पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले मायलेकांचे प्राण

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले मायलेकांचे प्राण

गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. ३० : ती मूळची सोलापूर जिल्ह्यातील. पाच वर्षीय मुलासह पतीसमवेत राहते. पण, पती-पत्नीत नेहमीच वाद व्हायचे. त्याला कंटाळून तिने तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानक गाठले. धावत्या मालगाडीखाली आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात ती होती. ही बाब लोहमार्ग पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी लोहमार्गावर उडी घेऊन तिच्यासह तिच्या मुलाचे प्राण वाचवले.
गुरुवारी दुपारी साधारण एकच्या सुमारास रणरणत्या उन्हात तळेगाव रेल्वे स्टेशनच्या फलाटावर शुकशुकाट होता. त्यावेळी लोहमार्ग पोलिस श्याम केंद्रे आणि महिला पोलिस शुभांगी नलावडे फलाटावर गस्त घालत होते. पुण्याहून मुंबईकडे जाणारी मालगाडी येताना दिसली. तिच्यासमोर एक महिला पाच वर्षीय मुलासह गाडीखाली उडी मारण्याच्या तयारीत दिसली. त्याचक्षणी क्षणाचाही विलंब ना लावता प्रसंगावधान राखून केंद्रे आणि नलावडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत लोहमार्गावर उडी घेऊन त्या महिलेसह मुलाला बाजूला खेचत त्यांचा जीव वाचवला. तिला धीर देत विचारपूस केली. तेव्हा ती मूळची सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे समजले. कामानिमित्ताने पती आणि मुलासमवेत येथे राहते. पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या विचारात ती होती. तिच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर तो पळून गेला. तिकीट तपासनीस योगेश धोटे यांनी महिलेची समजूत काढली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी तिच्या नातेवाइकांना बोलावून महिला आणि मुलास त्यांच्या स्वाधीन केले.

कौटुंबिक वादातून बऱ्याच वेळा आत्महत्येच्या घटना होत असतात. अशा वेळी आपल्या लहान मुलांसह कुटुंबीयांचा विचार केला तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची गरज पडणार नाही. समुपदेशन तसेच सकारात्मक विचाराने आत्महत्येच्या विचारांवर मात केली जाऊ शकते.’’
- श्याम केंद्रे, लोहमार्ग पोलिस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com