गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यावर
दिघीमध्ये गुन्हा दाखल
दिघी : सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या पाच जणांच्या टोळक्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास विजयनगर, दिघी येथे घडली. ताबिश शेख (वय ३०), दत्तात्रेय कदम (वय २६), शुभम खत्री (वय २२, तिघे रा. विश्रांतवाडी, पुणे), ऋषिकेश रवींद्र दळवी (वय २०), जुबेर खान (वय ३६, दोघे रा. येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार अनिल दौंडकर यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चारचाकी वाहन घेऊन दिघीतील विजयनगर परिसरात आले. दरम्यान, त्यांनी एका दुकानासमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला. आरोपींनी सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांनी आरोपींच्या गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन ‘हॉकी स्टीक आढळून आल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सासूला मारहाणप्रकरणी सुनेवर गुन्हा
वाकड ः ‘तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात मला कशाला घेता’ असे, म्हटल्याचा राग आल्याने सुनेने सासूला बेदम मारहाण केली.
ही घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी तीनच्या सुमारास वाकड येथे घडली. याप्रकरणी जखमी सासूने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सासूने सुनेला ‘तुमच्या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये मला कशाला घेता,’ अशी विचारणा केली. त्यावरून सुनेने सासूला वाईट बोलत त्यांच्या अंगावर धावून येत झटापट केली. सासूने सुनेला लांब ढकलण्याचा प्रयत्न केला असता, सुनेने सासूला मारहाण केली. यामध्ये सासूच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

खोलीचा पत्रा उचकटून मोबाईल पळवले
तळेगाव ः खोलीचा पत्र उचकटून चोरट्याने खोलीतून दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना बुधवारी (ता. ३१) पहाटे चारच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे घडली. याप्रकरणी मूल नादर मन्सुरी (वय २२, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रज्वल बाळासाहेब मोडवे (वय २२, रा. जाधववस्ती, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भंगार गोळा करण्याचे काम करतात. दरम्यान, बुधवारी पहाटे खोलीत झोपलेले असताना आरोपीने खोलीचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. खोलीतून १९ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हिंजवडीत आणखी एक श्वान चिरडले
हिंजवडी ः श्वान चिरडल्याप्रकरणी मोटारचालकाच्या विरोधात आणखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथील भारती बाजार येथे घडली.
तीन दिवसांपूर्वी वाकड येथे देखील एक श्वान चिरडल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. ३२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका मोटारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारती बाजार येथे असलेल्या एका श्वानाला दररोज जेवण देत होत्या. दरम्यान, २३ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एकाने श्वानाला चिरडले, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार, भारतीय दंड विधान कलम ४२९ तसेच, महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डंपरच्या धडकेत डॉक्टरचा मृत्यू
थेरगाव : भरधाव वेगातील डंपरच्या धडकेत डॉक्टरचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास थेरगाव हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. डॉ. स्नेहिल दिगंबर परदेशी (वय २६) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी पवन घनश्याम मौर्य (वय ३३, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सूरज शंकर ढवाण (वय ४५, रा. थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलतभाऊ डॉ.
स्नेहिल परदेशी त्याच्या दुचाकीवरून तापकीर चौकाकडून थेरगाव हॉस्पिटलच्या दिशेने जात होता. त्यावेळी भरधाव घेण्यात आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या स्नेहिलचा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

बस प्रवासात दीड लाखांचे दागिने लंपास
पिंपरी : पीएमपी बसने प्रवास करीत असताना एका महिलेचे दीड लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना सोमवारी (ता. २९) सायंकाळी सव्वा सहा ते आठच्या कालावधीत बालाजीनगर धनकवडी ते आंबेडकर चौक पिंपरी या मार्गावर घडली. याप्रकरणी महिलेने बुधवारी (ता. ३१) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान बालाजीनगर धनकवडी ते आंबेडकर चौक, पिंपरी या मार्गावरून पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले.

ग्राहकास मारहाणप्रकरणी दुकानदारावर गुन्हा
पिंपरी : घड्याळाचा सेल बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकाला दुकानदाराने बेदम मारहाण केली. ही घटना साडेआठच्या सुमारास माऊली चौक वाकड येथे घडली. अभिषेक अविनाश पारखी (वय २४, रा. सुखकर्ता कॉलनी, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुकानदार वर्मा (पूर्ण नाव माहिती नाही), ऋतिक ढसाळ (वय ३०), पाटील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घड्याळाचा सेल बदलून घेण्यासाठी मित्राला घेऊन आरोपी वर्मा याच्या दुकानात गेले. आरोपी वर्मा याने सेल बदलून देण्यास टाळाटाळ करून, शिवीगाळ केली. तसेच, आरोपी ऋतिक ढसाळ याने फिर्यादी यांना कानाखाली मारली. तसेच, पाटील याने फिर्यादी यांना बांबूने मारहाण केली. या भांडणात फिर्यादी यांचा मोबाईल फोन खाली पडला. त्यावर आरोपींनी सिमेंट ब्लॉक मारून नुकसान केले. आरोपींनी फिर्यादी यांचा मित्र निखिल पांचाळ यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्यालाही जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com