योग्य उपचार व संतुलित आहार घ्या

योग्य उपचार व संतुलित आहार घ्या

पिंपरी, ता. १६ ः ‘मी तीन दिवसांपासून ॲडमिट आहे. सर्दी, खोकला, ताप आहे,’ पन्नास वर्षीय नीलम जोशी सांगत होत्या. तर, ‘मला रात्रीपासून सर्दी, डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होतोय, डॉक्टरांनी औषधे दिली आहेत,’ असे ३८ वर्षीय गृहिणी संध्या सांगत होत्या. भोसरी एमआयडीसीतील कंपनीत कामगार असलेला चिखलीतील २३ वर्षीय शरद म्हणाला, ‘सर्दी, खोकला व तापामुळे मी पाच दिवस हॉस्पिटलला होतो. आता बरं वाटतंय. डॉक्टरांना रक्ताचे रिपोर्ट दाखवायला आलो आहे.’ अशी लक्षणे असलेले रुग्ण शहरातील दवाखाने व रुग्णालयांमध्ये येत आहेत. त्यात ‘एच३ एन२’ विषाणूचा संसर्ग असलेले चार रुग्ण शहरात आढळले असून, भोसरीतील एका ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याने महापालिका आरोग्य वैद्यकीय विभाग खळबळून जागा झाला आहे. तीन रुग्णांना घरी सोडले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, लक्षणे दिसतात योग्य उपचार व संतुलित आहार घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून शहर परिसरातील हवामानात बदल झाला आहे. पहिल्या आठवड्यात मध्यरात्रीनंतर थंडी, दुपारी ३४ अंशांपर्यंत तापमान असायचे. गेल्या आठ दिवसात काही वेळ ढगाळ वातावरण, तर काही वेळ कडक ऊन अशी स्थिती होती. पहाटे थंडी असायची एक-दोन वेळा काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या होत्या. दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अशा बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ झालेली आहे. खासगीसह महापालिकेची दवाखाने व रुग्णालयांमध्ये अशाच लक्षणांच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, इन्फ्लुएंझा एच३एन २ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सध्या रुग्णालयात नाही. चार जणांना संसर्ग झाला होता. त्यातील तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, असे महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाने कळविले आहे. सद्यःस्थितीत रुग्णालयात एकही रुग्ण दाखल नाही.

इन्फ्लुएंझा एच३एन२ विषाणू संसर्गामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप असी लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. या आजारावर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधोपचार उपलब्ध आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे व आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

इतर विषाणूंप्रमाणेच इन्फ्लुएंझा एच३एन२ आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रथिनेयुक्त संतुलित आहार घ्यावा. उन्हाळ्यात अनेक जण व्यायाम करण्याचे टाळतात किंवा त्याचे प्रमाण कमी करतात. उन्हाळ्यात किमान ३० मिनिटे व्यायाम करावा. पाणी जास्त प्यावे. कडधान्ये, दुध, अंडी, चिकन खावे. ताजे अन्न खावे. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खायचे टाळावे. तेलकट, तळलेल्या पदार्थांमुळे पचनशक्ती कमी होत असल्याने ते टाळावेत.
- डॉ. राम गुडगिला, आहारतज्ज्ञ, चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com