

पिंपरी, ता. १८ ः अक्षय्य तृतीया पार्श्वभूमीवर आंब्याची आवक कमी प्रमाणात होत असल्याने दरांत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात एक डझन तयार हापूसचे दर प्रतवारीनुसार ८०० ते १२०० रुपयांपर्यंत आहेत, तर किरकोळ बाजारात एक डझन हापूसची विक्री १२०० ते १५०० रुपये दराने केली जात आहे.
अक्षय्य तृतीयेला पितरांना हापूस आंब्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे दर वर्षी अक्षय्य तृतीयेच्या आधी आंब्यांच्या मागणीत वाढ होते. यंदा कोकणात तापमानातील प्रचंड चढ-उतार, वाढता उष्मा आणि दमट हवामानामुळे मोहोर करपला. प्रतिकूल हवामानामुळे यंदा उत्पादनात सुमारे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. परिणामी, बाजारात मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी होत आहे. विशेषत: तयार हापूसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. बाजारात आंब्याची आवक खूपच कमी आहे, विशेषतः मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये आवक निम्म्यावर आली आहे.
‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हापूसच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने दरात २० ते ४० टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजारात कच्च्या आंब्यांची आवक वाढली. कच्चा आंबा पक्व होण्यास वेळ लागतो. ग्राहकांकडून तयार आंब्यांना मागणी आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक डझन तयार हापूसचे दर ८०० ते १२०० रुपयांपर्यंत आहेत,’ अशी माहिती मोशी मार्केटमधील आंबा व्यापारी आकाश बांगर यांनी दिली.
सध्याचे अंदाजे दर
प्रकार -घाऊक दर- किरकोळ दर
तयार हापूस - ८०० ते १,२०० - १,२०० ते १,५००
कच्चा हापूस (पेटी)- २ हजार ते ४ हजार - ४ हजार ते ९ हजार (दर्जानुसार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.