‘स्वच्छ भारत’ला अस्वच्छतेचे ‘ग्रहण’

‘स्वच्छ भारत’ला अस्वच्छतेचे ‘ग्रहण’

पिंपरी, ता. ७ ः स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर स्वच्छ ठेवले जात असल्याचा महापालिकेचा दावा आहे. त्यासाठी ओला, सुका, घातक कचरा अलगीकरण केला जात आहे. जनजागृतीही सुरू आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवल्या जात आहेत. ‘इंदौर पॅटर्न’ अंतर्गत ‘कचराकुंडीमुक्त शहर’ संकल्पना राबविली आहे. तरीही बहुतांश रस्ते, पदपथ, चौक, पुलांचे कोपरे, गल्ली-बोळात कचरा दिसत आहे. भूमिगत वाहिन्यांतील सांडपाणी चेंबरमधून बाहेर येऊन रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे महामार्गासारखे मोठे रस्ते, चौक, महत्त्वाच्या ठिकाणी ‘स्वच्छ भारत’ दिसत असून अंतर्गत भाग, वस्त्यांमध्ये काही रस्त्यांच्या कडेला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या अस्वच्छतेला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत आणि राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात महापालिकेने सहभाग घेतला आहे. त्याअंतर्गत नागरिकांचा सहभाग, ॲपचा वापर, सायकलिंग, वॉकिंग अशा प्रकारात पारितोषिक पटकावले आहे. कचराकुंडीमुक्त शहर संकल्पना लाबविली आहे. कचरा विलगीकरणासाठी ठिकाणे निश्चित केली आहेत. हाकेथॉन, फ्लॉगेथॉन अशा मोहिमा राबवून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तरही महामार्गासह काही रस्त्यांच्या कडेला, नदी व रस्त्यांवरील पुलांच्या कोपरे, लोहमार्गाला समांतर रस्ते, अधिक वर्दळ नसलेल्या भागातील रस्ते, चौकांच्या परिसरात कचरा टाकलेला दिसून येत आहे. त्यामुळे ‘स्वच्छ’ अभियानालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र शहरात आहे.

संत तुकारामनगर परिसरात भूमिगत सांडपाणी वाहिनी वारंवार तुंबते. तिच्या चेंबरमधून सांडपाणी बाहेर येऊन दुर्गंध पसरते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नाही. महापालिकेच्या अग्निशामक केंद्रालगतच्या या भागात आतापर्यंत अनेकदा सांडपाणी वाहिन्या तुंबल्या आहेत.
- शशी इनामदार, संत तुकारामनगर, पिंपरी

अधिकारी म्हणतात...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी दिशा उपक्रम राबवून बचतगटांच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई केली जाते. शून्य कचरा प्रकल्प राबवत आहोत. वारंवार कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अशी ठिकाणे स्वच्छ करण्यावर भर दिला आहे. उघड्यावर कचरा टाकू नये, अलगीकरण करून कचरा द्यावा, यासाठी जनजागृती केली जात आहे. घंटागाड्यांची संख्या वाढवली आहे.
- सोनम देशमुख, समन्वयक तथा सहायक आयुक्त, स्वच्छ भारत अभियान

भूमिगत सांडपाणी वाहिन्या तुंबून त्यातील सांडपाणी रस्त्यांवर येऊ नये, यासाठी मुख्य वाहिन्यांची यंत्राद्वारे साफसफाई केली जात आहे. छोट्या सांडपाणी वाहिन्यांचीही साफसफाई सुरू आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून वाहिन्यांची स्वच्छता सुरू असून, पावसाळ्यापूर्वी सर्व वाहिन्यांची साफसफाई केली जाणार आहे. तसेच, नागरिकांकडून प्राप्त तक्रारींनुसार संबंधित ठिकाणच्या वाहिन्या, चेंबरची साफसफाई केली जात आहे.
- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका

नेहमी कचरा टाकली जाणारी ठिकाणे ः ७० पेक्षा अधिक
जनजागृतीद्वारे बंद केलेली ठिकाणी ः ३०

शहरातील कचऱ्याची टक्केवारी
कचरा / प्रमाण (टक्के)
अन्न, उद्यानांतील / ५२
लाकूड / १०.५
प्लॅस्टिक / ९.३
कापड / ९.१६
राडारोडा / ७.१
रबर / ४.२
काच / ३.८
कागद, थर्मोकोल / २.१
धातू / १.२४

