मतदान यंत्राबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

मतदान यंत्राबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पिंपरी, ता. २३ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या रविवारी (ता. २६) होणाऱ्या मतदानासाठी ‘ईव्हीएम’चा वापर केला जाणार आहे. मतदान कामकाजासाठी नियुक्त केंद्रप्रमुखांसह इतर कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रशिक्षण झाले. या उपक्रमाची पाहणी निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी केली. मतदान करताना अडचणी येऊ नयेत, आल्यास त्या कशा सोडवाव्यात, मतदान झाले किंवा नाही, ईव्हीएम यंत्र हाताळणी, मतदान प्रक्रियेवेळी मशिन सीलबंद करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांच्या नियंत्रणाखाली तज्‍‌ज्ञ प्रशिक्षक म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक आणि निदेशक यांची नेमणूक केली आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी आवश्यक निवडणूक साहित्याचे पॅकिंग आणि वितरणाच्या कामाची पाहणीही सत्यनारायण यांनी केली.

मतदान केंद्रावरील आढावा
मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रांवरील सोयी-सुविधांचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी गुरुवारी घेतला. सेक्टर अधिकारी, मतदान कामकाजाचे साहित्य वाटप आणि स्वीकृत करणारे कर्मचारी बैठकीस उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड, थॉमस नरोन्हा, टपाल कक्ष समन्वय अधिकारी राजेश आगळे, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड, नायब तहसीलदार संतोष सोनवणे आदी उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतदान केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा, मतदान साहित्य, टेबल, खुर्च्या, इतर फर्निचर, विद्युत व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, एकाच जागी दोन केंद्र असल्यास दुभाजक व्यवस्था, मतदान साहित्य वाटप आणि स्वीकृती याची पाहणी केली. मतदारांशी सौजन्याने वागावे, केंद्रावर गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, नियमांचे तंतोतंत पालन होईल याची खबरदारी घ्यावी, कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न उद्भवल्यास त्वरित पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, अशा सूचनाही ढोले यांनी दिल्या.
फोटो ः 26668

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com