Narendra Modi and Amit Shah
Narendra Modi and Amit Shah Esakal

Pune : नरेंद्र मोदी-अमित शहांचे पुण्यावर लक्ष; आगामी निवडणुकांसाठी व्यूहरचना सुरू

मोदी-शहा यांच्यासह मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दौरे होतील

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्टला पुण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील विविध कामांचे उद्‍घाटन व भूमिपूजन केले. पाठोपाठ सहा ऑगस्टला सहकार परिषदेसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आले. या कार्यक्रमांचे औचित्य साधून भाजपने राजकीय वातावरणनिर्मितीची सुवर्णसंधी साधली.

यापुढेही मोदी-शहा यांच्यासह मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दौरे होतील. यावरून त्यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्याचे राजकीय महत्त्व आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणूनच भाजपच्या या व्यूहरचनेकडे पाहिले जात आहे.

राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मुंबईनंतर पुणे जिल्हा महत्त्वाचा आहे. पुणे, बारामती, शिरूर व मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ जिल्ह्यात आहेत. ‘मावळ’मधील कर्जत, पनवेल व उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यात आहेत.
भाजपच्या रणनीतीमुळे शिवसेनेपाठोपाठ वर्षभरातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही फूट पडली.

शिवसेना शिंदे गटाच्या सहकार्याने राज्यात सरकार स्थापन करून, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व त्यांच्या समर्थक नेत्यांना सरकारमध्ये सहभागी करून घेतले. सध्याच्या एकूण घडामोडी पाहता, आगामी सत्ता समीकरणांसाठी भाजपची जुळवाजुळव सुरू असल्याचे स्पष्ट होते.

बेरजेचे राजकारण
मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला. तेव्हापासून खासदार श्रीरंग बारणे आणि पवार यांच्यात संघर्षाचे वातावरण आहे. बारणे हे मुख्यमंत्री शिंदे गटात आहेत.

पवारही आता सरकारमध्ये आहेत. शिरूरमधून शिंदे गटातील शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. सध्या तिथे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. बारामतीचे प्रतिनिधित्व सुप्रिया सुळे करत आहेत.

या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळेच २०२४ मध्ये बारामती जिंकण्याचा विडाच भाजपने उचलला आहे. भाजपला आता अजित पवार यांचे पाठबळ मिळाले आहे. त्या जोरावर पुण्यातील चारही जागा जिंकून, लोकसभेत संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपचे बेरजेचे राजकारण सुरू केले असल्याचे दिसते.

मोदी-शहांकडून कौतुक
भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (ता. ६) चिंचवडमध्ये येऊन गेले. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार होते. भाजपच्या गोतावळ्यासह राज्य सरकारमधील अजित पवार समर्थक मंत्रीही हजर होते.

यावेळी बोलताना शहा यांनी, ‘दादा आपण आता योग्य जागी आला आहात. पण, तुम्ही उशीर केला’, असे सूचक विधान केले. पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील अजित पवार यांचे महत्त्व लक्षात घेऊनच, मोदी-शहांकडून त्यांना गोंजारण्याचे काम सुरू दिसते.

पुण्यातील मेट्रोचा आणि टिळक ट्रस्टच्या कार्यक्रमात मोदी यांनीही अजित पवार यांचे कौतुक केले होते. यामागे मतांचे राजकारण आहे, अशी शंका घेण्यास पुरेशी जागा आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मोदी-शहा पुण्यात येत राहतील, हे निश्चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com