Pavana River Pollution
Pavana River Pollutionsakal

River Pollution : नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी गावागावांत ‘एसटीपी’ प्रशासनाचे नियोजन

पवना, इंद्रायणी, मुळा खोऱ्यांत उभारणार ‘एसटीपी’ प्रकल्प

पिंपरी - पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून राबविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, शहराच्या हद्दीपासून नद्यांच्या उगमापर्यंतची गावे व औद्योगिक परिसरांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यासाठी महापालिका, पीएमआरडीए (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण), जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून नद्यांच्या खोऱ्यातील गावांचे गट (क्लस्टर) करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. पुढील दोन वर्षात ही प्रक्रिया मार्गी लागून, नदी प्रदूषण रोखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी तीन नद्यांच्या खोऱ्यात आहे. शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी. दक्षिणेकडून मुळा आणि मध्यातून पवना नदी वाहते. मुळा व पवनेचा संगम जुनी सांगवी येथे झाला आहे. संगमापासून पुढे मुळा नावाने नदी ओळखली जाते.

मुळा नदीचा उगम मुळशी तालुक्यात असून, शहरातील पात्र पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. केवळ उत्तरेकडील काठ पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे आहे. पवना व इंद्रायणी नद्यांचा उगम मावळ तालुक्यात आहे. मामुर्डी येथून पवना नदी शहरात प्रवेश करते.

इंद्रायणी नदीचे पात्र महापालिकेकडे असून उत्तर काठ पीएमआरडीएच्या हद्दीत आहे. या दोन्ही नद्यांचे शहराच्या हद्दीतील पुनरुज्जीवन महापालिका करीत आहे. तर, मुळा नदीचे पुनरुज्जीवन पुणे महापालिकेच्या सहकार्याने केले जाणार आहे. मात्र, नद्यांच्या उगमापासून शहराच्या हद्दीपर्यंतही मोठया प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे. यातील काही गावांत ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषद आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे.

एमआयडीसी आहे. मात्र, यातील काही गावांचा समावेश पीएमआरडीएमध्ये झालेला आहे. तर, उर्वरित गावे जिल्हा परिषद प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे सर्वांनी मिळून नद्यांच्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी आळंदीत झालेल्या एका कार्यक्रमात केली होती. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.

सद्यःस्थिती...

- इंद्रायणी नदी खोऱ्यात ६४ गावे

- पवना नदी खोऱ्यात ४७ गावे

- आळंदी, लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

- चाकण, देहू, वडगाव मावळ नगरपंचायत

- पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, टाकवे, उर्से एसआयडीसी

- हिंजवडी, तळवडे आयटी पार्क

सुरू असलेली कार्यवाही...

- देहूतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू

- लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन

- समितीची जबाबदारी महापालिका प्रशासक तथा आयुक्तांकडे

- खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, महापौरांचा (नियुक्तीनंतर) समितीत समावेश

- महापालिका व पीएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपंचायत व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष यांचा समितीत समावेश

- गावागावांमध्ये बैठकी घेऊन नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी जनजागृती करणार

- नदी प्रदूषण रोखण्यासाठी गावागावांतील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर

शहरातील नद्यांचे प्रदूषण

पाण्याची गुणवत्ता / पवना / मुळा / इंद्रायणी

डीओ / १.८६ / २.९० / २.०१

बीआडी / ३४.६६ / १३.३३ / १५.६६

सीओडी / ८६.६६ / ६८.३३ / ९४.६६

टीपा -

- पवना नदीतील पाण्याचे नमुने चिंचवड येथून, मुळा नदीचे वाकड बंधाऱ्यातून आणि इंद्रायणी नदीतील नमुने चिखली-मोई पुलाजवळून घेतले आहेत

- तीनही नद्यांच्या पाण्याचे नमुने जानेवारी, मे व ऑक्टोबर महिन्यात घेऊन नाशिक येथील संस्थेकडून तपासले जातात.

- डीओ (डिझॉल्व्हड ऑक्सिजन) म्हणजेच पाण्यात विरघळेल्या ऑक्सिजनचे प्रतिलिटर मिलीग्रॅम. मानांकानुसार ते प्रतिलिटर दोन मिलीग्रॅम आहे

- बीओडी (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) म्हणजे जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी. मानांकानुसार ते प्रतिलिटर १० मिलिग्रॅमपेक्षा अधिक नसावे

- सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) म्हणजे ऑक्सिजनमधील रसायनांचे प्रमाण. मानांकानुसार ते प्रतिलिटर ५० मिलिग्रॅमपेक्षा अधिक नसावे

- मुळा, पवना, इंद्रायणी नद्यांच्या पाण्यात डीओ, बीओडी, सीओडींचे प्रमाण मानांकापेक्षा अधिक असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त आळंदीमध्ये आले होते. त्यावेळी, नदी प्रदूषणाचा मुद्दा मी मांडला होता. वारकऱ्यांनीही ‘आम्हाला काही नको, केवळ इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करा’ अशी मागणी केली होती. त्यानंतर नदी प्रदूषणावर उपाययोजना करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार त्यांनी उद्योजक व प्रशासनाच्या बैठकी सुरू केल्या आहेत. अधिकारी व लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे.

- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

पवना व इंद्रायणी नद्यांच्या उगमापासून शहराच्या हद्दीपर्यंतची गावे व कंपन्यांमधील सांडपाण्यामुळेसुद्धा नद्यांचे प्रदूषण होत आहे. ते रोखण्यासाठी पीएमआरडीए व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. उगम ते शहर या दरम्यान नद्यांचे प्रदूषण थांबल्यानंतर शहरातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होईल. त्यामुळे शहरानंतरच्या नदी काठच्या गावांनाही चांगले पाणी मिळेल.

- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com