
विहिरीत पडलेल्या उदमांजराला जीवदान इंदोरीजवळील घटना, स्वयंसेवकाच्या तीन तासांच्या प्रयत्नांना यश
तळेगाव स्टेशन, ता. ३ : रात्रीच्या अंधारात भरकटलेले उदमांजर मावळ तालुक्यातील तोलानी महाविद्यालयालगतच्या विहिरीत पडले. त्यानंतर वन्यजीवरक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरून, तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी उदमांजराला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
इंदोरीजवळच्या शेतातील एका विहिरीमध्ये एक उदमांजर पडले असून, विहिरीच्या कपारीत जीव मुठीत धरुन बसल्याची माहिती शनिवारी (ता. ३) दुपारी वैभव पानसरे यांनी तळेगाव दाभाडे येथील वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला दिली. माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य अविनाश कारले, भास्कर माळी, वैभव वाघ, जिगर सोलंकी यांचा चमू तिकडे पोचला. विहिरीची चोहोबाजूने पाहणी करून अविनाश कारले हे दोरखंड आणि हरणेस घालून विहिरीत उतरले. भीतीपायी दडून विहिरीच्या कपारीत आसरा घेतलेले उदमांजर दचकून विहिरीच्या पाण्यातही पडू शकत होते. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेत अविनाश यांनी हातमोजे घालून उदमांजराला मोठ्या प्रयत्नांनी पकडून छोट्या पाळण्यात टाकले. वर उभ्या सहकाऱ्यांनी त्याला सुरक्षित वर खेचले. तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर उदमांजराला सुरक्षित विहिरीबाहेर काढण्यास अखेर यश मिळाले. वडगांव वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्याशी संपर्क साधून, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांच्या सल्ल्याने जिगर सोलंकी यांनी उदमांजराची प्राथमिक तपासणी केली. सुदैवाने त्यास कुठलीही जखम झाल्याचे दिसले नाही. त्यानंतर पिंजऱ्याचे दार उघडून उदमांजराला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. वैभव पानसरे, राम खराटे, प्रणव रोकडे, धीरज पाटील या स्थानिक युवा कार्यकर्त्यांची मोलाची मदत याकामी लाभली. कुठलाही वन्यप्राणी अडचणीत अथवा जखमी अवस्थेत आढळून आल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर अथवा आपल्या परिसरातील प्राणीमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन वन्यजीव मावळ रक्षक संस्थेतर्फे करण्यात येत आहे.
फोटो ओळी : विहिरीच्या कपारीत आसरा घेतलेले उदमांजर. (दुसऱ्या छायाचित्रात) पिंजऱ्याच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढलेले उदमांजर.
फोटो ः 04307, 04308