सुदामराव तरस, माजी सरपंच, किवळे
फोटो ः २२०१