जीवनशैलीतील बदल हृदयविकार दूर ठेवतो

जीवनशैलीतील बदल हृदयविकार दूर ठेवतो

पिंपरी, ता. ७ ः ‘‘मूल गर्भात असतानाच त्याचे हृदय कार्यरत असते. रक्ताभिसरणासाठी त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, टू डी इको अशा विविध चाचण्यांद्वारे त्याच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जात असली तरी दैनंदिन जीवनशैलीतील बदल हृदयविकार दूर ठेवू शकतात,’’ असा विश्वास डॉ. अर्चना वाजगे यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड यांच्यातर्फे विरंगुळा केंद्रात आयोजित व्याख्यानमालेत ‘सशक्त हृदयाची गुरुकिल्ली विषयावर डॉ. वाजगे बोलत होत्या. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी आदी उपस्थित होते. डॉ. वाजगे म्हणाल्या, ‘‘ताणतणावाचे नियोजन केल्यास मानसिक आरोग्य लाभते. नियमित आरोग्य तपासणी आणि दिनचर्येतील सकारात्मक बदल म्हणजे सशक्त हृदयाची गुरुकिल्ली होय.’’ गोपाळ भसे यांनी परिचय करून दिला. चंद्रकांत कोष्टी यांनी स्वागत केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले.

उत्तम आरोग्याचा गुरुमंत्र
- आहार, व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्य उत्तम हृदयासाठी गरजेचे
- आहारात ५० टक्के भाज्या, २५ टक्के डाळी-कडधान्ये व २५ टक्के पोळी-भात असावा
- मीठ व साखरेचा अत्यल्प वापर करावा, डबाबंद व बेकरीतील पदार्थ टाळावेत
- सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फलाहार घ्यावा; सॅलड व सूप घ्यावे
- शक्यतो जेवणाच्या वेळा पाळाव्यात
- चालणे, पोहणे, नाचणे, सायकलिंग, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम झेपेल इतकाच करावा
- रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स टाळावेत

विसंगतीतून विनोद निर्मिती ः चौगुले
‘‘विसंगतीतून विनोद निर्मिती होते’’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी व्यक्त केले. ‘कार्यक्रमातल्या गमतीजमती’ विषयावर ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी आदी उपस्थित होते. चौगुले म्हणाले, ‘‘साहित्यिक, कलाकार ही सर्जनांच्या क्षणांव्यतिरिक्त सामान्य माणसेच असतात. साहजिकच त्यांच्याही बोलण्यात, वागण्यात विसंगती असते. त्यामुळे अनवधानाने, नकळत विनोद घडत असतात. अतिउत्साह, धांदरटपणा, आचरणातील विक्षिप्तपणा यामुळे हास्यास्पद परिस्थिती निर्माण होते. परंतु अनेकदा त्या व्यक्तीच्या ते लक्षातही येत नाही.’’ रत्नप्रभा खोत आणि मंगला दळवी यांनी त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविक केले. राजाराम गावडे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार मुरडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com