Pune Crime News : मेफेड्रोनप्रकरणी फौजदार गजाआड ; सापडलेले ४५ कोटींचे मेफेड्रोन विकून पैसे कमाविण्याचा घाट

तब्बल पंचेचाळीस कोटींच्या मेफेड्रोनचा मोह फौजदाराला चांगलाच महागात पडला. रस्त्यावर सापडलेल्या सुमारे ४५ कोटी रुपये किमतीच्या मेफेड्रोन या अमली पदार्थाबाबतचा पुढे तपास करण्याऐवजी ते विकून बक्कळ पैसे कमविण्याचा घाट फौजदाराने घातला.
Pune Crime News
Pune Crime News sakal

पिंपरी : तब्बल पंचेचाळीस कोटींच्या मेफेड्रोनचा मोह फौजदाराला चांगलाच महागात पडला. रस्त्यावर सापडलेल्या सुमारे ४५ कोटी रुपये किमतीच्या मेफेड्रोन या अमली पदार्थाबाबतचा पुढे तपास करण्याऐवजी ते विकून बक्कळ पैसे कमविण्याचा घाट फौजदाराने घातला. अखेर तपासात सर्व प्रकार समोर आल्यानंतर फौजदाराला अटक केली. विशेष म्हणजे एका गुन्हेगारानेच हे प्रकरण उघडकीस आणले आहे. अमली पदार्थासारख्या गंभीर प्रकरणात ‘कुंपणच शेत खात असल्याचा’ धक्कादायक प्रकार समोर आल्याने पोलिस दलासह राज्यभर खळबळ उडाली आहे.

विकास शेळके असे अटक केलेल्या फौजदाराचे नाव असून, तो निगडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता, ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात नमामी शंकर झा (वय ३२, रा. भेळ चौक, निगडी, मूळ- मेहनात पैवती, बिहार) याला पोलिसांनी शुक्रवारीच अटक केलेली आहे. सांगवी पोलिस हे शुक्रवारी (ता. १) पहाटे रक्षक चौक परिसरात गस्त घालत असताना हातात पांढऱ्या रंगाची पिशवी असलेला झा याला पोलिसांनी दोन किलो मेफेड्रोनसह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, हे मेफेड्रोन शेळके याने दिल्याचे समोर आले. त्यानुसार शेळके यालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून आतापर्यंत एकूण ४४. ७९० ग्रॅम वजनाचे ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त केले आहे.

कोट्यवधी रुपये कमवण्याचा मोह

निगडीतील भक्ती-शक्ती चौक परिसरातील रस्त्यावर २६ फेब्रुवारीला रात्री एका गाडीतून मेफेड्रोन असलेले पोते रस्त्यावर पडले. या रस्त्याने जाणाऱ्या एका मोटारचालकाने ते पोते नाकाबंदीच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांकडे दिले. येथील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी या पोत्याबाबत शेळके याला कल्पना दिली असता, शेळके याने ते पोते चौकीत ठेवण्यास सांगितले. त्यामध्ये कोट्यवधींचे मेफेड्रोन असल्याचे समजल्यानंतर शेळके याचेही डोळे फिरले. या प्रकरणाचा पुढे तपास करायचे सोडून, वरिष्ठ अधिकारी अथवा कुठेही काहीही न सांगता हे मेफेड्रोन विकण्याचे नियोजन शेळके याने सुरू केले.

‘ते’ वाहन कोणते ?

रस्त्यावर पडलेल्या मेफेड्रोनचे पोते पोलिसांकडे आणून देणाऱ्या मोटारचालकाचा पोलिसांनी शोध घेतला. त्याच्याकडे चौकशी करून सर्व माहिती घेतली असता, पोत्यातील मेफेड्रोनबाबत मोटारचालकाला काहीही कल्पना नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ज्या वाहनातून हे मेफेड्रोन पडले, ते कोणाचे वाहन होते, कुठे जात होते, या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

गुन्हेगाराकडूनच भांडाफोड

दरम्यान, शेळके याने रावेत येथे भागीदारीत सुरू केलेल्या हॉटेलमधील कामगार नमामी झा याला बोलवले. त्याला रावेत परिसरातील एका गुन्हेगाराकडे पाठवले. मात्र, संबंधित गुन्हेगाराने याबाबत सांगवी पोलिसांना कल्पना दिली. त्यानुसार सांगवी पोलिसांनी सापळा रचून झा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर शेळके याचे नाव समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com