मुख्य फोटो ः ४१४५३, ४१४५५
--------
...अन्यथा पुन्हा कुंड्या ठेवा
जुनी सांगवी ः शहर कचराकुंडीमुक्त करत असताना नियोजनाच्या अभावामुळे रस्त्याच्या कडेला जागोजागी कचऱ्याचे ढीग साठत आहेत. परिणामी हा कचरा अस्ताव्यस्त होऊन रस्त्यावर येत आहे. त्यामुळे कचराकुंडी मुक्त ‘इंदौर पॅटर्न’चा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या सांगवी परिसरातून पहावयास मिळत आहे. यामुळे एकतर नियमित कचरा संकलन सुरळीत करा किंवा रस्त्यावर कचरा पडणाऱ्या ठिकाणी कचराकुंडी ठेवा असा सूर नागरिकांमधून येत आहे.
कचराकुंडीमुक्त शहर राबवत असताना अपुरी साधन सामग्री असल्याने कचरा संकलन यंत्रणा तोकडी पडत आहे. परिणामी, चाकरमानी मंडळी, नागरिक घरात साठलेला कचरा रस्त्याकडेला भिरकावत असल्याने पुन्हा कचऱ्याचे ढीग आढळत आहेत. जुनी सांगवी- औंधला जोडणाऱ्या मुळा नदीवरील छत्रपती संभाजी महाराज (स्पायसर रस्ता पूल) पुलापासून पुणे शहराची हद्द सुरू होते. या स्वागत फलकाजवळच नियमित कचऱ्याचा ढीग साचत असल्याने परिसराला बकालपणा आला आहे. चाकरमानी मंडळी कामाला जाताना येथे कचरा भिरकावताना सर्रास पाहायला मिळतात.

ठराविक ठिकाणी कुंड्या
अपुरे मनुष्यबळ व तोकड्या साधनसामग्रीमुळे सांगवीतील पीडब्ल्यूडी कामगार वसाहत परिसर, औंध स्पायसर पूल, पवना नदी घाट येथे उघड्यावर कचरा टाकला जात आहे. या लगतच सांगवीचे कचरा संकलन केंद्र आहे. नागरिकांकडून कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणी पुन्हा कचराकुंड्या ठेवण्यात याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.

नागरिकांच्या अपेक्षा
- कचराकुंडीमुक्त शहर संकल्पना स्तुत्य असून त्या दृष्टीने नियोजन करावे
- नियोजन न करताच सर्व ठिकाणच्या कचराकुंड्या हटविणे चुकीचे ठरतंय
- घंटागाडी येईपर्यंत नोकरदार घरी थांबू शकत नसल्याने कचऱ्याचा प्रश्न
- गेल्या आठवड्यात ‘कॉम्पॅक्टर’ न आल्याने सांगवी कचरा संकलन केंद्रात कचरा तुंबला होता.
- मनुष्यबळ व साधन सामग्री वाढवावी
- रोज सकाळी व संध्याकाळी नियमित वेळेत कचरा संकलनाची गाडी हवी

सांगवीतील कचरा संकलन
एकूण वाहने ः ८
आरोग्य कर्मचारी ः २०
कंत्राटी सफाई कामगार ः ३१

कचरा संकलनासाठी गाड्यांची संख्या वाढवायला हवी. संकलन करणारे मनुष्यबळ व यंत्रणा असेल तरच कचरा व्यवस्थित उचलला जाईल. नियमित वेळ हवी.
- रिनल गोहेल, नागरिक, सांगवी

सांगवी परिसर स्वच्छतेसाठी यंत्रणा अपुरी पडते. नागरिकांनीही कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. प्रशासनाने योग्य नियोजन करावे.
- रवींद्र निंबाळकर, अध्यक्ष, अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ

