लोणावळा सहकारी बँक निवडणूकीत ''सहकार'' पॅनेलची बाजी

लोणावळा सहकारी बँक निवडणूकीत ''सहकार'' पॅनेलची बाजी

लोणावळा, ता. २७ : संपूर्ण लोणावळ्याचे लक्ष लागून राहिलेल्या लोणावळा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत लोणावळा सहकारी पॅनेलने बाजी मारली आहे. निवडणूक प्रक्रिया मुकुंद शहा यांच्या अध्यक्षतेखालील झाली. बॅंकेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष वीस आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संचालक मंडळाची निवडणूक झाली. निवडणुकीत संगीता गणपत भानुसघरे, धर्मा नामदेव ठोंबरे यांनी शहा यांच्या लोणावळा सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला होता. सहकार पॅनेल विरोधात सर्वसाधारण व इतर मागास वर्ग अशा दोन गटातून जितेंद्र बबन राऊत यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने निवडणुकीत त्यांचे आव्हान होते. बॅंकेच्या संचालक मंडळासाठी लोणावळ्यांसह, पुणे, कामशेत, चिंचवड, तळवडे, थेरगाव व राजगुरुनगर या सात शाखांमध्ये मतदानाची प्रक्रिया झाली.

लोणावळा सहकार पॅनेलचे उमेदवार सुनील लक्ष्मण गायकवाड हे अनुसूचित जाती-जमाती गटातून यापूर्वीच संचालक मंडळात बिनविरोध निवडून आले.
संचालक मंडळासाठी महिला प्रतिनिधी गटातून संगीता गणपत भानुसघरे, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून धर्मा नामदेव ठोंबरे यांनी तर राऊत यांनी दोन गटातून अर्ज दाखल केले होते. लोणावळा सहकार पॅनलमध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष मुकुंद मफतलाल शहा यांच्यासह सर्वसाधारण गटातून आठ जण रिंगणात होते. बॅंकेच्या एकूण ५ हजार ३६८ सभासदांपैकी २ हजार १२७ सभासदांनी मतदान केले. ९० मते अवैध ठरली. लोणावळ्यातील नगरपरिषद शाळा क्र. १ येथे सोमवारी मतमोजणी पार पडली. यामध्ये शहा यांच्या अध्यक्षतेखालील लोणावळा सहकार पॅनेलने एकतर्फी बाजी मारली. बॅंकेच्या संचालक मंडळावर निवडून आलेले प्रतिनिधी कंसात त्यांना मिळालेली मते सर्वसाधारण गट- मुकुंद शहा (१८५६) अॅड. भरत टकले (१८५७), कन्हैया भुरट (१८४७), संजीव खळदकर (१८३६), महेंद्र ओसवाल (१८२१), आशिष शहा (१८१८), सुधाकर भागवत (१८२०), अभय पारख (१८०६), महिला प्रतिनिधी गटातून प्रतिमा बलसारा (१८३८), सेजल शहा (१७८१), इतर मागास वर्गातून उदय सरवदे (१७२५), भटक्या विमुक्त जाती जमाती वर्गातून अप्पा चिंतामण जत्ती (१८४८) हे विजयी झाले. तर विरोधातील जितेंद्र राऊत यांना सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्गातून अनुक्रमे (३०१) व (३३७) मते मिळाली. संगीता भानुसघरे (१९९), धर्मा नामदेव ठोंबरे (१८६) यांना मते मिळाली.

(भाऊ म्हाळसकर, लोणावळा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com