Cervical Cancer
Cervical Canceresakal

Poonam Pandey Cervical Cancer: असुरक्षित शारिरीक संबंध अन् गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा काय संबंध ?

World Cancer Day: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांना होणारा स्तनाच्या कर्करोगानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे.

पिंपरी,ता. ३ ः सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. हा एकमेव कर्करोगाचा प्रकार आहे की, ज्यावर लसीव्दारे प्रतिबंध केला जाऊ शकतो. मात्र, असे असूनही केवळ जागरूकता नसल्याने दरवर्षी लाखो महिलांना या कर्करोगाची लागण होत आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांना होणारा स्तनाच्या कर्करोगानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे.

का होतो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ?
‘एचपीव्ही’ या विषाणूमुळे हा कर्करोग मुख्यत्वाने होतो. ९० टक्क्यांपेक्षा जास्त महिलांना ‘एचपीव्ही’ विषाणूचा संसर्ग झाल्याने या कर्करोगाची लागण होते. हा कर्करोग लैंगिकरित्या संक्रमित होणारा असल्याने गर्भाशयाचे मुख म्हणजेच ‘ग्रीवा’ इथे या कर्करोगाची सुरुवात होते. प्राथमिक टप्प्यावर या कर्करोगाचे निदान झाल्यास ९६ टक्के रुग्णांमध्ये हा कर्करोग पूर्णपणे बरा होतो. या कर्करोगाचा मृत्यूदर ९ टक्के आहे. त्यामुळे, शेवटच्या टप्प्यात जर याचे निदान झाले; तर हा कर्करोग जीवघेणाही ठरू शकतो.

प्रमुख कारणे
- असुरक्षित शारिरीक संबंध
- खासगी अवयवांची स्वच्छता न ठेवल्यास
- तीनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका अधिक
- धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्येही प्रादुर्भाव, रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याचा परिणाम

भारतात सद्यस्थिती काय ?
- देशातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येणाऱ्या कर्करोगांपैकी एक.
- ग्रामीण भागातील व गरीब महिलांमध्ये प्रमाण जास्त
- २०२२ पर्यंत वर्षाला १ लाख २३ हजार महिलांना लागण
- २०२३ मध्ये हेच प्रमाण तीन लाखांपेक्षा अधिक

लक्षणे काय ?
- योनीमार्गातून असामान्य रक्तस्राव
- शरीरसंबंधांच्या वेळी वेदना होणे
- ओटीपोटात दुखणे, पोट फुगणे
- योनीतून दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे
- लघवीला जळजळ होणे
- खोकला येणे किंवा दम लागणे
- अधिक रक्तस्त्राव होणे

‘एचपीव्ही’ लसीचा फायदा
कर्करोगाचा हा एकमेव असा प्रकार आहे की, ज्यावर प्रतिबंधात्मक उपाय उपलब्ध आहे. ‘एचपीव्ही’ लस ही या कर्करोगावर ९८ टक्के परिणामकारक आहे. ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलीही लस घेऊ शकतात. मात्र, ज्यांनी ही लस घेतली नाही, अशा महिलांनी वयाच्या २५ वर्षांनंतर वर्षातून एकदा पॅप्स स्मिअर ही चाचणी करणे आवश्यक आहे.

का वाढतोय सर्वायकल कॅन्सर ?
हा आजार प्रामुख्याने लैंगिकरित्या संक्रमित होणारा आजार आहे. त्यामुळे, याविषयी फारशी जागरूकता नाही. महिलांमध्ये दिसून येणारी लक्षणे ही मुख्यत्वे पाळीशी संबंधित असतात; त्यामुळे, लाजेखातर किंवा दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे महिला याची लक्षणे फारशी गांभीर्याने घेत नाहीत.

प्राथमिक स्थितीमध्ये जर या कर्करोगाचे निदान झाले; तर शस्त्रक्रियेद्वारे हा रोग पूर्णपणे बरा होतो. मात्र, हे निदान होण्यासाठी महिलांना आपल्या आरोग्याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे. लसीमुळे कर्करोगाचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. मात्र, या लसीविषयीही अनेक गैरसमज आहेत. परंतु, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. केंद्र सरकारही ही लस मोफत देण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे. जे कौतुकास्पद आहे.’
- डॉ. महेश पवार, कर्करोग सर्जन

या कर्करोगाचे प्रमाण ३५ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये अधिक दिसून येते. गर्भाशयाच्या मुखाचा हा कर्करोगामुळे मुत्रपिंडावरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे, १४ वर्षाखालील मुलींना
‘एचपीव्ही’ लस देणे तसेच वयाच्या २५ व्या वर्षानंतर नियमितपणे आपली चाचणी करून घेणे. हे हा कर्करोग रोखण्यासाठी आवश्‍यक प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
- डॉ. रेश्‍मा पुराणिक, कर्करोगतज्ज्ञ, डीपीयू सुपरस्पेशालिटी रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com