लग्नसराई भाग - २ 

शाही विवाहसोहळ्याकडे पालकांचा कल
ग्लॅमरस इव्हेंट ः आतषबाजीपासून जेवणापर्यंत पॅकेजवर भर 
आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा

लग्नसराई भाग - २ शाही विवाहसोहळ्याकडे पालकांचा कल ग्लॅमरस इव्हेंट ः आतषबाजीपासून जेवणापर्यंत पॅकेजवर भर आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ६ ः विवाह म्हणजे दोन जिवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन. धार्मिक आणि विधीवत पद्धतीने विवाह सोहळा पार पडावा, यासाठी वधू आणि वरपक्षाची लगबग सुरु असायची. मात्र, आता लग्नाकडे ‘ग्लॅमरस इव्हेंट’ म्हणून पाहिले जात आहे. पूर्वी केळीच्या पानांपासून ते आंब्याच्या डहाळ्यांपर्यंतचा वापर होऊन सजावट होत होती. आता लग्नमंडपाच्या सजावटीपासून फोटोशूट, लग्नात खमंग पदार्थ वऱ्हाडींना देण्यापर्यंत सर्व व्यवस्था करण्यासाठी पालकांची ‘पॅकेज’ सिस्टिमला पसंती मिळत आहे. लग्नाची शॉपिंग, मेहंदी, हळद, सीमंती पूजन यानुसार कपड्यांची थीम, लग्नस्थळी रोषणाई, फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत आदींद्वारे हा सोहळा दिमाखदार बनविण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी, वेडिंग प्लॅनर अथवा पॅकेज सिस्टिम देण्यावर लोकांचा भर वाढत आहे.

बदलत्या काळाप्रमाणे नवनवीन ट्रेंड डोकावत असतात. विवाह सोहळाही त्याला अपवाद राहिलेला नाही. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपला विवाह हटके पद्धतीने पार पडावा, अशी तरुण-तरुणींची इच्छा असते. लग्न सोहळ्यात कामांची यादी संपता संपत नाही. विवाहसोहळा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावा, यासाठी वधू-वर पक्षाकडून इव्हेंट कंपनीला पाचारण करण्यात येत आहे. पूर्वी घरातील अबालवृद्धांपासून सर्वांना कामे वाटून दिली जात होती. आता ही सर्व कामे इव्हेंटमधून होतात. प्री-वेडिंग फोटो शूट, डेस्टिनेशन वेडिंग, थीम वेडिंग यामुळे लग्नाच्या खर्चाने लाखांचा टप्पा गाठला आहे. इव्हेंट कंपनीकडील पॅकेज साधारणपणे २ लाख रुपयांपासून सुरु होते. इव्हेंट कंपनीला काम सोपवले की वधू पक्षाचा बरासचा भार हलका होतोय. मात्र, खर्चाचे गणित वाढते. बरेचदा, वरपक्षाकडूनच अपेक्षा व्यक्त केल्या जात असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी इव्हेंट कंपनीची निवड केली जाते. त्यामुळेच लग्नांचा ‘इव्हेंट’ होताना पहायला मिळत आहे.

शाहीविवाह सोहळ्याचा फिल
नवरीसाठी डोली, नवरदेवासाठी घोडा, बॅन्ड, बग्गी यांचीही मागणी पॅकेजमध्ये केली जात असल्याने कोणतीही धावपळ न करता शाहीविवाह सोहळ्याचा ‘फिल’ पालक अनुभवत आहे. हल्ली थीम वेडिंग हा प्रकार प्रत्येकालाच हवाहवासा वाटत आहे. थीमनुसार डेकोरेशन, तसे कपडे, दागिने घालण्याला पसंती दिली जाते. लॉन्सवर थीम वेडिंग करण्यास ऐसपैस जागा गरजेची असते. हवे तसे डेकोरेशन करता येत असल्याने कार्यालयांपेक्षा लॉन्सवर लग्न करण्याचा हा ट्रेंड हल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. थिम्सवर आधारित आकर्षक देखावे, रंगीत कारंजे, फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या साहित्याची सजावट करून लग्नमंडप सजविण्यात येतात. यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही चांगले दिवस आले आहेत. बंदिस्तपेक्षा खुल्या जागेवरील कार्यालयांना पसंती दिली गेली आणि यातूनच वेडिंग डेस्टिनेशन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट असा बदल झाला.

लॉन्स, कार्यालयातच पॅकेजेस
लग्नाचा हॉल, लग्नातील रांगोळी, होमकुंड, सुपाऱ्या, भटजी, पाट, चौरंग, अक्षता, अगदी समईच्या वाती, आतषबाजीसाठीचे फॅन्सी फटाके ते जेवणाच्या सर्व पदार्थांपर्यंत पॅकेज सुरू झाले. कार्यालय ठरविण्यासाठी गेल्यानंतर तेथे थेट पॅकेजच ग्राहकांसमोर ठेवले जाऊ लागले आणि आता तर व्यक्ती किती आणि कोणकोणते पदार्थ यावर पॅकेज ठरू लागले आहे. त्यातूनच पुढे पॅकेज संस्कृती रुजू लागली. शहरातील अनेक कार्यालये, लॉन्सचालकांनी दोन लाखांपासून पुढे असे पॅकेजेस उपलब्ध करून दिले आहे.

नाश्‍त्यापासून जेवणापर्यंत...
नाश्‍त्यापासून जेवणापर्यंतचे पॅकेजेस केटरर्सकडून देण्यात येतात. पाणीपुरी ते रुमाल रोटी, रबडीपासून मान्चूरीपर्यंत सर्व काही जेवणाबरोबर देण्याचा नवा ट्रेड अलीकडे रूढ होत आहे. महाराष्ट्रीयन पंचपक्वाने, वेलकम ड्रिंक्‍स, रंगीबेरंगी मॉकटेल्स, पंजाबी,
राजस्थानी, चायनीज, इटालियन, चाट, केळीच्या पानाच्या पंगतीपासून, बुफेपर्यंत आणि त्यानंतर रुचकर पानापर्यंत सर्व काही केटरर्सकडून पुरविले जातात. विशेष करून सायंकाळचे मुहूर्त घेतले जातात. सायंकाळी सरबत, पाणीपुरी आणि नंतर सूप, मान्चूरी आणि नंतर मेन कोर्स म्हणून आचाऱ्यांकडून सांगितले जाते. त्याचेही पॅकेज दिले जाते. दीडशे रुपये थाळीपासून पुढे जितक्‍या पदार्थांचा समावेश होईल, त्यानुसार केटरिंगचे पॅकेज ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com