गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार कासारवाडी व चिंचवड येथे घडला.
पृथ्वीराज जाधव (वय २०, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीच्या सोळा वर्षीय मुलीशी सोशल मीडियावरून मैत्री वाढवली. पीडित मुलीचा विश्वास संपादन केला. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. यामध्ये पीडित मुलगी गर्भवती राहिली.
--------------------
काळेवाडीत तरुणाला बेल्टने बेदम मारहाण
पिंपरी : किरकोळ कारणावरून तरुणाला बेल्टने बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यास आलेल्या लोकांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार काळेवाडी येथे घडला. गणेश रामचंद्र मेमाणे (रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदेश ऊर्फ शिलव्या लाजरस चोपडे (वय ३२, रा. अमरदीप कॉलनी, काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे ज्योतिबानगर येथील त्यांच्या घराशेजारी उभे होते. दरम्यान, आरोपी यास फिर्यादीने त्याच्या घरात झोपू न दिल्याच्या कारणावरून बेल्टने फिर्यादीच्या डोक्यात, हातावर, मानेवर व पाठीवर मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. भांडणे सोडविण्यास आलेल्या लोकांना व फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली.

--------------------
पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला
फोनवर बोलत जात असलेल्या पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावला. ही घटना हिंजवडी येथे घडली. सौरभ विनोद वानखडे (रा. शिंदेवस्ती, मारुंजी, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे हिंजवडी येथील पद्मभूषण चौकाकडून लक्ष्मी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने फोनवर बोलत पायी जात होते. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवरून दोघे आरोपी आले. त्यातील एकाने फिर्यादी यांना पाठीमागून पकडून त्यांच्या हातातील आठ हजारांचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
-------------------------
तीन किलो गांजा जप्त, एकाला अटक
बेकायदारित्या गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. आरोपीकडून तीन किलो गांजा जप्त केला. ही कारवाई म्हाळुंगे येथे करण्यात आली. कमलेश ज्ञानेश्वर भोसले (रा. तळेगाव-चाकण रोड, म्हाळुंगे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नितीन भोपळे (वय ३२, रा. गेवराई, जि.बीड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी कमलेश याच्याकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार तळेगाव-चाकण रोडवरील म्हाळुंगे येथील एका टपरी समोर कमलेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तीन किलो वजनाचा ७५ हजार १५० रुपये किमतीचा गांजा सापडला. हा गांजा त्याने नितीन याच्याकडून आणल्याचे त्याने सांगितले.
------------------
दोन घरफोडीत सव्वा लाखांचा ऐवज लंपास
मावळ तालुक्यातील आढले येथे घरफोडीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये चोरट्याने सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. मयूर मनोहर भोईर (रा. आढले खुर्द, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तसेच फिर्यादी यांचे चुलत भाऊ व त्यांचे कुटुंबही घराला कुलूप लावून मोशी येथे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरटा फिर्यादी व त्यांच्या चुलत भावाच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरला. सोने-चांदीचे दागिने, रोकड व घड्याळ असा एकूण एक लाख १८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
----------------
चाकू बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
बेकायदेशीररीत्या चाकू बाळगल्याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई खराबवाडी येथे करण्यात आली.
वैभव काशिनाथ बाचणे (वय २४, रा. मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ- परभणी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे चाकू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून चाकू जप्त केला.

------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com