मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्सुकता

मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्सुकता

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी (ता. २) लागणार आहे. रिंगणात २८ उमेदवार असले तरी महायुतीतील भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत झाली असल्याचे मतदानाच्या दिवशी दिसून आले. पण, २००९, २०१४ व २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहात चिंचवडमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चुरस पाहायला मिळाली आहे. याहीवेळी तीच स्थिती असेल व शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून ठेवणारा व मिळणाऱ्या मतांचा आलेख नेहमी हलता राहणारा निकाल असेल असे दिसते. कारण, तिन्ही उमेदवार राहात असलेल्या व त्यांचा प्रभाव असलेल्या भागांचा विचार केल्यास शेवटच्या टप्प्यात या भागांतील मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत.

उत्सुकतेचे कारण
मतदारसंघाच्या उत्तरेकडून पूर्वेकडे व पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी पद्धतीने दक्षिणेपर्यंतच्या मतदान केंद्राची रचना आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या उत्तरेकडील मतदान केंद्र अर्थात मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत येथील केंद्रांवरील मतमोजणीला प्रथम प्रारंभ होईल. तत्पूर्वी टपाली मतांची मोजणी होईल. रावेतनंतर वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, दळवीनगर, चिंचवड, पुनावळे, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी अशा क्रमाने मतमोजणी होईल. उमेदवारांचे कार्यक्षेत्र पाहता राष्ट्रवादीचे नाना काटे पिंपळे सौदागरला राहायला आहेत. त्यांचे काळेवाडी, रहाटणी भागातही वर्चस्व आहे. अपक्ष राहुल कलाटे वाकडला राहायला असून, त्यांचे पिंपळे निलख व पुनावळेत वर्चस्व आहे. भाजपच्या अश्विनी जगताप पिंपळे गुरवला राहायला असून, त्यांचे गावठाणासह सुदर्शननगर, नवी व जुनी सांगवीत वर्चस्व आहे आणि सर्वात शेवटी याच भागातील मतांची मोजणी होणार असल्याने व यापूर्वीचे निवडणूक निकालांनी याच भागात कलाटणी दिलेली असल्याने शेवटपर्यंत उत्सुकता राहणार आहे.

निवडणुकांची स्थिती व बदलेली समीकरणे
२००९ ची वस्तुस्थिती ः भाजप-शिवसेना युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. शिवसेनेचे श्रीरंग बारणे व कॉंग्रेसचे भाऊसाहेब भोईर उमेदवार होते. लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी सोडून अपक्ष निवडणूक लढवली आणि सहा हजार ५७५ मतांनी विजय मिळवला. त्यावेळी ५०.५१ टक्के मतदान झाले होते. बारणे यांना पहिल्यापासून अर्थात मामुर्डीगावापासून आघाडी होती. पिंपळे सौदागरपर्यंतच्या मतमोजणीपर्यंत ते पुढेच होते. पण, सुदर्शननगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवीतील मतांनी जगताप यांना विजय मिळवून दिला.

आताची समीकरणे ः लक्ष्मण जगताप यांच्याकडून २००९ मध्ये पराभूत झालेले श्रीरंग बारणे शिवसेनेचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) खासदार आहेत. भाजपशी युती असल्याने त्यांनी जगताप यांच्या पत्नी व भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा प्रचार केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदेही येऊन गेले आहेत. भाऊसाहेब भोईर कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले आहेत. आता राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचे ते प्रचारप्रमुख आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधून प्रचाराची सांगता केली आहे.

२०१४ ची वस्तुस्थिती ः लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. युती व आघाडीऐवजी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. शिवसेनेचे राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नाना काटे, कॉंग्रेसचे कैलास कदम रिंगणात होते. मोरेश्वर भोंडवे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे चुरस वाढली. त्यावेळी ५६.९३ टक्के मतदान झाले होते. मतविभागणीचा फटका राष्ट्रवादीसह कॉंग्रेसला बसला. जगताप यांनी ६० हजार २९७ मतांनी बाजी मारली. कलाटे द्वितीय व काटे तृतीय स्थानी राहिले.

आताची समीकरणे ः भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडी असा सामना झाला. त्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) राहुल कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याने तिरंगी लढत झाली. त्यांचे
शिवसेनेतील काही समर्थकांनी त्यांना सहकार्य केले. जगताप यांचे चुलत बंधू व माजी अपक्ष नगरसेवकाने त्यांचा उघडपणे प्रचार केला. २०१४ मध्ये प्रतिस्पर्धी असलेले मोरेश्वर भोंडवे व कैलास कदम महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यामुळे त्यांचा फायदा काटे यांना होऊ शकतो.


२०१९ ची वस्तुस्थिती ः भाजप-शिवसेना महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडी अशी स्थिती होती. भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून प्रशांत शितोळे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, शिवसेनेतील राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपला आव्हान दिले. त्यामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने त्यांना पुरस्कृत केले. दुरंगी लढत झाली. त्यावेळी ५३.६९ टक्के मतदान झाले होते. त्यात जगताप यांनी कलाटे यांच्यापेक्षा ३८ हजार ४९८ मते अधिक मिळवून विजय साकारला.

आताची समीकरणे ः जगताप यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप भाजप अर्थात महायुतीच्या उमेदवार आहेत. पण, २०१९ चा घटक पक्ष शिवसेनेत फूट पडल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा गट भाजपसोबत आहे. तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गट महाविकास आघाडीत आहे. त्यांचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यामुळे २०१४ चे प्रतिस्पर्धी जगताप, काटे व कलाटे पुन्हा समोरासमोर आले आहेत. २०१९ ला सोबत असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीची कलाटे यांना साथ नाही. त्यावेळी सोबत असलेले काटे प्रतिस्पर्धी आहेत.


मतांची आकडेवारी काय सांगते
प्रभाग / मतदान / टक्केवारी
रावेत, किवळे, मामुर्डी / २६०३७ / ४८.३३
वाल्हेकर वाडी, भोईरनगर / २८४८४ / ४८.८६
चिंचवडगाव, तानाजीनगर / २३२८० / ५०.३६
काळेवाडी, विजयनगर / २१२४४ / ५०.९८
थेरगाव / १६९५० / ५३.१९
संतोषनगर, गणेशनगर / १६२४६ / ५३.१४
वाकड, पुनावळे / २०४६५ / ५०.९३
पिंपळे निलख, वाकड / २५०७९ / ४७.७८
रहाटणी, काळेवाडी / २८३७० / ५४.५८
पिंपळे सौदागर / १८०६५ / ४५.३३
पिंपळे गुरव, सुदर्शनगर / २३३६१ / ५३.१२
नवी सांगवी, काटेपुरम / २२२५५ / ५१.४३
जुनी सांगवी, शितोळेनगर / १७३०९ / ४९.४७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com