पावसाळा तोंडावर; कामे अपूर्णच

पावसाळा तोंडावर; कामे अपूर्णच

पिंपरी, ता. ५ ः पावसाळा अवघा काही दिवसांवर आला आहे. मात्र, महापालिकेतर्फे सुरू असलेली रस्त्यांसंदर्भातील कामे अपूर्णच आहेत. खड्डे, आडवे चर, विविध वाहिन्यांसाठीचे खोदकाम आणि रस्ते व पदपथांची निर्मिती आणि दुरुस्तीची कामे सुरूच आहेत. त्यामुळे पावसामुळे पाणी साचून व रस्ते निसरडे होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्याची झलक, गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे दिसली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यातून वाट काढताना वाहनचालकांसह पादचारांनाही कसरत करावी लागली. आता रस्ते दुरुस्तीसाठी १५ जूनपर्यंतची मुदत आहे.
गेल्या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामना नागरिकांना करावा लागला. पाऊस थांबल्यानंतर साधारण आक्टोबरपासून खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली. त्याबरोबरीनेच काही नागरिकांनी विविध वाहिन्या घेण्यासाठी रस्त्यांवर घेतलेले आडवे चर धोकादायक ठरत होते. खड्डे व चर बुजविण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. १५ मे नंतर कोणत्याही नवीन कामास परवानगी प्रशासनाने दिली नाही. मात्र, ३१ मे पर्यंत खड्डे व चर बुजवण्यासह पदपथ व रस्त्यांची दुरुस्ती, कॉंक्रिटीकरण, अर्बन स्ट्रिट डेव्हलमेंट योजनेअंतर्गत पदपथ व रस्त्यांच्या निर्मितीसाठीची कामे पूर्ण करण्याचा आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी दिला होता. आता जूनचा पहिला सप्ताह संपत आला आहे, सात जूनपासून पावसाळा सुरू होणार आहे. तरीही कामे सुरूच असल्याचे चित्र शहरात आहे.

डुडुळगाव ते मोशी दरम्यानच्या रस्त्यावर दोन ठिकाणी आडवे चर खोदले आहेत. त्यात वाहने आदळत आहेत. दोन दिवसांपूर्वी माझी मोटारसायकल आदळून पुढच्या चाकाची रिंग थोडी बेंड झाली व एक शॉपक्झर्वरचे ऑइल सिल केले. त्याच्या दुरुस्तीसाठी साडेसातशे रुपये खर्च आला. असे चर व खड्डे त्वरीत दुरुस्त करायला हवेत.
- बापू शिंदे, मोशी

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे स्पाइन रस्त्यावरील जाधव सरकार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने जाधववाडीकडे वळताना माझी मोटारसायकल स्लिप झाली. पण, वेग कमी असल्याने मी तोल सावरला. या चौकात दरवर्षीच पाऊस झाल्यानंतर पाणी साचते. लवकर निचरा होत नाही.
- हर्षल पवार, चिखली

खड्डे, चर व विविध वाहिन्यांसाठी केलेल्या खोदकामांच्या ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, काही खोदाई प्रलंबित झाल्यामुळे अद्याप कामे सुरू आहेत. आता १५ जूनपूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन आहे. नवीन रस्ता, अर्बन स्ट्रिट योजनेनुसारची कामे पावसाळ्यातही सुरू राहणार आहेत.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com