SSC Exam 2023 : दहावी परीक्षेची भीती कशाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam
दहावी परीक्षेची भीती कशाला?

SSC Exam 2023 : दहावी परीक्षेची भीती कशाला?

पिंपरी : दहावी आणि बारावीचे वर्ष म्हटले की, अगदी शेवटची परीक्षा संपता संपताच, अभ्यासाला सुरुवात होते. मग वर्षभर पाठांतर, ठरवलेला अभ्यास, क्लासेस, आई-बाबांचे आणि शिक्षकांचे सल्ले आणि दरदिवशी काही प्रमाणात येणारे टेन्शन.

मग नेमके काय करायचे, असे अनेक प्रश्‍न ऐनवेळी पडतात. अशावेळी अभ्यास झालेला असतानाही काहीजण आत्मविश्वास गमावून बसतात. काही निराश, नाउमेद होतात, तर काही आजारी पडतात. काही कॉपी करण्यास प्रवृत्त होतात. काही स्वत:ला घरात कोंडून घेतात, तर काही पळून जातात. काहीजण स्वत:चा लाखमोलाचा जीवही गमावून बसतात.

असे होऊ नये म्हणून इतरांशी तुलना न करता, स्वत:तील गुण, क्षमता आणि मर्यादा ओळखून स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करावा. शाळा, अभ्यास, खेळ, वाचन आणि मनोरंजन यांची छानशी सांगड घालावी, असा सल्ला सपुदेशकांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

अभ्यास आणि आहार
- परीक्षेच्या काळात अभ्यासापासून ते खाण्यापिण्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
- सगळा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात वेळ घालवू नका.
- मोठ्या प्रश्‍नांची उत्तर लक्षात राहावीत म्हणून ती समजून घ्या.
- अभ्यासाला सुरुवात आवडत्या विषयाने करा.
- किमान पंधरा मिनिटे व्यायाम करा.
- नियमित आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.
- फळ किंवा फळांचा रस जास्तीत जास्त घ्या.
- चहा-कॉफी फार प्रमाणात घेऊ नका.

- पालकांसाठी..
- टेन्शन घेऊ नका आणि मुलांनाही देऊ नका.
- घरातलं वातावरण हलकंफुलकं राहू द्या.
- होऊन गेलेल्या पेपरविषयी चर्चा करू नका.

‘‘दिवसभराचे वेळापत्रक बनवावे. एखाद्या विषयाचे टेन्शन आले की, झालेल्या अभ्यासाची उजळणी करा. अभ्यासात सातत्य, एकाग्रता, सराव, जिद्द ठेवावी आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.’’
-डॉ.मंगल शिंदे, समुपदेशिका

‘‘विद्यार्थ्यांनी कोणताही ताणतणाव न घेता दहावीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. वेळेचे नियोजन करा. सध्या ऋतू बदल होत आहे त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या. परीक्षा कालावधीमध्ये हलका आहार घ्या. परीक्षेचे वेळापत्रक व्यवस्थित पाहणे. त्याप्रमाणे परीक्षेला आपल्या केंद्रावर उपस्थित राहावे.’’
-प्रा. संगीता निंबारकर, समुपदेशिका