राजमाता जिजाऊ उद्यानातील विकासकामांचा ‘चिखल’

राजमाता जिजाऊ उद्यानातील विकासकामांचा ‘चिखल’
Published on

पिंपळे गुरव, ता. २६ ः पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील विकासकामे गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने उद्यानाच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसामुळे उद्यानातील जॉगिंग व वॉकिंग ट्रॅकवर पाणी साचत असून, अनेक ठिकाणी चिखल झाले आहे. त्यामुळे नियमित चालण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह महिला व इतर नागरिकांची गैरसोय होत आहे. उद्यानातील वॉकिंग ट्रॅकची योग्य देखभाल व दुरुस्ती न झाल्याने पावसाचे पाणी निचरा न होता जागोजागी साचत आहे. त्यामुळे नागरिकांना चिखलातून वाट काढत चालावे लागत आहे. उद्यानातील आकर्षण म्हणून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले कारंजेही सुरुवातीपासूनच नादुरुस्त असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सध्या या कारंजामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिसरातील या उद्यानात नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अर्धवट राहिलेली विकासकामे तातडीने पूर्ण करून उद्यानाची नियमित स्वच्छता व देखभाल करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांच्या आरोग्यास धोका
उद्यानात साचलेल्या पाण्यामुळे डास व माशांचा प्रादुर्भाव वाढल्यास नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, गर्भवती महिला तसेच छायाचित्रण व व्हिडिओ तयार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची येथे वर्दळ असते. या नागरिकांना संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने उद्यानातील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून स्वच्छता व डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

उद्यानातील समस्यांबाबत तात्काळ कारवाई करून संबंधित विभागांना सूचना देण्यात येतील. येथील ठेकेदारांना आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याच्या सूचना दिल्या जातील. तसेच विद्युत विभागाशी संपर्क साधून उद्यानातील विद्युत व्यवस्थेतील काही त्रुटी असल्यास त्या देखील तातडीने दुरुस्त करून घेतल्या जातील.
- महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक, महापालिका

राजमाता जिजाऊ उद्यानात दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, वॉकिंग ट्रॅकवर पाणी साचणे, चिखल होणे आणि ठिकठिकाणी अस्वच्छता यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांचीच गैरसोय होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. महापालिकेने केवळ पाहणी न करता तातडीने दुरुस्ती व स्वच्छतेची कामे करून उद्यान नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ करावे.
- कविता बाराथे, स्थानिक गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com