बेवारस वाहनांची लागणार विल्हेवाट
पिंपरी, ता. ९ : शहरातील विविध भागांतील बेवारस अवस्थेत उभ्या असलेल्या वाहनांची संख्या वाढत आहे. त्यांची विल्हेवाट लावण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत.
रस्त्याच्या कडेला, गल्लीबोळांत, सार्वजनिक ठिकाणी दीर्घकाळापासून दुचाकी, चारचाकी वाहने पडून आहेत. या वाहनांचे मालकच सापडत नाहीत. अशी वाहने महापालिका व पोलिसांनी ताब्यात घेऊन मोशी येथील दगडखाण मार्गावरील वाहनतळावर सुरक्षित ठेवली आहेत. तेथे वाहनांचा अक्षरशः खच पडला आहे. ही वाहने अनेक वर्षांपासून पडून असल्याने गंजलेल्या स्थितीत आहेत. ही जागा आता अपुरी पडत आहे. मूळ मालकांच्या हवाली करता आली नाहीत किंवा मालकाने ताब्यात घेण्यास टाळाटाळ केल्यास त्या वाहनांची विल्हेवाट लावण्यात येईल.
शहराच्या रस्त्यावर अनधिकृतपणे सोडून दिलेली वाहने सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरतात. बेवारस वाहनांच्या बाजूला घाण जमा होते. वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यात पालिका आणि पोलिसांसमोर बेवारस वाहनांमुळे वेगळीच समस्या निर्माण होते.
मोशी येथील दगडखाण मार्गावरील वाहनतळ आरक्षण क्रमांक १/२०५ या ठिकाणी बेवारस वाहने आहेत. चेसिस नंबर, आरटीओ नंबर आदी मुळ दस्तावेज सादर करून प्रलंबित दंड भरून संबंधित मालक वाहन ताब्यात घेऊ शकतात.
------
मोशी येथील वाहनतळावरील वाहनांची मोजणी तसेच इतर माहिती जमा करण्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आरटीओ व इतर विभागांशी समन्वय साधून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
-------------------
रस्त्यावरील बेवारस वाहने ताब्यात घेऊन महापालिकेच्या मोशी येथील जागेत ठेवली जातात. आता ही जागा अपुरी पडत आहे. विविध विभागांशी समन्वय साधून या वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, महापालिका
------
दृष्टिक्षेपात
- वाहनतळाची जागा सुमारे दोन एकर
- महापालिका आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेली बेवारस वाहने - ३९५
- मुदतीत कागदपत्रे सादर करून मूळ मालकांनी ताब्यात घेतलेली वाहने - ४०
-------
फोटो
66497

