तुकाराम बीज ः ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला सोहळा
इंद्रायणी काठी वैष्णवांची दाटी

तुकाराम बीज ः ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला सोहळा इंद्रायणी काठी वैष्णवांची दाटी

देहू, ता. ९ ः जगाला शांती, विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या जगद्‍गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी गुरुवारी (ता. ९) ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. इंद्रायणी नदीच्या काठावर भाविकांची मांदियाळी जमली होती. तुकाराम-तुकारामचा नामघोषात अन् टाळमृदंगाच्या गजरात देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

बीज सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी पहाटे तीनपासून मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी गर्दी केली होती. इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करून भाविक दर्शनासाठी येत होते. दर्शनबारीतून भाविकांनी मंदिरात प्रवेश देण्यात येत होता. मुख्य प्रवेशद्वारातून दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात येत होता. देऊळवाड्याला तसेच विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पालखी फुलांनी सजविली होती. सकाळी आठपासून भाविकांची आणि दिंडीकरांची संख्या वाढली. दर्शन करून भाविक आणि दिंड्या तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वारातून वैकुंठस्थानाकडे जात होते. सकाळी साडेदहा वाजता परंपरेनुसार संत तुकाराम महाराजांच्या पादुका विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सभा मंडपात आणल्या. फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवल्या. देऊळवाड्यातून सकाळी साडेदहाला संत तुकाराम महाराजांची पालखी वैकुंठगमनस्थान मंदिराकडे मार्गस्थ झाली. परंपरेनुसार सेवेकरी, खांदेकरी प्रकाश टिळेकर, प्रकाश पवार, तानाजी कळमकर, नामदेवनाना भिंगारदिवे, बाळासाहेब थोरात, खंडू मुसडगे, पोपट तांबे, शेटीबा कांबळे, बाळासाहेब पांडे, माऊली पांडे यांनी सेवा दिली. देऊळवाड्याबाहेर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा नामघोष भाविक करीत होते. रखरखत्या उन्हातही भाविकांचा उत्साह अमाप होता. भाविकांच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगा होत्या. फुलांची उधळण करत भाविकांनी दर्शन घेतले. वैकुंठस्थानाकडे येणारे गावातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. पालखीपुढे संस्थान आणि कल्याणकरांची दिंडी होती.
पालखीचे वैकुंठस्थानाकडे आगमन होताच सर्व भाविकही मिळेल, त्याजागी उभे राहून वैकुंठगमन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात होते. आबालवृद्धही या सोहळ्यात रणरणत्या उन्हात उभे होते. जागोजागी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील वारकरीही वैकुंठगमनस्थान मंदिराकडे येत होते.

पोलिस यंत्रणेकडून चांगले नियोजन
यंदाच्या वारीला अभूतपूर्व गर्दी होण्याचे संकेत पोलिस यंत्रणेला मिळाले होते. गेल्या वर्षी पालखीच्या परतीच्या मार्गावर चेंगराचेंगरीचा प्रकार झाला होता. यंदा देहूरोड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अनेक ठिकाणी बॅरेकेटिंग केले होते. पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.

देहू ः तुकाराम बीज सोहळ्यासाठी देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
देहू ः बीज सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ कीर्तनकार बापूसाहेब महाराज मोरे यांचे कीर्तन झाले.
देहू ः वैकुंठगमनस्थान मंदिरातील आरती करताना खासदार श्रीरंग बारणे आणि विश्वस्त मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com