सांगवी परिसरातील कचरा नियमित उचलला जात आहे. नागरिकांनी सहकार्य करून कचरा अलगीकरण करून कचरा गाडीतच द्यावा.
- दीपक कोटियाना, आरोग्य निरीक्षक, सांगवी विभाग
१५४२६
----------------
कुंडीमुक्त प्रभाग कागदावरच
पिंपळे गुरव ः येथील मोरया पार्कमध्ये रस्त्याच्या कडेला कचरा साचत आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. महापालिकेच्या कचराकुंडीमुक्त प्रभाग इंदौर पॅटर्न संकल्पनेचा उपक्रम ‘डब्यात’ गेला आहे. महापालिका व स्मार्टसिटी अंतर्गत अनेक ठिकाणी विकास कामे झाले आहेत. तसेच बहुतेक ठिकाणी विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. महापालिकेचा कचराकुंडीमुक्त प्रभाग करण्याचा स्तुत्य उपक्रम आहे. पण, या परिसरात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. एकदा घंटागाडी येऊन गेल्यानंतर साचलेला कचरा टाकायचा कुठे? हा प्रश्न निर्माण होतो. आटीयन्स, नागरिक, व्यावसायिक, नोकरदार यांना घंटागाडीच्या वेळेत कचरा टाकता येत नाही. यामुळे सायंकाळी बरेच व्यावसायिक व नागरिक मिळेल त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा व मोकाट कुत्रे, पशुपक्षी यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतेचा जनजागृती असलेला ‘इंदौर पॅटर्न’ अपयशी ठरला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सांगवीतील मोरया पार्क येथे दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. गैरसोय टाळण्यासाठी दिवसातून दोनदा ठराविक वेळेतच घंटागाड्या उपनगरात पाठवाव्या. जेणेकरून लोक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत.
- सुरेश सकट, स्थानिक नागरिक

जुनी सांगवी परिसरात दररोज कचरा उचलला जातो. तीन दिवस फिक्स पॉइंट लाऊन नागरिकांना गुलाबाची फुले देऊन जनजागृती केली. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर ग्रीन मार्शल टीम लक्ष ठेवून आहे.
- भीमराव कांबळे, आरोग्य निरीक्षक
६९२
------
रावेत-मामुर्डीत कचऱ्याची समस्या
किवळे ः रावेत परिसरातील रस्त्याच्या बाजूलाच कचऱ्याचे ढीग दिसून येत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचे कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर लक्ष नाही का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घरगुती कचरा संकलन ठेकेदार तत्त्वावर केले जाते. यासाठी घरोघरचा कचरा घंटागाडीच्या माध्यमातून संकलित केला जातो. मात्र, रावेत परिसरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग पडल्याचे दिसून येत आहेत. अशीच परिस्थिती मामुर्डी-साईनगर परिसरातील वनराईतील रस्त्याच्या दुतर्फा दिसून येत आहे. रावेत येथे सेलेस्टाईल सोसायटी दरम्यान अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा कचरा असल्याचे रोज दिसत आहे. किवळे हद्दीतीलच ‘के व्हिला सोसायटी ते श्रीनगर आणि पुढे बापदेवनगर दरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग आहेत. नागरिकांकडून रस्त्यावर कचरा टाकला जात असेल तर; पालिकेचा आरोग्य विभाग हा ठेकेदाराच्या गाड्या त्यांचे मनुष्यबळ घरोघरचा उचलण्यास कमी पडत आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
२२६५
फोटो ओळ : रावेत, सेलेस्टाईल सोसायटी जवळील पालिकेच्या अंतर्गत ६० फुटी रस्त्यालगत रोजच असा कचरा पडल्याचे चित्र असते.

माऊली पार्कजवळ सांडपाण्याची समस्या
किवळे ः रावेत शिंदेवस्ती येथील माऊली पार्क परिसरातील उंच भागात असलेल्या सोसायट्यांचे वाहिनीतून वाहणारे सांडपाणी पावसाळ्यात ‘ओव्हरफ्लो’ होऊन जवळच्या शेतात जात असल्याची स्थानिकांची तक्रार असून पावसाळ्यापूर्वी तातडीने उपयोजना करण्याची मागणी केली आहे. माऊली पार्क परिसरातील दोन सोसायट्या उंचावर आहेत. त्यासाठी महापालिकेची सांडपाणी वाहिनी आहे. बऱ्याचदा काही लोकांकडून वाहिनीतच कचरा टाकला जातो. परिणामी पावसाळ्यात वाहिनी ‘ब्लॉक’ होते व सांडपाणी थेट शेतात जाते. पिकांवर त्याचा परिणाम होतो, असे शेतकरी सुरेश भोंडवे यांनी सांगितले.

रस्त्यावर पावसात पाणी
शिंदेवस्ती येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाळ्यात पाणी साठून डबकी तयार होतात. त्यातून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना कसरत करत जावे लागते, असे दीपाली वाखारे, शिवाजी भोंडवे यांनी सांगितले. विठ्ठल केसू भोंडवे चौक ते रेल्वे लाईन दरम्यान बीआरटी लगत उतारावर, तसेच शिंदेवस्ती मुख्य चौक, दत्त मंदिर, पुढे एसबी पाटील कॉलेजकडे जाणाऱ्या वळणावर पावसाळ्यात पाण्याची डबकी तयार होतात, यावर पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचीही त्यांची मागणी आहे.

