गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार
निगडी : महिला मनोरुग्ण असल्याची माहिती असताना देखील एकाने तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत निगडी व येवलेवाडी येथे घडला. माणिक नानाभाऊ ढोरे (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह आणखी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने रविवारी (ता. ४) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी मनोरुग्ण आहे. याची माहिती असताना देखील आरोपीने जवळीक साधत तिचा विश्वास संपादन केला. मे २०२२ मध्ये तिच्यावर अत्याचार केले. पुढे मार्च २०२३ मध्ये आणखी अत्याचार केले. याविषयी मुलीच्या पालकांनी आरोपीला जाब विचारला असता आरोपीने जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

विश्वास संपादन करून महिलेची फसवणूक
भोसरी : महिलेचा विश्वास संपादन करीत तिचे सोन्याचे गंठण व रोख रक्कम पळवून नेली. ही घटना शनिवारी (ता. ३) सायंकाळी भोसरीतील दिघी रोड येथे घडली. महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. ४) फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील ५० हजार रुपयांचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, पाचशे रुपये रोख घेऊन त्या बदल्यात त्यांना पितळेचा तुकडा दिला. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

जमिनीच्या वादातून दोघांना मारहाण
चाकण : जमिनीच्या वादातून भावकीतल्या चौघांनी बहीण भावाला बेदम मारहाण केली. यामध्ये भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार भोसेगाव, चाकण येथे रविवारी (ता. ४) रात्री घडला. या प्रकरणी किरण दत्तात्रेय होगजे (वय २९, रा. भोसे , खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंद्रकांत दिनकर होगजे, महिला आरोपी, कर्णिक चंद्रकांत होगजे, निशिकांत चंद्रकांत होगजे (सर्व रा. भोसे, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चंद्रकांत याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जमिनीवरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांची चुलत बहीण आणि तिच्या मुलीला मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी त्यांना सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना काठीने, लोखंडी सळईने मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांचा सख्खा भाऊ व चुलत भाऊ यांनाही आरोपींनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने गुन्हा
पिंपरी : मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी पिंपरी स्टेशन येथील हॉटेल कुणाल रेस्टॉरंट बार या हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिसांनी रविवारी (ता. ४) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. सनी परमानंद सुखेजा (वय ३३, रा. पिंपरी), सरफराज महम्मद अली (वय ३५, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक सिद्राम बाबा यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि पोलिस नाईक कुऱ्हाडे हे पिंपरी मार्शल ड्यूटीवर असताना पिंपरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या कुणाल हॉटेलमध्ये त्यांना पेटत्या शेगडीच्या बाजूला तीन गॅस सिलिंडर दिसून आले. हॉटेलमध्ये मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास दोन ग्राहक जेवण करीत होते. तर, आणखी दोघे जेवण करण्यासाठी तेथे आले होते. हॉटेलमध्ये हेल्पर, वेटर आणि आचारी, असे तिघेजण काम करीत होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.
आरोपी हॉटेल मालकाने हॉटेलमधील ग्राहक आणि कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही. गॅससारखा ज्वालाग्रही पदार्थ असल्याचे माहिती असताना त्याच्या बाजूला पेटती शेगडी ठेवून हयगयीचे वर्तन केले. हॉटेल नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

पिंपळे निलखमध्ये दानपेटी फोडली
पिंपळे निलख : पिंपळे निलख येथील एका मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (ता. ४) मध्यरात्री दोन ते सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी सागर मनोहर साठे (वय ४२, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे निलख येथील गणेशनगरमध्ये असलेल्या गणपती मंदिरातील दानपेटीचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले. दानपेटीतून सुमारे पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

जाब विचारल्याने दाम्पत्याला मारहाण
पिंपरी : ‘माझ्याकडे का बघतोय,’ असे विचारले असता तीने ते चार जणांनी मिळून दाम्पत्याला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (ता. ३) संध्याकाळी वडमुखवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी विवेक जगन्नाथ जाधव (वय ४०, रा.दिघी) यांनी रविवारी (ता. ४) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल तापकीर (रा. दिघी), कुंडलिक तापकीर व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. फिर्यादी यानी आरोपींना माझ्याकडे का बघतोस, अशी विचारणा केली. याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या पत्नी त्यांना सोडविण्यासाठी आल्या असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या हाताचा पंजा फ्रॅक्चर झाला आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.