व्यावसायिकाला दांडक्याने 
बेदम मारहाण करून ऐवज लुटला

व्यावसायिकाला दांडक्याने बेदम मारहाण करून ऐवज लुटला

पिंपरी, ता. २ : व्यावसायिकाला दांडक्याने बेदम मारहाण करून ऐवज लुटल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली. तर इतर दोघांवर गुन्हा दाखल आहे. हा प्रकार भोसरी एमआयडीसी येथे घडला.
संदीप दत्तात्रेय मुळूक (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास मामनचंद गोयल (वय ४०, रा. पार्कस्ट्रीट रोड, वाकड), इमरान मेहबूब अत्तार (वय ३७, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली असून, इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादीला भेटण्यासाठी बोलवले असता फिर्यादी हे भोसरी एमआयडीसी येथे गेले. सकाळी गाडीला कट मारल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना दांडक्याने मारहाण केली. ‘याला मारून टाका, खल्लास करा,’ असे ओरडून सांगितले असता दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व ब्रेसलेट असा तीन लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. दरम्यान, फिर्यादीचे मित्र व कामगार फिर्यादीला घेऊन जाण्यासाठी त्याठिकाणी आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. फिर्यादीच्या कामगाराच्या गाडीस धडक देऊन ही गाडी क्रेनवर धडकून गाडीचे नुकसान केले.

भांडण सोडविल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
भांडण सोडविल्याच्या रागातून तरुणाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. हा प्रकार बावधन येथे घडला. पंकज धनराज हंदराळे (रा. बावधन बुद्रुक) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ वाघमारे, साईराज दगडे, ऋषिकेश दगडे, प्रणव दगडे (सर्व रा. बावधन) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी राहत असलेल्या लहान मुलांची गल्लीतील लहान मुलांची सिद्धार्थ याच्याबरोबर भांडणे झाली होती. ते भांडण फिर्यादीने मिटविल्याचा राग मनात धरून आरोपी सिद्धार्थ याने बांबूने फिर्यादीला मारहाण केली. तसेच त्याच्यासोबत आलेल्या साईराज याने बांबूने, ऋषिकेश याने चाकूने तर प्रणव याने बांबूने व दगडाने मारहाण केली.

पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली
वॉकिंगसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ऐंशी हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली. ही घटना निगडी येथे घडली. महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला त्यांच्या पत्नीसह वॉकिंग करीत होत्या. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले व ऐंशी हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

साहित्य घेण्याच्या बहाण्याने घेतला घराचा ताबा
बँकेने लिलाव केलेल्या घरातील साहित्य देण्यासाठी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आले असता त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत घराचा बेकायदेशीररीत्या ताबा घेतल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार निगडी, प्राधिकरण येथे घडला. उमेश किसन महाजन (रा. बदलापूर, पश्चिम ठाणे) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील सुभाष कणसे (रा. तोरणा कृष्णा हौसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी), अमित हरिभाऊ शेवाळे, भूषण रवींद्र पाटील, अक्षय बाबूराव शिंगोटे, झांबरे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व अन्य चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नील कणसे यांनी प्राधिकरण येथील त्यांच्या रो-हाऊसवर दी सातारा सहकारी बँक लिमिटेडच्या मालवणी मालाड शाखेतून ४० लाख रुपयांचे जमीन, इमारत तारण कर्ज घेतले. काही दिवस हप्ते भरून पुन्हा कर्जाचे हप्ते भरणे बंद केले. त्यामुळे बँकेने कणसे यांच्या रो-हाऊसचा ताबा घेतला. बँकेने घराचा लिलाव केल्यानंतर कणसे यांनी घरातील साहित्य परत मिळण्यासाठी विनंती केली. त्यामुळे बँकेचे अधिकारी, कर्मचारी लिलाव केलेल्या घरात आले. त्यावेळी कणसे याने त्याच्या अन्य साथीदारांसोबत मिळून बँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी करीत त्यांना घराबाहेर काढले. बँकेचा कायदेशीर ताबा असताना कणसे व साथीदारांनी जबरदस्तीने घराचा ताबा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com