लोणावळ्यात पावसाचा जोर; १३६ मिलीमीटर नोंद

लोणावळ्यात पावसाचा जोर; १३६ मिलीमीटर नोंद

Published on

लोणावळा, ता.२ : लोणावळा, खंडाळा परिसरात पावसाने जोरदार लावली असून मंगळवारी (ता.२) सकाळी १३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने काही भागांत झाडे उन्मळून पडली.
शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. कुरवंडे, कुसगाव, डोंगरगाव, औंढे, औंढोली, कार्ला, वेहेरगाव परिसरात रात्रभर जोरदार पाऊस होता. त्यामुळे, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले असून कुसगावचा काही भाग परिसर जलमय झाला होता. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
दरम्यान, लोणावळा परिसरातील भांगरवाडी, खंडाळा, तुंगार्ली स्मशानभूमी, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे, पोलिस वसाहत आदी ठिकाणी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. डॉ. बी.एन.पुरंदरे विद्यालयाजवळ विजेचा पोल आडवा झाला. त्यामुळे, परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. जोरदार पावसामुळे भुशी धरण भरले आहे. इंद्रायणी नदीवरील कार्लाजवळील पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने कार्ला ते मळवली रस्ता बंद झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.