Shekhar Sinh
Shekhar Sinhsakal

Stamp : आता पाचशे रुपयांच्या मुद्रांकावरील मालमत्तांची खरेदी-विक्री होणार ग्राह्य

महापालिका हद्दीतील बहुतांश नागरिकांनी सामायिक गट नंबर असलेल्या जागांवर घरे बांधली आहेत. बहुतांश घरांचे बांधकाम खरेदी-विक्री प्रक्रियेशिवाय केली आहेत.

पिंपरी - संरक्षण विभागालगतचे प्रतिबंधित क्षेत्र (रेडझोन), महापालिका, एमआयडीसी, नवनगर विकास प्राधिकरण, राज्य किंवा केंद्र सरकारद्वारे संपादित जमिनींवरील मालमत्ता; साध्या पद्धतीने किंवा नोटराईज स्टॅम्पपेपरच्या आधारे खरेदी-विक्री केलेल्या मालमत्ता; तुकडेबंदी कायद्यानुसार खरेदी-विक्री होत नसलेल्या मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्तांच्या पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर केलेल्या हस्तांतरण नोंदी महापालिका ग्राह्य धरणार आहे, असा निर्णय प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला आहे.

महापालिका हद्दीतील बहुतांश नागरिकांनी सामायिक गट नंबर असलेल्या जागांवर घरे बांधली आहेत. बहुतांश घरांचे बांधकाम खरेदी-विक्री प्रक्रियेशिवाय केली आहेत. काही बांधकामे रेडझोन, आरक्षित वा सरकारी जागांवर आहेत. अशा घरांच्या नोंदी महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे करण्यासाठी १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर वाटणीपत्र करून नोंदी होत होत्या.

मात्र, अलीकडच्या काळामध्ये अशा नोंदी केल्या जात नव्हत्या. घराची जागा अत्यंत कमी असूनसुद्धा वाटपपत्रासाठी नागरिकांना संपूर्ण जागेची स्टॅंपड्युटी भरून वाटपपत्र करावे लागत होते. सामायिक जागेतील बांधकामाचे मूल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.

तसेच, अंतर्गत वादामुळे सर्वजण एकत्र येऊन वाटणीपत्रासाठी उपस्थित राहत नसल्याची वेगळीच अडचण होती. परिणामी मिळकतकराची नोंद होत नसल्याने कर भरू शकत नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून यामध्ये सुधारणा करण्याची आग्रही मागणी होती. ती आता मान्य झाली असून पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ड्यूटीवरही नोंदी करता येणार आहेत.

‘नव्याने वाटपपत्र करून नोंदी करताना सामायिक जागेचे मूल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना आयुक्तांना केली. त्यानंतर आयुक्तांनी परिपत्रक काढून नोंदी करून घेणार असल्याचा आदेश दिला.’

- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

‘शासनाकडून नोंदणी न होणाऱ्या मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी व हस्तांतरण कार्यपद्धतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामांची मालमत्ता नोंदणी व हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.’

- नामदेव ढाके, माजी सत्तारूढ पक्षनेते, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com