कातळे वस्तीतही समस्या
कातळे वस्तीमध्ये दरवर्षी नाला ‘ओव्हरफ्लो’ होऊन सांडपाणी रस्त्यावर येते. त्याचा कातळे वस्तीत नागरिकांना त्रास होतो. यावर जल:निसारण तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कैलास कातळे यांनी केली आहे.
--------
चिखली भागात कुचकामी योजना
चिखली ः महापालिकेने कचराकुंडी विरहित प्रभाग संकल्पना राबवली आहे. ती चिखली परिसरात बहुतांश ठिकाणी कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे. कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार व्यावसायिक आहेत. मात्र, संबंधित भंगार माल व्यवसायिकांकडून किंवा महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही. कचरा अनेक दिवस रस्त्यावरच पडून राहतो. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्याची दखल घ्यावीशी वाटते. परिणामी कुदळवाडी हे कचऱ्यांचे आगारच बनले आहे. या परिसरातील मुख्य रस्ते सोडल्यास अंतर्गत भागात कुठे फेरफटका मारला तर कचऱ्याचे ढीग दिसून येतात. हीच स्थिती मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, कृष्णानगर परिसरात पाहायला मिळते. पूर्वीच्या जागेवर आता कचराकुंड्या दिसत नसल्या तरी; कचरा मात्र जैसे थे स्थितीत पहावयास मिळतो. मोरेवस्ती येथील साई मंदिर आणि म्हेत्रेवस्ती येथील भीमशक्तीनगर जवळील शनी मंदिराच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे आढळतात. कामावर निघालेले नागरिक हातात कचऱ्याची पिशवी घेऊन रस्त्याच्या कडेला फेकून देतात. तीच परिस्थिती राघू साने चौक ते चिंचेचे मळा रस्त्यावर आहे. या रस्त्यावर कचरा कुंड्या नाहीत, पण कचऱ्याचे ढिगारे आहेत. हॉटेल व्यावसायिक तसेच या परिसरातील भाजीविक्रेते रात्री रस्त्यावर कचरा फेकून महापालिकेच्या उद्देशाला हरताळ फासताना दिसत आहे असे व्यावसायिक तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

महापालिकेतर्फे संपूर्ण चिखली परिसरात घंटागाडी फिरवली जाते. असे असताना हॉटेल व्यवसाय तसेच सकाळी कामावर जाणारे नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा फेकून मोकळे होतात. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
- भागिनाथ फुंदे, नागरिक, मोरेवस्ती, चिखली
-------
थेरगाव-वाकडचे स्मार्ट रस्ते अस्वच्छ
वाकड ः थेरगावातील अनेक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात. शिव कॉलनीतील खिंवसरा पाटील तालीम इमारतीत आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. येथे दिवसभर शेकडो स्वच्छता कामगारांची, अधिकाऱ्यांची रेलचेल असते. मात्र, हाकेच्या अंतरावर शिव कॉलनी कमानीजवळच कचऱ्याचा ढिगारा साठला आहे. थेरगाव-वाकड या मुख्य व स्मार्ट रस्त्यावर बाराही महिने दोन-तीन ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात. गणेशनगर-काळाखडक रस्त्यावर लावलेल्या ‘येथे कचरा टाकू नये अन्यथा दंड आकाराला जाईल’ या फलकाच्या खालीच ढिगारे साठतात. चौधरी पार्क येथील मुख्य रस्त्यावरही काही नागरिक रात्रीतून उघड्यावर कचरा टाकतात. त्यामुळे अस्वच्छता व रोगराईला खतपाणी मिळते. तर; गणेशनगर येथील डेअरी फार्मच्या सीमा भिंतीला लागून कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. तरीही काही नागरिक उघड्यावरच सर्रास कचरा फेकतात. अशा महाभागावर ठोस कारवाई करण्याची मागणी आहे.
३७९६
-------
भुजबळ वस्तीत मैलापाणी
वाकड ः भुजबळ वस्ती येथील संत सावतामाळी मंदिराशेजारी असलेल्या रहिवासी परिसरात मलनिस्सारण वाहिनी जुनी झाल्याने ती वारंवार तुंबते. परिणामी मैलापाणी रहिवाशांच्या दारात येत आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होऊन दोन फूट मैलापाणी साठल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. वारंवार ड्रेनेज लाईन तुंबल्याने नागरिकांना नाकाला हात लावून ये-जा करावी लागत आहे. तर या अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती झाल्याने रोगराई वाढण्याचा धोका वाढला आहे. ही ड्रेनेज लाईन अत्यंत जुनी असल्याने ती काढून नवीन टाकण्याची मागणी येथील रहिवासी करत आहेत. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच तेवढ्यापुरती वरवरची डागडुजी करून जातात. मात्र, पुन्हा काही दिवसांत त्याच समस्येला रहिवाशांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ड्रेनेज लाईन बदलून कायमचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी रहिवासी करत आहेत.
३७७९
-------------
भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरमध्ये उघड्यावर कचरा
भोसरी ः भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरात ठिकठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. काही रस्त्यांना कचरा कुंडीचे स्वरूप आले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिका राबवत असलेल्या इंदोर पॅटर्नप्रमाणे कचराकुंडी विरहित प्रभागांतर्गत घंटा गाड्यांमध्ये येणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण दिसत आहे, ही आशादायक बाब आहे. मात्र अद्यापही काही जणांद्वारे रस्त्याच्याकडेला उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. घंटागाडीमध्ये विलगीकरणाशिवाय कचरा घेणे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी बंद केल्याने काही नागरिक, व्यावसायिक घंटागाडीमध्ये कचरा न टाकता रस्त्याच्याकडेला रात्रीच्या वेळेस कचरा टाकतात. त्यामुळे महापालिकेला कडक पावले उचलावी लागणार आहेत.

