‘स्मार्ट सिटी’च्या वाटे आडवे ‘केबल जाळे’

‘स्मार्ट सिटी’च्या वाटे आडवे ‘केबल जाळे’

पिंपरी, ता. ३१ : शहरात कोणत्याही रस्त्याला जा, अथवा कोणत्याही गल्लीबोळात जा, तुम्हाला केबल लोंबकळत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळेल! काही ठिकाणी अर्धवट तुटलेल्या तर काही ठिकाणी तुटून लटकलेल्या केबल दिसून येतात. काही कंपन्यांकडून विनापरवाना महापालिकेच्या विद्युत खांब, महापालिकेच्या विविध प्रभागातील इमारती मालमत्तेचा वापर केला आहे. तुटलेल्या आणि लोंबकळणाऱ्या केबलमुळे बकालपणा तर येतोच पण, त्या नागरिकांच्या जिवावरही बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे ‘स्मार्ट’ बनत असतानाच, दुसरीकडे आकाशाकडे नजर टाकताच हे ‘केबल’चे जाळे निदर्शनास पडते आहे. महापालिका क्षेत्रात इंटरनेट तसेच इतर केबल टाकायच्या असतील, तर त्यासाठी संबंधित सेवा पुरवठादारांनी महापालिकेची परवानगी घेणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत काही पुरवठादाराने महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास येते. मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, वृक्ष आणि विजेच्या खांबांवर या केबलच्या वायर सर्रासपणे संपूर्ण शहरभर टाकण्यात आल्या आहेत.
खासगी इमारतीवर दूरदूरपर्यंत केबलच्या वायर टाकल्या आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहर बकाल होण्यास मदत होत आहे. शहराची सुंदरता धोक्यात आलेली आहे. महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही काही खासगी कंपन्यांनी अनधिकृत केबल टाकून बुडविला आहे. काही कंपन्यांची चौकशी करून संबंधितांवर परवानगी न घेता केबल टाकल्याबद्दल व महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याबद्दल त्यांच्यावर आकाशचिन्ह आणि विद्युत विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे, अशी शहरातील सुजाण नागरिकांची मागणी आहे.

तुटलेल्या केबलमुळे अपघाताची शक्यता
भूमिगत केबल टाकण्यासाठी परवानगी मागितल्यास देण्यात येते. मात्र, संबंधित केबल पुरवठादारांनी शुल्क चुकविण्यासाठी शहरात सर्वत्र विनापरवानगी केबलचे जाळे विणले आहे. शहरातील झाडांवर आणि विजेच्या खांबावर केबल टाकण्यात आल्या आहेत. या केबल तुटून काही वेळेस खाली पडतात किंवा भररस्त्यात लोंबकळत असतात. यामुळे अपघात होऊन एखाद्या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘‘शहरात महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे केबल टाकण्याचे काम सुरू आहे. महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. भविष्यात महसूल बुडविण्याचे कोणत्याही कंपनीचे धाडस होऊ नये अशी कारवाई करावी.’’
- सदाशिव तळेकर, नागरिक, पिंपरी

‘‘पुणे महापालिकेच्या धर्तीवर शहराचा देखील सर्व्हे करण्यात येणार आहे. विनापरवाना केबल पुरवठाधारकावर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. पण त्याविषयी धोरण आणि नियमावली ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.’’
- बाळासाहेब गलबले, सहशहर अभियंता, विद्युत विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com