Ajit Gavhane and Mahesh Landage
Ajit Gavhane and Mahesh LandageSakal

Vidhansabha Byelection : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक; महाविकास आघाडीत जागा कोणाला?

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला आहे.
Summary

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला आहे.

पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत असल्यामुळे भाजपमध्ये जगताप कुटुंबीयामधील सदस्याला उमेदवारी देण्याबाबत दुमत नाही. तर; दुसरीकडे महाविकास आघाडीद्वारे निवडणूक लढविण्याबाबत एकमत झाल्याने ही जागा कोणाकडे जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे. त्यामुळे भाजपासह सर्वच पक्षांकडून उमेदवार देण्याबाबत सध्या चाचपणी सुरू आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीची शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. २५) बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पक्षाची भूमिका मांडताना ही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांना भेटून बोलणार असल्याचेही स्पष्ट केले होते. तर; जगताप कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु; उमेदवारी हा पक्षातील प्रक्रियेनुसार प्रदेशामार्फत कोअर कमिटी व तेथून पार्लमेंटरी बोर्डाकडे नावे जातात व अंतिम घोषणा पार्लमेंटरी बोर्डाकडून दिल्लीतून होते, हे स्पष्ट केले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे माध्यमांना त्याच दिवशी भोसरीत सांगितले होते.

बिनविरोधसाठी प्रयत्न अन तयारीही...

एकीकडे बिनविरोधसाठी भाजपच्या प्रदेश पातळीवर देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व चंद्रकांत पाटील आदी नेतेमंडळी प्रयत्न करत असतानाच शहरात भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी शहरातील स्थानिक नेत्यांसह विरोधी पक्षातील स्थानिक नेत्यांना भेटून पत्र देत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत मागणी केलेली आहे. लांडगे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सचिन भोसले, कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांना भेटले. लांडगे यांच्यासमवेत प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, सचिव अमित गोरखे, अमोल थोरात, मोरेश्‍वर शेडगे, अनुप मोरे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते. त्याचवेळी भाजपने शहरात चिंचवड मतदारसंघातील १२ प्रभागांमध्ये आज तयारीच्या बैठका लावल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या रविवारी (ता. २९) सकाळी होणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम मतदारसंघातील सुमारे १३० केंद्रांवर होणार असून, यात ५१० बुथचे प्रत्येकी ३० कार्यकर्ते सहभागी होणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक...

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आग्रही मागणी केल्यामुळे बिनविरोधची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुंबईत महाविकास आघीडीच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी मागील निवडणूक राहुल कलाटे यांनी अपक्ष लढली असली व त्यांना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी कलाटे हे त्यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमच्या पक्षाचे गटनेते होते. त्यामुळे ही जागा आम्हालाच सोडावी, अशी आम्ही मागणी केल्याचे माध्यमांना सांगितले होते. याबाबत महाविकास आघाडीची अंतिम निर्णयाची बैठक २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सावंत हे दिवंगत आमदार जगताप यांच्या बंधूचे व्याही आहेत. त्यामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे भाजपला ही जागा बिनविरोध देण्याची शक्यता खूप कमी असल्याचेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

अजित पवार यांच्या भूमिकेकडेही लक्ष...

पिंपरी-चिंचवडमध्ये मागील पंचवार्षिक वगळता सलग १५ वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. शहराचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होते व सध्याही आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे निर्णय घेताना प्रदेश पातळीवरील नेते लक्ष घालत नाहीत. येथे अजित पवार यांचा अंतिम शब्द मानला जातो. त्यातच लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीत असताना अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे अजित पवार यांना प्रेमाचा उमाळा आला तर; ते जगताप यांना बिनविरोध देण्याबाबत घोषणा करू शकतात, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातही दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक राहणार असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com