इथे टाकतात कचरा
- भोसरी : चांदणी चौक (छावा चौक), पीएमटी चौक (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक), आळंदी रस्त्यावरील सखूबाई गवळी उद्यानामागे, सॅंडविक कॉलनी प्रियदर्शनी शाळेचा रस्ता, सहल केंद्रामागे गावठाण बाजूकडील बंद प्रवेशद्वार, आदीनाथनगरातील वामनराव गव्हाणे उद्यानाजवळ, लांडेवाडी चौकातील दत्तमंदिराजवळील रस्ता, पुणे-नाशिक महामार्गावर सीएमई भिंतीलगत, चक्रपाणी वसाहत महादेवनगर रस्ता, चक्रपाणी वसाहतीतील मोकळ्या जागा, पुणे-नाशिक महामार्गावर लांडेवाडी प्रवेशद्वार ते गुडविल चौक, पांजरपोळ व ई क्षेत्रीय कार्यालय परिसर, शितलबागेजवळील सीएमई रस्ता, शांतिनगर समाज मंदिरामागे, इंद्रायणीनगर मंडई परिसर
- दिघी : भोसरी-आळंदी रस्त्यावरून दिघीला जोडणारा रस्ता, दिघी गावठाणातील महापालिकेच्या शाळेजवळील सीएमईची सीमाभिंत, दत्तनगरातील बहुउद्देशीय इमारत परिसर, दिघी-बोपखेल रस्त्यावरील काळूबाई मंदिरासमोरील रस्ता, दिघी-मॅगझीन चौकापर्यंतचा रस्ता, संत निरंकारी भवनजवळून सीएमई भिंतीजवळून जाणारा रस्ता.
- इंद्रायणीनगर : मिनी मार्केटजवळील मैदान, यशवंतराव चव्हाण चौक, कालिमाता मंदिर, चैतन्य पार्कजवळील नाल्यालगत, वैष्णोमाता शाळेसमोरील रस्ता, संकल्प सोसायटीजवळील मैदान.

भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरात ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. नागरिक लघुशंका करतात. अशा ठिकाणाचे महापालिकेद्वारे सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांसह चहा पार्टीचेही आयोजन करण्यात येत आहे.
- राजेश आगळे, ई क्षेत्रीय अधिकारी, महापालिका
----
भोसरी ः येथील संत ज्ञानेश्वर भाजी मंडईजवळ कचरा टाकण्यात येणाऱ्या आणि नागरिकांद्वारे लघुशंका करण्यात येणाऱ्या भागाचे महापालिकेने रांगोळी काढून केलेले सुशोभीकरण.
01055
---
(वृत्त संकलन : पीतांबर लोहार, संजय बेंडे, रमेश मोरे, विजय गायकवाड, संदीप भेगडे, अनंत काकडे, बेलाजी पात्रे) (संतोष हांडे ः छायाचित्रसेवा)
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com