देहूरोडमध्ये तरुणाला 
दांडक्याने मारहाण

देहूरोडमध्ये तरुणाला दांडक्याने मारहाण

पिंपरी : दुचाकी उभी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला दांडक्याने मारहाण केली. ही घटना देहूरोड येथे घडली. करण बलराज कागडा (रा. पारशीचाळ, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप दिलबाग बोत (वय ३५, रा. पारशीचाळ, देहूरोड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे घरात असताना त्यांचा लहान भाऊ राहुल दुचाकीवरून घरी आला. घराशेजारी दुचाकी उभी करून घरात येत असताना दुचाकी लावण्यावरून आरोपीशी वाद झाला. त्यामध्ये राहुल यांना शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण केल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून एकाने महिलेवर अत्याचार केला. तसेच दुसऱ्या व्यक्तीने तिची आर्थिक फसवणूकही केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार रूपेश शालीग्राम धुरइ (वय ३८, रा. कलावतीनगर, नागपूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने शादी डॉट कॉम या साईटवरून फिर्यादीशी ओळख वाढवली. इंडियन ऑइल अँड नॅचरल गॅस रिसोर्समध्ये नोकरी करीत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. लग्नाच्या आमिषाने फिर्यादीशी वेळोवेळी शरीरसंबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिला. फिर्यादीच्या परिचयाच्या अभिजित मदने याने कमी किमतीत गाड्या मिळवून देण्याच्या बहाण्याने साडे सात लाख रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केली.

दोन दुचाकींच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना खालुंब्रे येथे घडली. मयूर मारुती बोंबले (वय २८, रा. येलवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. घनशाम बाळासाहेब गाडे (रा. येलवाडी, ता. खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बळिराम शिवाजी देवकाते (रा. देहूगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे मेहुणे मयूर हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. दरम्यान, समोरून देवकाते हा दुचाकीवरून वेगात आला. त्याने समोरून मयूर यांच्या दुचाकीस जोरात धडक दिली. त्यात मयूर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, देवकाते यालाही गंभीर दुखापत झाली.

बसमधील प्रवाशाकडून महिलेचा विनयभंग
बसमधून प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाने महिलेसोबत गैरवर्तन करीत विनयभंग केला. हा प्रकार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळ घडला. चंद्रकांत भिकाजी जाधव (वय ४४, रा. लिंबोनी बाग, गोवंडी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित महिलेने शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला मंगळवारी मध्यरात्री फलटण ते मुंबई असा बसने प्रवास करीत होत्या. दरम्यान, बस प्रवासात जाधव हा फिर्यादी यांच्या शेजारी बसला होता. बस पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने उर्से टोलनाक्याजवळ आली असता जाधव याने झोपेचे सोंग घेऊन महिलेशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.

तरुणाचा मोबाईल हिसकावला
पादचारी तरुणाच्या हातातील दहा हजारांचा मोबाईल तीन चोरट्यांनी हिसकावला. ही घटना देहूरोड येथे घडली. देवआदित्य सिंग (वय १९, रा. मामुर्डी) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सिंग हे कुणाल आयकोनिया सोसायटीच्या बाहेरील देहूरोडच्या दिशेने सेवा रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून तिघेजण त्यांच्याजवळ आले. तिघांनी त्यांच्या हातातील १० हजारांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला व पळ काढला.

पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली
पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड लाखाची सोनसाखळी हिसकावली. ही घटना चिंचवड येथील रिव्हर व्ह्यू चौक येथे घडली. याबाबत ४० वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या रिव्हर व्ह्यू चौकातील सिद्धिविनायक हॉल येथून पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली व तेथून पळ काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com