सोनेखरेदीकडे ग्राहकांचा वाढला कल

सोनेखरेदीकडे ग्राहकांचा वाढला कल

पिंपरी, ता. १२ ः साडेतीन मुहूर्त हे सोने खरेदीसाठी उत्तम असल्याचे म्हटले जाते. या सोबतच गुरुपुष्यामृत या तिथीवरही सोन्याची खरेदी केली जाते. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर दर काहीसे कमी झाल्यामुळे गुढीपाडवा व अक्षय्य तृतीया या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

यावर्षी एप्रिल महिन्यात सोन्याच्या दराने प्रथमच प्रति तोळा सत्तर हजारांच्या पुढे जाऊन पोचले. मात्र, दर वाढूनही सोने खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. भारतात शेअर बाजारात होत असलेली मोठी घसरण, बॅंकाकडून ठेवींचे व्याजदर हे सर्व पाहता सोन्यात गुंतवणुकीमध्ये मिळणारा परतावा अधिक असल्याचे ग्राहक सांगतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेली अस्थिरतेमुळे हे दर वाढत आहेत. भविष्यात मोठी दरवाढ होण्याची शक्यता असल्याने पुढे येणाऱ्या लग्नकार्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून आत्ताच सोने खरेदी करून ठेवण्याकडे ग्राहकांचा कल आहे.

‘अक्षय्य तृतीयेसाठी खरेदी करण्यासाठी दिवसभर ग्राहकांनी गर्दी केली होती. सध्या लग्नसराई असल्याने महिलांकडून लग्नाच्या दागिन्यांची खरेदी केली जात आहे. नववधूचे दागिणे, अंगठ्या, सोनसाखळी त्यासोबतच गुंतवणुकीसाठी सोन्याची वेढणी, कॉइन, बिस्किटे यांची खरेदी केली जात आहे.’
- रवी कावेडिया, संचालक, कावेडिया ज्वेलर्स, जुनी सांगवी

‘सध्या जागतिक बाजार अस्थिर आहे. जगात युद्धपरिस्थिती आहे. बऱ्याच देशांच्या बॅंकानीही सोनेखरेदी केले आहे. त्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यातच अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त व सध्या स्थिर असलेले दर या कारणांमुळे यंदा या सणाला ग्राहक सोने खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.’
- राहुल चोप्रा, संचालक, सत्यम ज्वेलर्स, निगडी

‘मी नेहमीच सोन्यात गुंतवणूक करत असते. मात्र, प्रत्येकवेळी एखादा दागिना घेणे शक्य नसते. त्यामुळे वेळोवेळी सोन्याची वेढणी व कॉइन घेऊन त्यातून हवे तेव्हा सोने करता येते. सध्या सोन्याचे दर वाढत असल्याने अडीनडीला हे सोने मोडल्यास परतावाही चांगला मिळू शकतो.’
- प्रतिभा निकम, महिला, निगडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com