काळाखडक परिसराला विकासाचे नवे ‘स्वप्न’

काळाखडक परिसराला विकासाचे नवे ‘स्वप्न’

Published on

वाकड, ता. ८ : भूमकर चौक - डांगे चौक या मार्गावर झालेले रुंदीकरण, पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेने चकाचक आणि गुळगुळीत झालेले रस्ते, प्रशस्त चौक आणि काळाखडक झोपडपट्टीची हटविण्यात आलेली अतिक्रमणे या सर्वांमुळे या भागाचे रूपडे पालटले असून परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
एका बाजूला आयटी पार्क, दुसऱ्या बाजूला मुंबई-बंगळुरू महामार्ग, मेट्रो मार्ग. वाहतुकीच्या या दोन महत्त्वाच्या दुव्यांमुळे काळाखडक - भूमकर चौक हा परिसर शहरातील ‘कनेक्टिव्हिटी हब’ म्हणून ओळखला जातो. याच भागात आशिया खंडातील सर्वात मोठ्या फिनिक्स मॉलसह अन्य पंचतारांकित मॉल्स आणि हाय-प्रोफाइल सोसायट्यांची रेलचेल आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या अनेक नामांकित महाविद्यालयांमुळे नवीन ‘एज्युकेशन हब’ देखील उदयाला आले आहे. त्यामुळे हा परिसर आधीच अत्याधुनिक, हायटेक आणि विकासाभिमुख झाला आहे.
काळाखडक झोपडपट्टीवासियांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना केलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा होत असे. त्यावर ‘सकाळ’ने देखील वारंवार प्रकाश टाकला होता. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवून रस्ते प्रशस्त व चकाचक करण्यात आली आहेत. तसेच काळाखडक ते ताथवडे या १८ मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. परिणामी, वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरलेली कोंडी फुटली असून परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर काळाखडक झोपडपट्टीचा एसआरए प्रकल्प देखील उभा राहत असल्याने परिसराच्या सौंदर्यात आणि सामाजिक संरचनेत आमूलाग्र बदल होत आहे.


हक्काचा सुरक्षित निवारा
राज्याच्या कानाकोपऱ्यातून १९७० च्या दशकात रोजगारानिमित्त शहरात दाखल झालेल्या मजुरांची काळाखडक वसाहत. अघोषित झोपडपट्टी म्हणून कायमच दुर्लक्षित राहिलेल्या या झोपडपट्टीवासियांसाठी सध्या शासनाकडून एसआरए पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे झोपडपट्टीवासीयांचे भाग्य उजळले असून, सर्वांना हक्काचा, सुरक्षित आणि भक्कम निवारा मिळणार आहे.

सन्मानाचे जीवन
आधुनिक नियोजनातील सुसज्ज घरे या सर्वांचा समन्वय साधत काळाखडक झोपडपट्टीचा एसआरए प्रकल्प उभा राहत आहे. परिणामी, झोपडपट्टीवासीयांना सन्मानाचे जीवन मिळणार आहे. काळाखडकचा एसआरए प्रकल्प हा समावेशक विकासाचे उत्तम उदाहरण ठरणार असून ‘शहर सर्वांसाठी’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणारा ठोस टप्पा म्हणून पाहिला जात आहे. विकास, सुविधा आणि मानवी सन्मान या तिन्हींचा संगम साधत काळाखडक परिसर आज नव्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज झाला आहे.

काळाखडक झोपडपट्टीत सुमारे १५०० कुटुंबे वास्तव्यास होती. त्यातील बहुसंख्य कुटुंबांचे योग्य त्या ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून मोजकी कुटुंबे शिल्लक आहेत. त्यांचे देखील लवकर स्थलांतर होणार असल्याने काळाखडक एसआरए प्रकल्पाला गती मिळेल.
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

भूमकर चौक ते डांगे चौक या मार्गावरील बहुतेक अतिक्रमणे हटवून रस्ता प्रशस्त करण्यात आला आहे.
काळाखडक पुनर्वसन प्रकल्पामुळेही वाहतुकीला गती मिळाली आहे. या रस्त्यातील एक - दोन बांधकामांचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबत तोडजोडीने तत्काळ विषय मार्गी लावून संपूर्ण रस्ता प्रशस्त करण्याचे आमचे नियोजन आहे.
- मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका


येत्या तीन वर्षांत आम्हा रहिवाशांना आमची हक्काची घरे मिळणार आहेत. त्याबाबत सर्वतोपरी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहेत. आमच्या रहिवाशांपैकी प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. सुमारे पंधराशे कुटुंबीयांचे भाग्य उजळले आहे.
- जहीर अरब, अध्यक्ष, काळाखडक रहिवासी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com