आव्हान, मतदानाचा टक्का वाढविण्याचे

आव्हान, मतदानाचा टक्का वाढविण्याचे

पिंपरी, ता. २२ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन नियमित निवडणुका झाल्या आहेत. आता पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पूर्वीच्या तीनही वेळी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी नसतानाही केवळ ५७ टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. आता सार्वजनिक सुटीच्या दिवशी रविवारी मतदान होत आहे. त्याआधीचा शनिवार म्हणजे अनेकांच्या विकेंडची सुरुवात. त्यामुळे अनेक जण फिरायला जाण्याची शक्यता असल्याने मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक विभागासह राजकीय पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांपुढे आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (ता. २७) मतदान घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र, बारावीची परीक्षा सुरू असल्याने मतदानाची तारीख रविवारी (ता. २६) ठेवली आहे. ती अवघ्या चार दिवसांवर आली आहे. मात्र, मतदारसंघाच्या आतापर्यंतच्या तीन निवडणुकांचा विचार केल्यास मतदारांची उदासीनता दिसून येत आहे. २००९, २०१४ आणि २०१९ ची टक्केवारी पाहता खूपच कमी मतदान झालेले आहे. एकीकडे राज्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ असा लौकिक असलेल्या चिंचवडमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यास निवडणूक विभागासह राजकीय पक्ष, त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना फारसे यश आलेले नाही, असे दिसते.

केवळ २० ते ३० टक्क्यांचे आमदार
- २००९ च्या निवडणुकीत तीन लाख ९१ हजार ८५७ एकूण मतदार होते. त्यातील एक लाख ९७ हजार ९२८ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी अवघी ५०.५१ होती. निवडून आलेल्या उमेदवाराला ७८ हजार ७४१ मते मिळाली होती. एकूण मतदारांचा विचार करता केवळ २०.०५ टक्के मतदारांनी निवडून दिलेल्या आमदाराने मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

- २०१४ च्या निवडणुकीत चार लाख ८४ हजार ३५१ एकूण मतदार होते. त्यातील दोन लाख ७२ हजार ५५७ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी अवघी ५६.९३ होती. निवडून आलेल्या उमेदवाराला एक लाख २३ हजार ७८६ मते मिळाली होती. एकूण मतदारांचा विचार करता केवळ २५.५५ टक्के मतदारांनी निवडून दिलेल्या आमदाराने मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

- २०१९ च्या निवडणुकीत पाच लाख दोन हजार ८६५ एकूण मतदार होते. त्यातील दोन लाख ७८ हजार ३७४ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी अवघी ५३.६९ होती. निवडून आलेल्या उमेदवाराला एक लाख ५० हजार ७२३ मते मिळाली होती. एकूण मतदारांचा विचार करता केवळ २९.९७ टक्के मतदारांनी निवडून दिलेल्या आमदाराने मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

मतदानाची तारीख व वार
वर्ष / तारीख / वार
२००९ / १३ ऑक्टोबर / मंगळवार
२०१४ / १५ ऑक्टोबर / बुधवार
२०१९ / २१ ऑक्टोबर / सोमवार

वर्षनिहाय उमेदवार
वर्ष / पक्षाचे / अपक्ष / एकूण
२००९ / ५ / ९ / १४
२०१४ / ८ / १६ / २४
२०१९ / ६ / ५ / २१

आता मतदारांची संख्या
पुरुष / ३,०२,२४६
महिला / २,६५,९७४
इतर / ३४
एकूण / ५,६८,२५४

एकूण मतदारांमध्ये...
दिव्यांग / १२,३१३
८० वर्षांवरील / ९,९२६

अनिवासी भारतीय / ३३१
सैनिक मतदार / १६८

कोट
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला मतदार चिठ्ठीचे वाटप केले जात आहे. पथनाट्य, कलापथके, बैठकी, कार्यशाळा, शिबिरांचे माध्यमातून मतदार जागृती केली जात आहे. मतदार कसे करावे याबाबत मार्गदर्शिका तयार केली असून प्रत्येक मतदारांपर्यंत ती पोहोचविण्याची कार्यवाही सुरू आहे. दिव्यांग, ८० वर्षांवरील मतदारांपर्यंत जाऊन त्यांना माहिती दिली जात आहे. महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत आवाहन केले जात आहे.
- सचिन ढोले, निवडणूक निर्णय अधिकारी, चिंचवड विधानसभा

निवडणूक निहाय चिंचवडची स्थिती
२००९ चे उमेदवार व मतदान
उमेदवार / पक्ष / मतदान / टक्के
लक्ष्मण जगताप / अपक्ष / ७८,७४१ / ३९.७८
श्रीरंग बारणे / शिवसेना / ७२,१६६ / ३६.४६
भाऊसाहेब भोईर / कॉंग्रेस / २४,६८४ / १२.७४
विलास नांदगुडे / अपक्ष / १५,५६१ / ७.८६
विजय वाघमारे / बसप / २,७१४ / १.३७
(विश्लेषण ः २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या जागा वाटपात चिंचवडची जागा कॉंग्रेसकडे गेल्याने राष्ट्रवादीचे लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला होता.)

२०१४ चे उमेदवार व मतदान
उमेदवार / पक्ष / मतदान / टक्के
लक्ष्मण जगताप / भाजप / १,२३,७८६ / ४५.४२
राहुल कलाटे / शिवसेना / ६३,४८९ / २३.३९
विठ्ठल काटे / राष्ट्रवादी / ४२,५५३ / १५.६१
मोरेश्वर भोंडवे / अपक्ष / १३,९५२ / ५.१०
कैलास कदम / कॉंग्रेस / ८,६४३ / ३.२०
(विश्लेषण ः लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यावेळी महायुती किंवा महाविकास आघाडी न करता भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यात जगताप विजयी झाले.)

२०१९ चे उमेदवार व मतदान
उमेदवार / पक्ष / मतदान / टक्के
लक्ष्मण जगताप / भाजप / १,५०,७२३ / ५५.३
राहुल कलाटे / अपक्ष / १,१२,२२५ / ४१.२
राजेंद्र लोंढे / बसप / ३,९५४ / १.५
रवींद्र पारधे / अपक्ष / १,४७५/ ०.५
महावीर संचेती / भाराप / ९०३ / ०.३
(विश्लेषण ः भाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडी होती. भाजपने जगताप यांना उमेदवारी दिली. शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. तांत्रिक कारणामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्याने त्यांनी कलाटे यांना पाठिंबा दिला. जगताप विजयी झाले.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com