चिंचवडमध्ये पत्नीचा 
छळ करून घरातून हाकलले

चिंचवडमध्ये पत्नीचा छळ करून घरातून हाकलले

पिंपरी, ता. ९ : विवाहितेला माहेराहून चारचाकी व सोन्याचे दागिने आणण्यास सांगत मानसिक व शारीरिक छळ केला. त्यानंतर पतीने पत्नीला तीन वेळा तोंडी तलाक बोलून घरातून हाकलून दिले. याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवड येथे घडला.
विवाहितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती ईलाही इस्माईल शेख (वय ३९), सासरा इस्माईल शेख (वय ६५) दिर जावेद शेख (वय ३३) व तीन महिला आरोपी (सर्व रा. टिपू सुलतान झोपडपट्टी, डी मार्ट जवळ, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांना त्यांच्या माहेरच्या लोकांविषयी वाईट बोलून लग्नात काही घेऊन न आल्याने फिर्यादीला आरोपींनी शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिच्या माहेराहून चारचाकी गाडीची व दागिन्यांची मागणी केली. पतीने पत्नीच्या नकळत दुसरे लग्न केले. याचा जाब विचारण्यासाठी विवाहितेच्या माहेरचे लोक गेले असता इलाही याने विवाहितेला तोंडी तीन वेळा तलाक दिला व घरातून हाकलून दिले.

रिक्षा घेण्यावरून डोक्यात घातला दगड
पिंपरी, ता. ९ : रिक्षा घेण्यावरून झालेल्या भांडणात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना देहूरोड येथे सीओडी डेपोजवळ घडली. रमेश सोनबा मेटकरी (वय ३४, रा. आदर्श कॉलनी, आदर्शनगर, किवळे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनंत लक्ष्मण झिंबल (वय ३४, रा. आदर्श कॉलनी, आदर्शनगर, किवळे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र अनंत हे पेंटिंगचे काम संपवून मेटकरी यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान, सीओडी डेपोजवळ आल्यानंतर ते रस्त्याच्या बाजूला थांबले. तिथे रिक्षा घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याने अनंत याने रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड मेटकरी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

मुलीचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोडप्रकरणी गुन्हा
अल्पवयीन मुलीचे फोटो तिच्या परवानगीशिवाय इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शिरगाव येथे घडला. अमोल भोसुरे धानोरी, ता. शिरूर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. आरोपीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिर्यादीचा फोटो व त्याचे फोटो फिर्यादीच्या परवानगीशिवाय अपलोड केले. आक्षेपार्ह मजकूर लिहिला. त्यानंतरही वेळोवेळी फिर्यादीचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केले.

पिंपरीत मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
मुलाला ओरडल्याच्या रागातून दिराने व त्याच्या पत्नीने भावजयला मारहाण केली. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली. विकी महेश वाल्मीकी, त्याची पत्नी (दोघेही रा. विठ्ठलनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २४ वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या दिराच्या दहा वर्षीय मुलाने घरासमोर कागदाचा कचरा टाकला. त्यामुळे फिर्यादी पुतण्याला ओरडल्या. त्या कारणावरून विकी व त्यांच्या पत्नीने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीच्या मुलीच्या हातावर मारून तिलाही जखमी केले.


किवळेतील घरफोडीत पाऊण लाख लंपास
दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने पाऊण लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना किवळे येथे घडली. प्रसाद सदाशिव जाधव (रा. वरदविनायक अपार्टमेंट, विकासनगर, किवळे ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कुलूप तोडून घरात शिरल्यानंतर आरोपीने ७१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चार हजारांची रोकड लंपास केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com