मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती - सुधारित बातमी

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती - सुधारित बातमी

मावळ बाजार समितीवर
महाविकास आघाडीचे वर्चस्व

वडगाव मावळ, ता. २९ ः मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले व बाजार समिती पुन्हा ताब्यात घेतली. भाजप प्रणीत सर्वपक्षीय पॅनेलचा दारुण पराभव झाला. त्यांना अवघी एक जागा मिळाली. निकालानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण असलेल्या सात, महिला मतदार संघातील दोन, ओबीसी व भटक्या विमुक्तची प्रत्येकी एक अशा सर्व ११, ग्रामपंचायत मतदार संघातील सर्व चार, व्यापारी मतदार संघातील एक व हमाल, तोलारी मतदार संघातील एक अशा एकूण १७ जागांवर विजय मिळवला. भाजप प्रणीत पॅनेलला व्यापारी मतदार संघातील एका जागेवर समाधान मानावे लागले.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल व भाजप प्रणीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेल या दोन पॅनेलने निवडणूक प्रतिष्ठेची करून प्रचाराचा धुरळा उडवून दिल्याने तब्बल ९८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. मतमोजणीला तहसीलदार विक्रम देशमुख, निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव घुले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र नेहुल, अशोक मारणे, प्रवीण धमाल, जितेंद्र विटकर, गंगाधर कोत्तावार, पोलिस निरीक्षक विलास भोसले आदींच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी नऊ वाजता येथील पंचायत समितीच्या सभागृहात सुरवात झाली. कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण असलेल्या सात जागांची मतमोजणी सुरवातीला करण्यात आली. या सातही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यानंतर महिला मतदार संघातील दोन जागांची मतमोजणी झाली. त्या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीच्याच उमेदवारांनी बाजी मारली. त्यानंतर इतर जागांची मतमोजणी झाली. दुपारी दोन वाजता सर्व जागांची मतमोजणी पूर्ण झाली. महाविकास आघाडीने १८ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. निकालानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला. विजयी मिरवणूकही काढली. आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, बापूसाहेब भेगडे, विठ्ठलराव शिंदे, बाबूराव वायकर, संतोष भेगडे, किशोर सातकर, नारायण ठाकर, सचिन घोटकुले, दीपक हुलावळे, दीपाली गराडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार शेळके म्हणाले, ‘‘मावळच्या जनतेने विकासाला साथ देत महाविकास आघाडीला मोठा विजय प्राप्त करून दिला असून, यापुढील काळातही विकासाला अशीच साथ द्यावी.’’ जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असून पुढच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारही मिळणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले, ‘‘आमदार शेळके यांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या विकास कामांमुळे जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. दरम्यान, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, ‘‘जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला असून, यापुढील काळातही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहू. ’’ ग्रामपंचायत व सोसायट्यांमध्ये पक्षाच्या मतदानाचा टक्का वाढल्याचा दावाही त्यांनी केला. धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे म्हणाले, की यापूर्वीच्या सहकार उपनिबंधकांनी सोसायट्यामध्ये केलेल्या गैर प्रकारांचा भाजपला फटका बसला आहे.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे ः सर्वसाधारण कृषी पतसंस्था मतदार संघ -दिलीप नामदेव ढोरे, संभाजी आनंदराव शिंदे, सुभाष रघुनाथ जाधव, विलास सदाशिव मालपोटे, बंडू दामू घोजगे, मारुती नाथा वाळुंज, साईनाथ दत्तात्रेय मांडेकर, कृषी पतसंस्था महिला-सुप्रिया अनिल मालपोटे, अंजली गोरख जांभूळकर, कृषी पतसंस्था इतर मागास वर्ग-शिवाजी चिंधू असवले, ग्रामपंचायत सर्वसाधारण- नामदेव नानाभाऊ शेलार, विक्रम प्रकाश कलवडे, अनुसूचित जाती-विलास बबन मानकर, आर्थिक दुर्बल घटक -अमोल अरुण मोकाशी, भटक्या विमुक्त जमाती-नथू शंकर वाघमारे, व्यापारी सर्वसाधारण-ॲड. भरत दशरथ टकले, नामदेव ज्ञानेश्वर कोंडे, हमाल तोलारी सर्वसाधारण- शंकर अंतू वाजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com