‘व्हॅलेन्टाईन डे’साठी गुलाबाची निर्यात सुरू

‘व्हॅलेन्टाईन डे’साठी गुलाबाची निर्यात सुरू

Published on

वडगाव मावळ, ता. ३१ : मावळ तालुक्यातून ‘व्हॅलेन्टाईन डे’साठी गुलाब फुले परदेशात पाठविण्याची लगबग सुरू आहे. येत्या पंधरवड्यात देश परदेशात मिळून सुमारे दीड ते दोन कोटी फुले विक्रीला जातील असा अंदाज आहे. जगभरात १४ फेब्रुवारी हा ''व्हॅलेन्टाईन्स डे'' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. मावळात मोठ्या प्रमाणावर फुलणारा लाल रंगाचा गुलाब हा या ''व्हॅलेन्टाईन्स डे'' मध्ये प्रेमाचे रंग भरतो. मावळातील फुलांचा दर्जा उत्तम चांगला असल्यामुळे त्याला जगभरातून मोठी मागणी असते. त्याच अनुषंगाने तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून गुलाबशेती मोठ्या प्रमाणावर बहरली आहे. तालुक्यात सुमारे आठशे एकर क्षेत्रावर पॉलिहाऊसमध्ये गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते. त्यात लाल रंगाच्या फुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक तरुण शेतकऱ्यांनी व्यवसाय म्हणून फुलशेतीचा स्वीकार केला आहे. बहुतेक फूल उत्पादक शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांमार्फत फुलांची निर्यात करतात. अनेक शेतकरी थेट निर्यात करू शकत नसल्याने त्यांनी या कंपन्यांबरोबर करार केले आहेत. फ्लोरिकल्चर पार्कमधील फूल उत्पादकही कंपन्यांमार्फतच निर्यात करतात. फ्लोरिकल्चर पार्कमधून दरवर्षी २५ ते ३० लाख फुलांची निर्यात होते. पवन मावळातील पवना फूल उत्पादक कंपनी व काही मोठे फूल उत्पादक शेतकरी स्वतः निर्यात करतात.

हंगाम आनंददायी
गुलाबफुलांची नऊ फेब्रुवारीपर्यंत निर्यात होईल. मोठी मागणी व गेल्या वर्षीपेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे यंदा ‘व्हॅलेन्टाईन डे’चा हंगाम तालुक्यातील फूल उत्पादकांसाठी आनंददायी ठरेल असा विश्वास उत्पादक व्यक्त करीत आहेत. यंदा पावसाळा लांबल्यामुळे प्रारंभी रोपांच्या वाढीवर थोडा परिणाम झाला होता. त्यानंतर हवामानातील चढ-उतार व ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. त्यामुळे उत्पादक चिंतेत होते. कीड नियंत्रणात आणून फुलांच्या दर्जावर परिणाम होऊ नये म्हणून जास्त फवारण्या कराव्या लागल्या. मात्र उत्पादन सुरू झाल्यानंतर हवामान काहीसे सुधारले. त्यामुळे उत्पादकांचा जीव भांड्यात पडला.

१४ ते १६ रुपयांचा भाव
एका फुलाला दांड्याच्या लांबीनुसार (स्टेम लेंथ) भाव मिळतो. ५० सेंटीमीटरला १६ रुपये, ६० सेंटीमीटरला १८ रुपये, ७० सेंटीमीटरला २० रुपये असा भाव मिळतो. गेल्या वर्षी प्रति फूल १४ ते १६ रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. तीन वर्षांत प्रथमच परदेशात फुलांचे भाव वाढले आहेत. यंदा स्थानिक बाजारपेठेतही निर्यातीसारखाच चांगला भाव मिळत असल्यामुळे फूल उत्पादकांचा कल स्थानिक बाजारपेठेकडे जास्त दिसून येत आहे. त्यामुळे येत्या १०-१२ दिवसांत परदेशात सुमारे ७५ लाख ते एक कोटी, तर स्थानिक बाजारपेठेत सुमारे सव्वा ते दीड कोटी फुले विक्रीला जाण्याची शक्यता आहे.


मागणी कुठून
२८ जानेवारीपासून गुलाब फुले पाठविण्यास सुरवात झाली. येथून मागणी ः परदेशात दुबई, सिंगापूर, जपान, हॉलंड, ब्रिटन व इतर काही युरोपीय देश. भारतात पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकता, जम्मू-काश्मीर, जयपूर, पाटणा, रांची, चंडीगड, अहमदाबाद, प्रयागराज, लखनौ, हैदराबाद.

---
मागणी लक्षात घेता यंदा स्थानिक बाजारपेठेत फुलांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत फुलांचा भाव वाढणार आहे. तो निर्यातीएवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी ज्या फूल उत्पादकाकडे माल शिल्लक असेल त्याला प्रचंड कमाई होईल.
- मल्हार ढोले, सचिव, तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क

‘व्हॅलेन्टाईन डे’साठी परदेशात फुले पाठविण्यास २८ जानेवारीपासून सुरवात झाली आहे. यंदा हवामान चांगले आहे. फुलांना भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे ‘व्हॅलेन्टाईन डे’चा हंगाम फूल उत्पादकांसाठी आनंददायी व फलदायी ठरेल.


- सोमनाथ तांबे, मयूरी ॲग्रो, सांगवी

स्थानिक बाजारपेठेत फुलांना प्रचंड मागणी वाढली आहे. गेल्या वर्षापासून ॲमेझॉन, झेप्टो यांसारख्या कंपन्यांमार्फत फुलांची ऑनलाइन विक्रीही वाढली आहे. त्यामुळे पहिल्यासारखी निर्यातीवर अवलंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. उत्पादकांनी फुलांच्या दर्जावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दर्जेदार फुलांचे उत्पादन घेतल्यास चांगला भाव मिळेल. या व्यवसायात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
- नितीन जगताप, अध्यक्ष, पुणे फ्लॉवर ग्रोवर असोसिएशन
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com