लोणावळ्यात ‘बुलेट राजां’ना दणका
लोणावळा, ता. ३१ : पर्यटननगरी लोणावळा शहरात विनापरवाना वाहन चालवणारे आणि सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ‘बुलेट राजां’वर लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांत केलेल्या या विशेष मोहिमेत ९८ दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण दोन लाख १३ हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
लोणावळ्यातील मुख्य बाजारपेठ, शाळा आणि महाविद्यालय परिसरात सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या दुचाकींचा सुळसुळाट वाढला होता. या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. विना नंबरप्लेट आणि कागदपत्रे नसलेली वाहने जप्त करण्यात आली. लोणावळा शहर पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पूजा गव्हाणे, चमन शेख, कर्मचारी अनिल शिंदे, सचिन कडाळे, अमोल फाळके, आदम शेख आणि सुधीर शितोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयीन परिसरामध्ये सापळा रचून कर्णकर्कश सायलेन्सर, विना परवाना वाहन चालवणे आणि फॅन्सी नंबरप्लेट असे नियम मोडणाऱ्या तरुण चालकांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. पोलिसांच्या या धडक कारवाईचे लोणावळावासीयांनी स्वागत केले आहे. मात्र, ही कारवाई केवळ दोन दिवसांपुरती मर्यादित न ठेवता ती सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

