
Pimpri-Chinchwad : तृतीयपंथीयांचा सन्मानाचा लढा; पोलीस भरतीसाठी जोरदार तयारी सुरु
पिंपरी - महाराष्ट्रात पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील म्हणजेच पारलिंगी उमेदवार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या पोलिस भरतीसाठी मोठ्या धाडसाने उतरले आहेत. मैदानी चाचणीनंतर ते आता दोन एप्रिलला होणाऱ्या लेखी परीक्षेची जोमात तयारी करताना दिसून येत आहेत. विजया वासावे, सक्षम भालेराव, योगेश साळवे, प्रशांत अडकणे, विनायक काशीद अशी त्यांची नावे आहेत. सर्वजण खुल्या गटाचे उमेदवार आहेत.
परीक्षा १०० गुणांची आहे. सर्वांनी स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेतली असून अभ्यासिकाही लावली आहे. त्यांना इतर विद्यार्थी-विद्यार्थिनी तयारीसाठी मदत करत आहेत. पुस्तके तसेच अभ्यासाच्या ट्रिक्स देखील त्यांना दिल्या जात आहेत. काही दिवसच परीक्षेला उरल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे.
मूळची मी नंदुरबारची आहे. काही वर्षांपूर्वी मी सार्वजनिकरित्या स्वतःला जाहीर केले. यापूर्वीच्या पोलिस भरतीवेळी पुरुष किंवा स्त्री असे दोनच रकाने होते. त्यामुळे अर्ज देखील करता येत नव्हता. परंतु, न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्हाला स्वतंत्र ओळख मिळाली आहे. सध्या मी नोकरी करते. पहाटे साडेचारला उठून शारीरिक चाचणीची तयारी केली. त्यात यशस्वी झाले. आता दिवसरात्र अभ्यास करत आहे.
- विजया वासावे, पुणे
मी अभियांत्रिकी पदवीधर आहे. माझी शस्त्रक्रिया झाली आहे. लहानपणापासून समाजातून विभक्तच आहे. दिवसभर मेहनत करून अभ्यास करणे जिकिरीचे असले तरी मी तयारी केली आहे. नुकतीच मी अभ्यासिका लावली आहे. तयारी सुरू आहे. मैदानी पाठोपाठ यातही यशस्वी होईन, असा विश्वास आहे.
- विना काशीद, कऱ्हाड
आमचा कट ऑफ महिलांसोबत लावला आहे. तीन महिने अभ्यासासाठी वेळ मिळाला आहे. इतर जण तीन वर्षांपासून तयारी करत आहेत. आमचे पॅरामीटर ठरविण्यात यायला हवे होते. शारीरिक कसरतीनंतर आता मानसिक कसरत आमची सुरु आहे. स्पर्धा परीक्षा अकादमीत अभ्यास सुरू आहे. नोकरी करत अभ्यास करत आहे.
- निकीता मुख्यदल, पिंपरी-चिंचवड